ऐरोली-कळवा दुहेरी उन्नत रेल्वे मार्गाकरिता सिडको भूमी देेणार
नवी मुंबई – ऐरोली-कळवा दुहेरी उन्नत रेल्वे मार्ग विकसित करण्यासाठी सिडकोच्या वतीने नवी मुंबई रेल्वे विकास मंडळाला (एम्.आर्.व्ही.सी.) नवी मुंबईतील दिघा येथील भूमी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रेल्वे मार्गामुळे ठाणे रेल्वे स्थानकावरील गर्दीचा भार न्यून होण्यासह कल्याण दिशेकडून येणार्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यास साहाय्य होणार आहे, अशी माहिती सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.
नवी मुंबई रेल्वे विकास मंडळाकडून सिडकोला २०१८ मध्ये ऐरोली-कळवा दुहेरी उन्नत रेल्वे मार्ग विकसित करण्यासाठी दिघा येथील वरील भूमी हस्तांतरित करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार दिघा येथील ९१९ चौ.मी. क्षेत्रफळाची भूमी ही प्रतीचौ.मी. २२ सहस्र ५०० रुपये दराप्रमाणे २ कोटी ६ लाख ७७ सहस्र ५०० रुपयांना भाडेपट्टा अधिमूल्य आकारून ९० वर्षांच्या भाडेपट्ट्याने रेल्वे विकास मंडळाला देण्याचा निर्णय घेतला आहे.