चंद्रपूर येथे स्थानिकांना रोजगार न दिल्याच्या कारणावरून मनसेकडून जी.आर्.एन्. आस्थापनाच्या कार्यालयाची तोडफोड !
चंद्रपूर – स्थानिकांना रोजगार दिला जात नाही. स्थानिकांना रोजगार देण्यात कुचराई केली जाते, असा आक्षेप घेत मनसेच्या सैनिकांनी येथील जी.आर्.एन्. आस्थापन कार्यालयाची १७ फेब्रुवारी या दिवशी तोडफोड केली. या वेळी कार्यालयात अधिकारी अनुपस्थित होते. आस्थापनाच्या आवारात असलेली वाहने, पटल, संगणक, एल्.सी.डी, आसंदी, सीसीटीव्ही, कार्यालयातील काचा, खिडक्या अशा सर्व वस्तूंचा अक्षरशः चुराडा करण्यात आला.
स्थानिकांना रोजगार न दिल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी मनसेने दिली आहे. दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्या भटाळी येथे वेकोलीची कोळसा खाण आहे. येथे सरकारी कोळसा आस्थापन डब्ल्यू.सी.एल्. अंतर्गत काम करणार्या जी.आर्.एन्. कन्सट्रक्शन आस्थापन कोळसा खाणीवर खोदकाम करते.
‘या आस्थापनात स्थानिकांना रोजगार देण्यात यावा, अशी मागणी मनसेची होती. याविषयी अनेक निवेदने दिली; मात्र आस्थापनाने याला जुमानले नाही’, असा आरोप मनसेने केला आहे. या प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर दुर्गापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेनंतर मनदीप रोडे हे पसार झाले आहेत.