कोरोनाची दुसरी लाट आल्यास सावरायलाही वेळ मिळणार नाही !

साथरोग आणि संसर्गजन्य विभागाचे माजी विभागप्रमुख पद्मश्री रमण गंगाखेडकर यांची चेतावणी 

पद्मश्री रमण गंगाखेडकर

नागपूर – लोकांचा बिनधास्तपणा आणि बेफिकिरी प्रचंड वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट आली, तर आपल्याला सावरायलाही वेळ मिळणार नाही, अशी चेतावणी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आय.सी.एम्.आर्.) साथरोग आणि संसर्गजन्य विभागाचे माजी विभागप्रमुख पद्मश्री रमण गंगाखेडकर यांनी १६ फेब्रुवारी या दिवशी दिली. ‘मला काही होणार नाही, माझी प्रतिकारशक्ती उत्तम आहे, आता तर ‘व्हॅक्सिन’ही आली आहे’, त्यामुळे कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष करण्याचे परिणाम पाश्‍चिमात्य देश भोगतच आहेत. आपल्याकडेही अशीच काहीशी परिस्थिती दिसून येत असून यामुळे दुसरी लाटच काय, काहीही येऊ शकते, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

आरोग्य यंत्रणांवर आधीच पुष्कळ ताण आहे !

रमण गंगाखेडकर पुढे म्हणाले, ‘‘राज्यातील आरोग्य यंत्रणांवर आधीच पुष्कळ ताण आहे. आता लोकांच्या बेफिकिरीमुळे जर दुसरी लाट आल्यास केवळ रुग्णसंख्याच नव्हे, तर मृत्यूदरही वाढेल, अशी चिंता गंगाखेडकर यांनी व्यक्त केली आहे. आज आपल्याकडे ५० टक्केही लसीकरण होऊ शकलेले नाही. कोरोनाशी लढण्यात आघाडीवर असलेले आधुनिक वैद्य, परिचारिका, पोलीस आणि इतर साहाय्यनीस यांचे आधी १०० टक्के लसीकरण करण्याची आवश्यकता आहे.’’

कोरोना पुन्हा डोके वर काढू नये यासाठी नियम पाळा ! – डॉ. प्रदीप आवटे

संभाजीनगर – राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढत असून कोरोना पुन्हा डोके वर काढू नये, यासाठी प्रत्येकाने अधिक सतर्क होण्याची आवश्यकता आहे, असे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, अचानक आलेली थंडीची लाट, मराठवाडा आणि विदर्भात मागील काही दिवसांत अल्प झालेले तापमान आणि राज्यभरातील १४ सहस्र ग्रामपंचायतींचे नुकतेच झालेले मतदान हे कोरोना प्रसाराला कारण ठरले आहे. कोरोना संपला असे समजून विवाह सोहळे गर्दीत पार पडत आहेत. यामुळे प्रतीदिन ८०० ते १ सहस्र रुग्ण राज्यात वाढत आहेत. ही वाढ पुष्कळ मोठी होऊ नये, यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.