संतांच्या चैतन्यामुळे अल्प काळात त्रास न्यून होऊन चैतन्य अन् आनंद यांत न्हाऊन निघाल्याची साधकाला आलेली अनुभूती !
पू. भगवंतकुमार मेनराय आणि पू. (सौ.) सूरजकांता मेनराय यांच्यातील चैतन्यामुळे अल्प काळात त्रास न्यून होऊन चैतन्य अन् आनंद यांत न्हाऊन निघाल्याची साधकाला आलेली अनुभूती !
१. पू. मेनरायआजोबा आणि पू. (सौ.) मेनरायआजी यांना आणण्यास विमानतळावर जाण्यासाठी सकाळी उठता न येणे आणि सद्गुरु पिंगळेकाकांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर जरा बरे वाटणे
डिसेंबर २०१९ मध्ये पू. भगवंतकुमार मेनरायआजोबा, पू. (सौ.) सूरजकांता मेनरायआजी अन् त्यांची मुलगी कु. संगीता हे तिघेही रामनाथी आश्रमातून फरीदाबाद येथील त्यांच्या घरी जाण्यासाठी देहली येथील विमानतळावर आले होते. त्यांना तेथून घेऊन चारचाकी वाहनाने फरीदाबाद (हरियाणा) येथील त्यांच्या घरी सोडण्याची सेवा गुरुकृपेने मला लाभली होती. त्या दिवशी सकाळपासून मला शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास होत होता. मला पुष्कळ ग्लानी आली होती. पुष्कळ प्रयत्न करूनही माझे डोळे उघडत नव्हते. सद्गुरु पिंगळेकाकांनी सांगितल्याप्रमाणे गोमूत्र घातलेल्या पाण्याने डोळे धुऊन उपाय आणि नामजप केल्यावर मला जरा बरे वाटले.
२. सद्गुरु पिंगळेकाकांनी साधकाला ही सेवा जमेल ना ?, असे विचारणे आणि नंतर त्यांनी दोन संत समवेत असल्यामुळे काळजी नाही, असे सांगणे अन् विमानतळावर पोचेपर्यंत साधकाला अस्वस्थता जाणवणे
त्या वेळी सद्गुरु पिंगळेकाकांनी मला तुम्हाला जमेल ना ?, असे विचारले. नंतर ते म्हणाले, समवेत २ संत आहेत. त्यामुळे काळजी नाही. त्यांनी मला या सेवेला जाण्याची अनुमती दिली. रात्री परतीच्या प्रवासाला उशीर होणार होता; म्हणून त्यांनी श्री. देवदत्त व्हनमारे या साधकाला माझ्या समवेत पाठवले. विमानतळावर पोचेपर्यंत मला एक प्रकारची अस्वस्थता आणि आत्मविश्वासाचा अभाव जाणवत होता.
३. पू. (सौ.) मेनरायआजींना श्वास घेण्याचा त्रास होत असूनही त्यांच्या तोंडवळ्यावर तसे न जाणवणे
पू. मेनरायआजोबा आणि पू. मेनरायआजी विमानतळाच्या बाहेर आले. तेव्हा ते चाकांच्या आसंदीवर बसले होते. आम्हाला पाहिल्यावर ते छान हसले. त्यांना पहातांना त्यांना काही त्रास होत आहे, असे मला जाणवत नव्हते. खरेतर पू. आजींना श्वास घेण्याचा त्रास होत होता; परंतु त्यांच्याकडे पाहून तसे जाणवत नव्हते.
४. पू. आजींची अनुभवलेली प्रीती !
४ अ. फरीदाबाद येथील घरी सुखरूप पोचल्यावर पू. आजींनी प्रेमाने मिठीत घेणे : मी देहलीत नवीनच असल्यामुळे पू. आजी मधे-मधे पू. आजोबांना मला मार्ग दाखवण्यास सांगत होत्या. फरीदाबाद येथील त्यांच्या घरी पोचल्यावर गाडीतून उतरताच पू. आजींनी मला आणि सहसाधकाला कडकडून मिठी मारली. तेव्हा आपल्या मुलाला पुष्कळ वर्षांनी भेटल्यावर आईने मुलाला मिठी मारावी, तशी त्यांनी मला मिठी मारली, असे मला जाणवले. तेच मातृत्व आणि तोच वात्सल्यभाव ! संतांची अशी प्रीती अनुभवायला मिळाल्यामुळे मला फार आनंद झाला. त्या वेळी पू. आजींसमवेत आमचीही भावजागृती झाली आणि पू. आजी अन् परात्पर गुरुमाऊली यांच्याविषयी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
४ आ. जेवून जाण्यास सांगणे : रात्री देहली सेवाकेंद्रात पोचायला उशीर होणार होता; म्हणून त्यांनी आम्हाला जेवण करूनच जा, असे सांगितले.
४ इ. भेटवस्तू देणे : आम्ही तेथून परत जायला निघतांना त्यांनी मला आणि सहसाधकाला पेन्सिल अन् एक भेटवस्तू दिली.
५. पू. आजोबा आणि पू. आजी यांच्यातील चैतन्यामुळे त्रास कधी न्यून झाला ?, हे न कळणे
पू. आजी आणि पू. आजोबा यांच्यातील चैतन्यामुळे मला होणारा शारीरिक अन् आध्यात्मिक त्रास कधी न्यून झाला ?, हे मला कळलेही नाही. रात्री देहली सेवाकेंद्रात पोचल्यावर सद्गुरु पिंगळेकाकांनी याची पोचपावती दिली.
ते मला म्हणाले, पू. आजी आणि पू. आजोबा यांचा सत्संग अन् सेवा यांचा आनंद तुमच्या तोंडवळ्यावरून ओसंडून वहात आहे.
६. सद्गुरु पिंगळेकाकांनी पू. आजींनी दिलेल्या पेन्सिलीभोवती चैतन्याची आभा दिसत असल्याचे सांगणे
पू. आजींनी आम्हाला दिलेली पेन्सिल मी सद्गुरु पिंगळेकाकांना पहाण्यास दिली. तेव्हा सद्गुरु पिंगळेकाका म्हणाले, पेन्सिलीमध्ये पुष्कळ चैतन्य असून तिच्या बाजूला चैतन्याचे वर्तुळ (आभा) दिसत आहे.
पू. आजींकडून चैतन्यमय भेटवस्तू कायमस्वरूपी लाभल्याविषयी मी पू. आजी आणि परात्पर गुरुमाऊली यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.
– श्री. अशोक शांताराम दहातोंडे, देहली (८.२.२०२०)
|