अकोला येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) विमल राजंदेकर यांच्या मृत्यूपूर्वी, मृत्यूच्या वेळी आणि मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे
कै. सौ. विमल राजंदेकर यांचा माघ शुक्ल पक्ष षष्ठी (१७.२.२०२१) या दिवशी प्रथम वर्षश्राद्ध झाले. त्यानिमित्त काल (१७ फेब्रुवारीला) त्यांचे पती श्री. शाम राजंदेकर यांना जाणवलेली त्यांच्या मृत्यूपूर्वी, मृत्यूच्या वेळी आणि मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे पाहिली. आज पुढील सूत्रे पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/451813.html
योग-वियोग आणि गुरुकृपायोग यांविषयी देवाने सुचवलेले सूत्र : सौ. विमल यांच्याशी (पत्नीशी) विवाह, हा योग आणि त्यांचा देहत्याग झाला, हा वियोग; पण साधनेने जोडून ठेवले, हा गुरुकृपायोग ! – श्री. शाम राजंदेकर, अकोला |
२. सौ. सुवर्णा प्रवीण खेर्डे (मुलगी)
२ अ. आई, होऊ कशी उतराई ?
२ अ १. प्रत्यक्ष भगवंत आपल्यासमोर बसला आहे, असा भाव ठेवून त्याच्याशी संवाद साधतच आई देवपूजेत रणमाण होत असणे आणि तिने केलेल्या भावपूर्ण पूजेमुळे दिवसभर त्या सात्त्विक लहरी घरात फिरत आहेत, असे जाणवणे : जिच्या उत्तम संस्कारांनी माझे आयुष्य सौख्याचे, ईश्वराप्रती कृतज्ञतेचा भाव असणारे झाले, ज्या मातेने अध्यात्म आणि नामसाधना यांचे महत्त्व जाणून घेण्याचे संस्कार केले, तिच्याबद्दल होऊ कशी उतराई ? हेच भाव मनात येतात. इतरांना क्षमा करणे, अगदी छोट्याशा गोष्टीने समोरची व्यक्ती अनावधानाने जरी दुखावली गेली, तरी तिची लगेच क्षमा मागणे, हे तिच्या अंगवळणीच पडले होते. ती देवपूजा भावपूर्ण करायची. प्रत्यक्ष भगवंत आपल्यासमोर बसला आहे, असा भाव ठेवून त्याच्याशी संवाद साधतच ती देवपूजेत रणमाण व्हायची. तिने केलेल्या भावपूर्ण पूजेमुळे दिवसभर त्या सात्त्विक लहरी घरात फिरत आहेत, असे जाणवत असे.
२ अ २. आईने स्वयंपाक करतांना विविध स्तोत्रे म्हणणे : आई स्वयंपाक करतांना श्रीसूक्त, गजानन महाराजांच्या एकवीस अध्यायांचे सार, गणेशस्तोत्र, विष्णुसहस्रनाम, श्लोक इत्यादी म्हणायची. हे सर्व तिला मुखाद्गत होते. त्यामुळे आम्हाला प्रतिदिन सात्त्विक अन्नाचा लाभ होत होता.
२ अ ३. आईच्या गुणांचे संस्कार झाल्याने त्याचा लाभ सासरी गेल्यानंतर होणे आणि तेथे सर्वांची मने जिंकता येणे : तिच्या सर्व गुणांचे संस्कार आमच्यावर झाले. सगळे सण-वार एकत्र कुटुंबपद्धतीत नियमित केले जातात. आईचा त्यात नेहमीच पुढाकार असायचा. या सर्वांचा एकत्रित लाभ मला सासरी गेल्यानंतर झाला आणि तेथे सर्वांची मने जिंकता आली.
२ आ. मृत्यूपूर्वी
२ आ १. अतीदक्षता विभागात भरती केल्यावर आईच्या तोंडवळ्यावर तेज जाणवणे आणि तिचे सतत नामस्मरण चालू आहे, असे वाटणे : आई जवळपास १० दिवस अतीदक्षता विभागात भरती होती. तिच्या आजूबाजूला अनेक व्याधीग्रस्त व्यक्ती वेदनेने विव्हळत होत्या; परंतु आईच्या तोंडवळ्यावर तेज जाणवत होते. तिच्याकडे पाहून शांत वाटत होते. ती सर्वकाही परम पूज्यांवर सोपवून चिंतामुक्त झाली आहे आणि तिचे सतत नामस्मरण चालू आहे, असे जाणवत होते. तिच्याभोवती आणि तिला लावलेल्या उपकरणांभोवती एक पांढरे शुभ्र तेजोवलय फिरत असल्याचे जाणवत होते.
२ आ २. आईच्या सतत जाणवत असलेल्या आध्यात्मिक बळामुळे आणि परम पूज्यांच्या कृपादृष्टीमुळेच त्या कालावधीत माझे मन स्थिर राहिले.
२ आ ३. आईच्या निधनाच्या आदल्या रात्री स्वप्नात एक मोठा दरवाजा दिसणे, तो दरवाजा उघडला गेल्यावर देवता आणि परात्पर गुरु डॉक्टर आईच्या स्वागतासाठी उभे असलेले दिसणे, त्यांनी तिला श्रीविष्णुकडे नेणे अन् श्रीविष्णूच्या हृदयस्थानात असलेल्या सिंहासनावर ती स्थानापन्न होणे : वसंतपंचमीच्या रात्री (आईच्या निधनाच्या आदल्या रात्री) मला स्वप्नात एक मोठा दरवाजा दिसला. तिथे आई उभी होती. थोड्या वेळातच दरवाजा उघडला गेला आणि समोर गणपति, महालक्ष्मी, रेणुकादेवी, शिव अन् परात्पर गुरु डॉक्टर तिच्या स्वागतासाठी उभे होते अन् ते तिला घेऊन जात होते. दूरवर श्रीविष्णु भगवान आसनस्थ होता. तिथे पोचल्यानंतर श्रीविष्णूच्या हृदयस्थानात असलेल्या सिंहासनावर आई स्थानापन्न झाली आणि ती मला हसून हात दाखवत आहे, असे दिसले. मला परम पूज्यांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटू लागली.
२ आ ४. आईचे निधन होणार असल्याचे कळल्यावर वाईट वाटणे, वडिलांनी परात्पर गुरु डॉक्टर आपल्या पाठीशी असल्याने काळजीचे कारण नाही, हे लक्षात आणून देणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांची आठवण येताच दुःख सहन करण्याची शक्ती मिळणे : आईच्या शेवटच्या क्षणी मला तिथे उपस्थित रहाता आले. ही केवळ गुरुदेवांचीच कृपा आहे. आता तिचे निधन होणार, हे कळले, तेव्हा एक मुलगी म्हणून मला वाईट वाटले; परंतु वडिलांनी आम्हाला आईची साधना पुष्कळ चांगली असल्यामुळे तिला उत्तम गती प्राप्त होणार आहे. परात्पर गुरु डॉक्टर आपल्या पाठीशी असल्याने काळजीचे कारण नाही, हे लक्षात आणून दिले. परम पूज्यांची आठवण येताच आम्हाला पुष्कळ धीर येऊन दुःख सहन करण्याची शक्ती मिळाली.
२ इ. मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे
१. निधनानंतर घरी आणल्यानंतरही ती ईश्वराच्या चरणी लीन झाली आहे, असेच प्रत्येकाला वाटत होते.
२. कुठेही रडारड नाही कि गोंधळ नाही. तेथे उपस्थित असलेल्या सर्वांचाच नामजप होत होता.
३. सर्व दुःखांचे हरण गुरुमाऊलींनी केले होते. त्यामुळे त्यांच्या चरणी सतत कृतज्ञता व्यक्त होत होती. (९.१.२०२१)
३. श्री. राजेश राजंदेकर (मुलगा)
३ अ. गुरूंच्या कृपेमुळेच आईचे जीवन कृतार्थ झाले, असे जाणवणे आणि ती अत्यवस्थ असतांनाही तिचा नामजप चालूच होता, असे लक्षात येणे : आईच्या शेवटच्या घटकेच्या वेळी आम्ही उभयतां रुग्णालयात होतो. तिच्या तोंडवळ्यावर तेज जाणवत होते. आम्ही बोलत असतांना तिला ते कळत असावे, असे जाणवत होते. परम पूज्यांची तिच्यावर कृपादृष्टी असल्यामुळेच ती कृतार्थ झाली आहे, असे वाटले. त्याही स्थितीत तिचा नामजप चालूच होता, असे प्रकर्षाने जाणवले.
३ आ. वडिलांची पुष्कळ काळजी वाटणे; पण केवळ संतांचे बोलणे ऐकूनच ती दूर होणे आणि संतांच्या बोलण्यातून चैतन्य कसे कार्य करते ?, हे प्रथमच अनुभवणे : वडिलांची मला पुष्कळ काळजी वाटत होती; पण केवळ संतांचे बोलणे ऐकूनच ती दूर झाली. संतांच्या बोलण्यातून चैतन्य कसे कार्य करते ?, हे आम्ही प्रथमच अनुभवले. सद्गुरु गाडगीळकाका रामनाथी आश्रमातून नामजप करत होते, सूक्ष्मातून आवरण काढत होते आणि त्याचे दृश्य परिणाम आम्हाला येथे लगेच दिसत होते, उदा. सद्गुरु काकांनी सूक्ष्मातून आईवरचे आवरण काढत असतांना आईच्या पलंगाची दिशा पालटता येते का ?, हे बघायला सांगितले होते. ती रात्रीची वेळ असून तेथील कर्मचारी ऐकतील का ?, असा विचार माझ्या मनात आला; पण आज्ञापालन म्हणून मी अतीदक्षता विभागात गेलो आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. आईच्या पलंगाची दिशा तेथील कर्मचार्यांनी आधीच पालटलेली होती; म्हणजे तिकडे संतांच्या मनात विचार आल्यावर इकडे ती कृतीही झाली. ही अद्भुत किमया गुरुमाऊलींमुळेच होऊ शकली.
३ इ. आई-वडील सतत देवद आश्रमात सेवेला जात असत. त्यामुळे आई नसतांना दुःख होऊ नये, अशी माझ्या मनाची सिद्धता देवाने आधीच करवून घेतली होती.
३ ई. आतासुद्धा आईचे निधन झाले, तरी ती वैकुंठातून (रामनाथी आश्रमातून) निर्गुणाची सेवा करत आहे, असे मला वाटते.
३ उ. आईचे निधन झाल्यावर तिला घरी आणल्यानंतर घरात वसंतपंचमीचा उत्सव चालू आहे, अशी सिद्धता वडिलांनी साधकांच्या साहाय्याने करवून ठेवलेली असणे आणि त्यामुळे तेथील वातावरण सात्त्विक असणे : आईचे निधन झाल्यावर आम्ही तिला घरी आणले. तेव्हा घरात वसंतपंचमीचा उत्सव चालू आहे, अशी सिद्धता वडिलांनी साधकांच्या साहाय्याने करवून ठेवली होती. यंत्रावर नामजप चालू होता. आईला ठेवायच्या अंथरुणावर परम पूज्यांनी येथे असतांना वापरलेली चादर घातली होती. सभोवती नामपट्ट्यांचे मंडल केले होते. त्यामुळे भेटायला येणारे रडण्याऐवजी दर्शन घेऊन नामजपच करायला लागले. हा सर्व आईच्या सात्त्विकतेचा आणि परम पूज्य डॉक्टरांच्या चैतन्याचाच परिणाम होता. असे दहा दिवस जाणवत होते.
अशा दुःखद प्रसंगातही आम्हा सर्वांना स्थिर ठेवले, दुःखाची किंचितही झळ पोचू दिली नाही, ही सर्व केवळ आणि केवळ परम पूज्य गुरुमाऊलींचीच कृपा आहे. त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
४. सौ. रुचिरा राजेश राजंदेकर (सून)
४ अ. चरचरातील भगवंत अनुभवणार्या आई ! : २५.२.२००१ या दिवशी मी राजंदेकर घराण्यात सून म्हणून आले आणि मी कळत नकळत सनातन संस्थेशी जोडले गेले. अनेक संत आणि साधक आमच्या घरी येत असत. त्यामुळे मला संतांची लक्षणे काय असतात ?, हे समजले. पूर्वी परम पूज्य घरी येऊन गेले. तेव्हा त्यांचे दर्शन होताच मला माझ्या जीवनाचे सार्थक झाले, असे वाटले.
संतांची लक्षणे मी आईंमध्ये अनुभवली. त्या पहाटे ३.३० वाजता उठून कृष्णाच्या भूपाळ्या म्हणत. त्यांची देवपूजा म्हणजे देवाशी एकरूप होणे, असेच असायचे. गॅसच्या शेगडीला अग्नीदेवता समजून त्या तिची पूजा करत असत. आजपर्यंत प्रार्थना केल्याविना आमच्या घरी शेगडीवर भांडे चढले नाही. पोळपाट, तवा, विळी यांच्याप्रती त्या कृतज्ञता व्यक्त करत. मी हे सर्व कुतूहलाने पाहिले की, त्या म्हणत, अगं, चरचरात भगवंत असतो, तो अनुभवता आला पाहिजे, असे आमचे गुरु सांगतात. मग आपणही ते कृतीतून अनुभवले पाहिजे. कुठलाही पदार्थ असो, देवाला नैवद्य दाखवल्याविना आम्ही तो खाल्ला नाही. मला आणि मुलांनाही तीच सवय लागली.
४ आ. आनंदी : त्यांच्या तोंडवळ्यावर मी नेहमीच आनंद बघत असे. संत जसे सदैव आनंदी असतात आणि दुसर्यांनाही आनंद देतात, तसेच आईंचे वागणे होते.
४ इ. चुकांविषयी संवेदशीलता : त्यांच्याकडून काही चूक झाली, तर त्यांना खंत वाटत असे. माझ्या संदर्भातही एखादी चूक झाली, तर त्या लगेच माझी क्षमा मागत असत. मला माझ्या चुका निर्भीडपणे सांगत जा, असे त्या नेहमी म्हणत. ऋतुजाचीसुद्धा (नातीचीसुद्धा) त्या क्षमा मागायच्या. त्या म्हणायच्या, अगं, तिच्यातही मी देवाला बघते.
४ ई. सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणे : त्या सर्वांशीच प्रेमाने वागायच्या. घरी आलेल्या प्रत्येकाच्या हातावर काहीतरी प्रसाद दिल्याविना त्यांना चैन पडत नसे. मला त्यांचा १९ वर्षे सहवास लाभला. त्यात एकही दिवस त्या मला वाईट बोलल्या नाहीत.
४ उ. आसक्ती नसणे : त्यांना कपडे, दागिने इत्यादी गोष्टींची कधीच आसक्ती नव्हती. जे असेल, ते त्या आनंदाने लेऊन असायच्या. माझ्यासाठी हे आण, असे त्या कधीच म्हणाल्या नाहीत.
४ ऊ. संत होण्याचा ध्यास असणे आणि आध्यात्मिक पातळीत वाढ झाल्यावर जणू वैराग्यच पत्करणे : वर्ष २०१४ मध्ये त्यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाली. तेव्हा त्या पुष्कळ आनंदी होत्या. मला संत व्हायचे आहे. मला ईश्वराला भेटायचे आहे. त्यासाठी मी काय प्रयत्न करू ? मला काहीच कळत नाही, असे त्या मला सारख्या म्हणायच्या. आध्यात्मिक पातळी वाढत गेल्यावर त्यांनी जणू वैराग्यच पत्करले होते.
४ ए. जलद प्रगती होण्यासाठी सहा मास आश्रमात येऊन रहा, असे संतांनी सांगणे, त्यासाठी प्रयत्न करणे; पण तसे करता न आल्याने खंत वाटणे : एकदा आम्ही रामनाथी आश्रमात गेलो असतांना आम्हाला संतांचा सत्संग लाभला. त्यात आईंनी त्यांना विचारले, अधिक जलद प्रगती होण्यासाठी मी काय प्रयत्न करू ? तेव्हा संतांनी त्यांना सहा मास आश्रमात येऊन रहा, असे सांगितले. तेव्हापासून त्यांना आश्रमात येण्याचा ध्यासच लागला. त्यांचे तसे प्रयत्न चालू झाले; परंतु सलग सहा मास त्या आश्रमात राहू शकल्या नाहीत, याची त्यांना खंत वाटत राहिली.
४ ऐ. देवद आश्रमातून घरी आल्यावर आश्रमात जाण्याची ओढ असणे : देवद आश्रमातून महालय श्राद्धासाठी त्या घरी आल्या, तरी त्यांचे लक्ष परत जाण्याकडेच अधिक होते. त्या मला सतत विचारत असत, मला आश्रमात लवकर जाता येईल ना गं ? त्या शरिराने इकडे होत्या; पण त्यांचे मन सतत आश्रमाकडेच होते. सतत विष्णुसहस्रनाम चालू होते. त्यांची सात्त्विकता आणि तेज वाढत असल्याचे मला जाणवत होते. गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! (९.१.२०२१)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |