खर्रा खाण्याच्या व्यसनावरून पत्नीला घटस्फोट दिला जाऊ शकत नाही ! – नागपूर खंडपिठाचा निर्णय

नागपूर – पत्नी खर्रा खाते म्हणून त्या कारणावरून घटस्फोट दिला जाऊ शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने १५ फेब्रुवारी या दिवशी दिला आहे. पत्नी खर्रा खाते म्हणून येथील एका शंकर नावाच्या व्यक्तीने न्यायालयात अर्ज केला होता, त्या वेळी न्यायालयाने हा निर्णय दिला.

शंकर आणि रिना यांचा १५ जून २००३ या दिवशी विवाह झाला होता. त्यांना २ अपत्य असून १ मुलगा आणि मुलगी आहे. कालानंतराने दोघांचे खटके उडायला प्रारंभ झाला. यात ‘रिना ही घरातील काम करत नाही. शुल्लक कारणावरून भांडण करते, कुणालाही न सांगता माहेरी निघून जाते’, यांसारख्या छोट्या छोट्या कारणांवरून कौटुंबिक वाद असल्याने ती विभक्त झाली. त्यानंतर ‘ती खर्रा खाते’ म्हणून पतीने घटस्फोट मिळावा, यासाठी न्यायालयात खटला प्रविष्ट केला. रिना हिला पोटाचा आजार झाला आहे. खर्राच्या व्यसनानाने सिस्ट झाल्याने उपचाराचा व्यय करणार नाही, असेही पती शंकरकडून सांगण्यात आले.

‘ज्या कारणावरून घटस्फोट मागण्यात आला आहे, ते कारण किरकोळ स्वरूपाचे आहे. संसार करतांना हे विषय सामान्य असून असे वाद घडत रहातात. यासह खर्रा खाते म्हणून घटस्फोट देणे योग्य नाही; पण खर्रा खाणे ही गोष्ट गंभीर आहे’, असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.