वेंगुर्ला शहरासह तालुक्यातील अवैध मद्यव्यवसाय बंद करा ! – भाजप महिला मोर्चाची मागणी
अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून अशा अवैध व्यवसायांवर कारवाई का करत नाही ?
वेंगुर्ला – शहरात पोलीस ठाण्यापासून अवघ्या १०० ते २०० मीटर अंतरात दिवसाढवळ्या मद्यविक्री चालू आहे, तसेच तालुक्यातही अवैध मद्यव्यवसाय चालू आहेत. यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अन्यथा ‘भाजप महिला मोर्चा’च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी महिला मोर्चाच्या शिष्टमंडळाने वेंगुर्ला पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांना निवेदनाद्वारे दिली आहे.
वेंगुर्ला शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस अवैध मद्यविक्री चालू आहे. याकडे पोलिसांचे लक्ष वेधण्यासाठी भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा सौ. स्मिता दामले यांच्यासह अधिवक्त्या सुषमा खानोलकर, नगरसेविका शीतल आंगचेकर, शहराध्यक्ष प्रार्थना हळदणकर यांच्यासह अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
या वेळी नगरसेविका शीतल आंगचेकर यांनी रामघाट रोड येथे चालू असलेल्या मद्यव्यवसायाविषयी विचारणा केली. यावर पोलीस निरीक्षक मोरे यांनी ‘आम्हाला ठाऊक नाही. तुम्ही अशा ठिकाणांची नावे द्या, आम्ही नक्की कारवाई करू’, असे सांगितले. (जनतेला ठाऊक आहेत, ते अवैध व्यावसाय ठाऊक नसलेले पोलीस ! – संपादक)
अवैध मद्यव्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी
केवळ आम्ही आलो म्हणून ८ दिवस हे प्रकार बंद रहातील; मात्र हे मद्यव्यवसाय कायमस्वरूपी बंद करावेत, अशी आमची मागणी आहे. बर्याच सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळी तरुण मुले मद्य पीत असल्याचे दिसून येते. वेंगुर्ले नगरपरिषदेच्या वतीने राबवल्या जाणार्या स्वच्छता मोहिमेत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मद्याच्या बाटल्यांचा खच सापडतो. त्यामुळे संसार उद्ध्वस्त करणार्या या मद्यव्यवसायांवर कायमस्वरूपी आळा घालावा, अशी मागणी या महिलांनी केली आहे.