मुंबई महापालिकेने विकासकामांचा निधी का वळवला याविषयी चर्चा !
मुंबई – मुंबईतील नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात विकासकामे करण्यासाठी निधीची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे हा ३९० कोटी रुपयांचा निधी गेला तरी कुठे ?, असा प्रश्न नगरसेवकांना पडला आहे. हा निधी कोरोनासाठीच्या उपाययोजनांवर व्यय करण्यात आला असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे.
हा निधी पालिकेच्या वर्ष २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात तरतूद केलेला निधी होता. कोरोनाचा संसर्ग असल्याने मास्क, सॅनिटायझर, तसेच इतर कोविडविषयक उपाययोजनांसाठीच्या सामग्रीवर व्यय करण्यास मान्यता दिली होती. त्यासाठी तरतूद केलेल्या निधीपैकी १५ टक्केच निधी व्यय झाला होता.
मुंबई महानगरपालिका प्रशासनाला कोरोनाच्या काळात महसूल मिळालेला नाही. त्यामुळे पालिकेचे आर्थिक गणित बिघडले आहे. कोरोनावर गेल्या ११ मासांत २ सहस्र कोटी रुपये व्यय करण्यात आले आहेत. त्यामुळे निधी अल्प पडत असल्याने प्रशासनाने नगरसेवकांच्या विकासकामांचा निधी वळता केला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सर्वपक्षीय गटनेते पालिका आयुक्तांची भेट घेऊन हा निधी का वळवण्यात आला ?, याचा जाब विचारणार आहेत. तांत्रिक चूक झाली असल्यास ती त्वरित सुधारून हा निधी पुन्हा विकासकामांसाठी द्या, अशी मागणी करणार असल्याचे नगरसेवकांनी सांगितले.