मंगळुरू (कर्नाटक) येथील साधिका कु. माधवी पै पहिल्याच प्रयत्नात सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण
मंगळुरू (कर्नाटक) – येथील साधिका कु. माधवी पै या पहिल्याच प्रयत्नात सनदी लेखापालाच्या (सी.ए.ची) अंतिम परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. दोन ग्रुपमध्ये एकाच वेळी उत्तीर्ण होऊन त्यांनी विशेष यश प्राप्त केले आहे. मंगळुरूच्या साधिका सौ. लक्ष्मी पै यांची ती सर्वांत मोठी कन्या आहे. त्या नियमितपणे गुरुसेवा करतात. कु. माधवी दक्षिण कन्नड जिल्ह्याच्या सनातन प्रभातच्या विज्ञापनांच्या संरचनेची सेवा करतात. ‘मला केवळ गुरुकृपेमुळे यश मिळाले’, असे मनोगत त्यांनी कृतज्ञताभावाने व्यक्त केले आहे.
कु. माधवीविषयी त्यांची आई सौ. लक्ष्मी पै यांनी व्यक्त केलेला अभिप्राय !
कु. माधवीमध्ये काही विशिष्ट गुण आहेत. नियोजनबद्धरीतीने अध्ययन करणे, परिश्रम घेणे, स्वयंशिस्त, मनमोकळेपणा, संघर्ष करणे या सर्व गुणांमुळे तिला अध्ययनासह गुरुसेवा नियमितपणे करणेही साध्य झाले. कितीही परिश्रम केले, तरी समयमर्यादेत गुरुसेवा परिपूर्ण करण्याचा तिचा प्रयत्न असायचा. तिला वरचेवर प्रकृतीचा त्रासही होत असे; परंतु जेव्हा विज्ञापनांच्या रचनेची सेवा मिळायची, तेव्हा ती चिकाटीने समयमर्यादेत पूर्ण करून पाठवत असे. स्वतःच्या धाकट्या बहिणीला साधनेचे, सेवेचे महत्त्व सांगून तिच्याकडूनही साधना करवून घेण्याचा ती प्रयत्न करत असे. ‘पू. रमानंद गौडा यांचे मार्गदर्शन, तसेच कृपाशीर्वाद यामुळे ही साधना माझ्याकडून होत आहे’, अशी सदैव कृतज्ञता ती व्यक्त करते. आजच्या तिच्या यशाच्या मागे केवळ संतांचे कृपाशीर्वाद आणि प.पू. गुरुदेवांची अपार कृपाच कारणीभूत आहे, हे निश्चित! त्यासाठी श्री गुरुचरणी अनंत कोटी कृतज्ञता.