म्यानमारमध्ये सैन्याच्या बंडखोरीवरून नागरिकांचे चिनी दूतावासासमोर आंदोलन
रंगून (म्यानमार) – म्यानमारमध्ये सैन्याकडून करण्यात आलेल्या बंडखोरीच्या विरोधात सहस्रो लोकांनी रस्त्यावर उतरून आंदेलन चालू केले आहे. येथील नागरिक सैन्य हुकूमशाह ‘कमांडर इन चीफ जनरल’ मिन आँग हलेइंग यांच्याविरोधात मोर्चे काढत आहेत. काही ठिकाणी नागरिकांनी थेट चीनविरोधात मोर्च्यांचे आयोजन केले आहे. ‘चीन शांतताप्रिय म्यानमारमध्ये अशांतता पसरवण्याचे काम करत आहे’, असा आरोप आंदोलकांनी केला आहे. म्यानमारमधील चिनी दूतावासाच्या कार्यालयाबाहेरही आंदोलन करण्यात आल्याचे वृत्त आहे. अनेक आंदोलकांनी ‘चीनची आम्हाला लाज वाटते’, असे फलक हातात पकडले होते. काही ठिकाणी चीनसमवेत रशियाही या बंडखोरीच्या कटामध्ये सहभागी आहे का ? असा प्रश्न उपस्थित करणारे फलक घेऊन नागरिक आंदोलनात सहभागी झाले. ‘समाजातील सर्वच स्तरातील नागरिक लोकशाही मार्गाने निवडून दिलेल्या सरकारच्या हातात पुन्हा देशाचा कारभार द्यावा’, अशी मागणी करत आहेत.