पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ

पुणे, १६ फेब्रुवारी (वार्ता.) – आठवडाभरापासून पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत  आहे. बाजारपेठा, कार्यालये, उपाहारगृह आणि अन्य खासगी कार्यक्रमांना गर्दी, लोकांचा निष्काळजीपणा यांमुळे कोरोनाचा फैलाव होत आहे. दहा दिवसांपूर्वी ४ ते ५ टक्के असलेला संसर्ग वाढीचा दर गेल्या आठवड्यात १० टक्क्यांपर्यंत पोचला आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे साहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अत्यवस्थ रुग्णांना भरती करून घेण्यासाठी खाटा उपलब्ध नाहीत, असे खासगी रुग्णालयांतून सांगण्यात येत आहे. अशा रुग्णांना ससून किंवा डॉ. नायडू रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात आहे, अशी तक्रार रुग्णांचे नातेवाईक करत आहेत.

पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव अल्प होत असल्याने काही खासगी रुग्णालये सामान्य रुग्णसेवेसाठी टप्प्या-टप्प्याने खुली करण्यात येत आहेत; मात्र कोरोना रुग्णांना काही खाटा राखीव ठेवण्याचे बंधनही महापालिकेने घातलेले आहे. असे असले तरी गेल्या आठवड्यात रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने प्रमुख रुग्णालयातील राखीव खाटा पूर्ण क्षमतेने भरल्याचे दिसून येत आहे.