राज्यशासन वीज ग्राहकांमध्ये दहशत निर्माण करत आहे ! – विदर्भ राज्य आघाडीचा आरोप
नागपूर येथे वीज माफ करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने धरणे आंदोलन
नागपूर – राज्यात महाविकास आघाडीच्या शासन जनतेला वीजमाफी देण्याऐवजी ग्राहकांच्या वीज कापण्याच्या धमक्या देत आहे, असा आरोप विदर्भ राज्य आघाडीचे नेते राम नेवले यांनी केला. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने याविषयी १५ फेब्रुवारी या दिवशी येथील संविधान चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. विदर्भात ७० टक्के वीज सिद्ध होते. त्यासाठी पाणी, भूमी, कोळसा ही संपत्ती विदर्भाची आहे, तसेच प्रदूषणाचे दुष्परिणामही विदर्भाची जनता सोसत आहे. त्यामुळे किमान २०० युनिट विदर्भाच्या जनतेला विनामूल्य द्यावे, अशी मागणी विदर्भ राज्य आघाडीच्या वतीने करण्यात आली.
‘वीज मंडळाचे कर्मचारी पोलिसांना समवेत घेऊन ग्राहकांची वीजजोडणी कापत आहेत. हे सरकार अतिरेकीपणाचे काम करत आहे’, असे म्हणत राम नेवाले यांनी निषेध व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘३०० युनिटपर्यंत वीज देयक माफ करू’, असे आश्वासन दिले होते, तसेच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही ‘१०० युनिट माफ करू’, असे म्हटले होते. यासाठी १ सहस्र ८५० कोटी रुपयांचा प्रस्ताव देण्यात आला होता; परंतु आज जबरदस्तीने वीजजोडणी कापण्याचे काम केले जात आहे. शासनाने वीजजोडणी कापल्यास आम्ही जोडून देऊ, असेही ते म्हणाले.