अकोला येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) विमल राजंदेकर यांच्या मृत्यूपूर्वी, मृत्यूच्या वेळी आणि मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे
कै. (सौ.) विमल राजंदेकर यांचे माघ शुक्ल पक्ष षष्ठी (१७.२.२०२१) या दिवशी प्रथम वर्षश्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या मृत्यूपूर्वी, मृत्यूच्या वेळी आणि मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. श्री. शाम राजंदेकर (पती)
१ अ. देवद आश्रमातून काही दिवसांसाठी घरी जात असतांना ‘आपण लवकर आश्रमात परत येऊ शकणार नाही’, असा विचार उभयतांच्या मनात येणे : ‘वर्ष २०१९ च्या गणेशोत्सवाच्या कालावधीत आम्ही दोघेही (मी आणि पत्नी सौ. विमल) देवद आश्रमात सेवेसाठी गेलो होतो. पितृपक्षात घरी वडिलांचे महालय श्राद्ध होते; म्हणून आम्ही घरी जाण्यासाठी पू. (सौ.) अश्विनीताईंची (पू. (सौ.) अश्विनी पवार यांची) अनुमती घ्यायला गेलो. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘मी तुम्हाला ‘नाही’ म्हणणार नाही; पण ‘तुम्ही लवकर यावे’, असे वाटते.’’ बाहेर पडतांना ‘आपण आश्रमात लवकर परत येऊ शकणार नाही’, असा विचार आम्हा दोघांच्याही मनात आला आणि आम्ही तसे एकमेकांना सांगितले सुद्धा. यावर सौ. विमल (पत्नी) म्हणाल्या, ‘‘काय ठाऊक, परम पूज्यांच्या मनात काय आहे ? मला सेवाच करायची आहे, मायेत अडकायचे नाही.’’
१ आ. शेवटचे आजारपण
१ आ १. देवद आश्रमात जाण्याची सिद्धता पूर्ण होणे आणि रात्री सौ. विमल यांची प्रकृती अकस्मात् बिघडून त्यांना श्वास घेणे कठीण होणे अन् रुग्णालयात भरती करावे लागणे : अकोल्याला आल्यावर प्रथम देवद आश्रमात जाण्यासाठी आरक्षण करायला गेलो. आम्हाला एकदम २६.१.२०२० या दिवशीचे आरक्षण मिळाले. २२.१.२०२० या दिवसापर्यंत आमची परतीची पूर्ण सिद्धता झाली. सौ. विमल संध्याकाळी चार घरी मकरसंक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमासाठी जाऊन आल्या. रात्री दीड वाजता त्यांनी मला उठवले. त्यांची प्रकृती अकस्मात् पुष्कळ बिघडल्याचे माझ्या लक्षात आले. त्यांना पुष्कळ घाम येत होता. त्यांना श्वास घेणे कठीण झाले होते. राजेशने (मुलाने) रिक्शा आणली. अत्यवस्थ स्थितीतही सौ. विमल यांनी ‘मी आता कुठला नामजप करू ?’, असे विचारले. ‘मला रुग्णालयात नेऊ नका’, असे त्या सारखे सांगत होत्या. मी त्यांना धीर देत ‘आता तू केवळ ‘परम पूज्य, परम पूज्य’ एवढेच म्हणत रहा’, असे सांगितले. रुग्णालय येईपर्यंत त्या जप करत होत्या. रुग्णालयापर्यंत पोचल्यावर दरवाजातच त्यांची शुद्ध हरपली. तेव्हापासूनच ‘सौ. विमल यांच्या संपूर्ण देहाचे नियंत्रण प.पू. गुरुमाऊलींकडे गेले’, असे मला जाणवले.
१ आ २. सौ. विमल यांच्या पलंगाभोवती सूक्ष्मातून नामपट्ट्यांचे मंडल करणे आणि सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेला पाच घंटे नामजप गुरुमाऊलींनीच पूर्ण करवून घेतल्याचे जाणवणे : रुग्णालयातील अतीदक्षता विभागातील एकूणच रज-तमाचे वातावरण बघितल्यावर तिच्या पलंगाभोवती नामपट्ट्यांचे मंडल करण्याविषयी देवाने सुचवले. मी ते सूक्ष्मातून केले आणि बाहेर येऊन नामजप करत बसलो. रामनाथी आश्रमातील श्री. योगेश जलतारे यांच्यामार्फत सद्गुरु डॉ. गाडगीळकाकांना सर्व सविस्तर कळवले. त्यांनी मला ५ घंटे आकाशदेवाचा जप आणि मुद्रा करायला सांगितल्या. मी तो घरी येऊन केला. मला त्या जपाचा विशेष परिणाम होत असल्याचे जाणवत होते. केवळ गुरुमाऊलींनीच हा पाच घंट्यांचा माझ्याकडून जप करवून घेतला. एरव्ही मला इतका वेळ बसायला होत नाही.
१ आ ३. ‘सौ. विमल यांची स्थिती आता अत्यंत नाजूक आणि गंभीर असून तुम्ही आता अधिक वाट न बघता योग्य निर्णय घ्या’, असे आधुनिक वैद्या असलेल्या साधिकेने सांगणे आणि ‘हे गुरुदेवांचेच नियोजन आहे’, असे वाटून पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होणे : २८.१.२०२० या दिवशी सकाळी ११ वाजता सौ. सुवर्णाच्या (मुलीच्या) समवेत रुग्णालयात गेलो असतांना ‘अंतिम निर्णय काय घ्यायचा ?’, याविषयी चर्चा चालू होती. तेवढ्यात समोरून आधुनिक वैद्या मनीषा भारसाकळे आल्या. त्यांनी ‘ओळखले का ?’, असे विचारले. त्या सनातनच्या साधिकाच होत्या. त्यांनी सौ. विमल यांना ओळखले होते. ‘मला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली; म्हणून कृतज्ञता वाटली आणि आनंदही झाला’, असे त्या म्हणाल्या. ‘सौ. विमल यांची स्थिती आता अत्यंत नाजूक आणि गंभीर असून तुम्ही आता जास्त वाट न बघता योग्य निर्णय घ्यावा’, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. शेवटच्या क्षणी परात्पर गुरुदेवांच्या कृपेने एका आधुनिक वैद्य साधिकेचे नियोजन झाल्याचे पाहून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. तिच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टरांनीच आम्हाला जाणीव करून दिली.
१ आ ४. सौ. विमल यांच्यासाठी जप करतांना ‘एका मोठ्या पोकळीत परात्पर गुरु डॉक्टर आणि सद्गुरु गाडगीळकाका हे विमल यांच्या निर्गुण स्तरावरील साधनेचे नियोजन करत आहेत अन् सौ. विमल यांना न्यायला विष्णुदूत आले आहेत’, असे दिसणे : मी प्रार्थना करून सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेला पाच घंट्यांचा जप करण्यास बसलो. जप कृतज्ञताभावात होत होता. माझे मन निर्विचार होऊन मला शांत वाटत होते. ‘हा जप विमलसाठी करत नसून एका उन्नत साधिकेच्या प्रगतीसाठी करत आहे’, असे मला वाटत होते. जप आज्ञापालन आणि साधना म्हणून होत होता. नामजप करतांना विमल यांच्या पलंगाभोवती पांढरा शुभ्र गोळा फिरत असल्याचे दिसत होते. पांढरे वलय निर्माण होऊन ते वरवर जात होते. पुष्कळ मोठ्या पोकळीत परात्पर गुरु डॉक्टर आणि सद्गुरु गाडगीळकाका हे विमल यांच्या निर्गुण स्तरावरील साधनेचे नियोजन करतांना दिसत होते. ‘विमल यांना न्यायला विष्णुदूत आले आहेत’, असे दिसत होते.
१ आ ५. सौ. विमल यांच्या मेंदूला रक्तपुरवठा होत नसल्याने हृदय बंद पडण्याच्या स्थितीत आहे’, असे आधुनिक वैद्यांनी सांगणे आणि सर्वानुमते ‘वसंतपंचमीच्या दिवशी व्हेंटिलेटर काढायचे’, असा निर्णय घेणे : रात्री आठ वाजता आम्ही सर्व नातेवाईक आणि कुटुंबाचे आधुनिक वैद्य ‘पुढे काय निर्णय घ्यायचा ?’, याची चर्चा करण्यास बसलो. आमच्या आधुनिक वैद्यांनी सर्व अभ्यास करून तेच सांगितले, जे रुग्णालयात आधुनिक वैद्या साधिकेने सांगितले होते. आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘सौ. विमल यांचे हृदय कमजोर झाल्यामुळे त्यांच्या मेंदूला रक्तपुरवठा होत नाही आणि हृदय बंद पडण्याच्या स्थितीत आहे. तेव्हा ‘व्हेंटिलेटर कधी काढायचे ?’, हे आपण सांगायचे आहे.’’ सर्वानुमते २९.१.२०२१ या दिवशी वसंतपंचमी असल्याने ‘त्या दिवशी व्हेंटिलेटर काढायचे’, असा निर्णय घेतला.
१ आ ६. सर्व संत आणि सद्गुरु यांचे दूरभाष आल्यामुळे वातावरण चैतन्यमय वाटणे, सौ. विमल यांचे व्हेंटिलेटर काढल्यावर श्वास स्वबळावर २४ घंटे चालू असणे अन् ‘सौ. विमल यांची आध्यात्मिक पातळी चांगली असल्यामुळे असे झाले’, असे सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगणे : सौ. विमल यांचे ‘व्हेंटिलेटर’ वसंतपंचमीला काढले. तेव्हा त्यांचा तोंडवळा तेजस्वी वाटत होता. रुग्णालयात येणारे रुग्णांचे नातेवाईकही म्हणत होते, ‘‘या किती सुंदर दिसतात !’’ श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सद्गुरु राजेंद्र शिंदे, सद्गुरु जाधवकाका, पू. पात्रीकरकाका इत्यादी सर्वांचे दूरभाष सतत येत होते. त्यामुळे सर्वत्र चैतन्यमय वाटत होते. ‘व्हेंटिलेटर काढल्यावर सर्वसाधारणपणे १५ – २० मिनिटांतच निधन होते’, असे आधुनिक वैद्य सांगत होते; परंतु सौ. विमल यांचा श्वास स्वबळावर २४ घंटे चालू होता. हे सद्गुरु गाडगीळकाकांना सांगितल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘सौ. विमल यांची आध्यात्मिक पातळी चांगली असल्यामुळे असे झाले.’’
१ इ. निधन : त्यांचा प्राण जाण्यापूर्वी मी शेजारीच बसलो होतो. मी त्यांच्या मस्तकावर हात ठेवून श्रीविष्णुसहस्रनाम म्हणावयास प्रारंभ केला. ते म्हणत असतांना त्यांच्या टाळूवर गुदगुल्या झाल्याचे मला जाणवले; पण ‘प्राण कुठून गेला ?’, हे मला कळले नाही. नंतर त्यांचा प्राण आज्ञाचक्रातून गेल्याचे सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितले.
१ ई. मृत्यूनंतर
१ ई १. अग्नीसंस्कार झाल्यानंतर जमलेल्या सर्वांना साधनेविषयी सांगणे : अग्नीसंस्कार झाल्यानंतर गुरुजींनी शांतीपाठ म्हणायला आरंभ करण्यापूर्वी सर्व जण उभे राहिले असता माझ्या मनात विचार आला, ‘एवढे लोक जमलेत, तर त्यांना साधनेविषयी काहीतरी सांगूया.’ तेव्हा देवाने माझ्याकडून वदवून घेतले, ‘जन्म आणि मृत्यू या जीवनातील सत्य घटना आहेत. ‘त्यामधील काळात आपण कसे वागायचे ?’, हे महत्त्वाचे असते. ‘या जिवाने (सौ. विमल यांनी) धर्मशिक्षण देणार्या सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करून आपले जीवन आनंदमय आणि सुखमय जगून आज जीवनयात्रा संपवली; परंतु ‘त्यांचा साधनेत प्रगती करण्याचा पुढील प्रवास चालू झाला’, असे आम्ही अनुभवलेल्या गोष्टींमुळे आमच्या लक्षात आले आहे. ‘आपणा सर्वांना योग्य साधना करण्याची संधी मिळू दे’, अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. आपण सर्व जण आपुलकीने आलात त्याविषयी आभार मानतो.’’ नंतर गुरुजींनी शांतीमंत्र म्हटला.
१ उ. सौ. विमल यांनी साधनेत साहाय्य केल्यामुळे त्यांच्या मृत्यूच्या वेळी स्थिर रहाता येणे : प.पू. गुरुमाऊलींनी वर्ष २०१४ मध्येच सौ. विमल यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित केली. तेव्हापासूनच आमचे व्यावहारिक पती-पत्नीचे नाते संपले. मी त्यांना मुक्त झालेला एक जीव आणि मला स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेत साहाय्य करणारी साधिकाच समजायला लागलो. त्यासुद्धा मला ‘माझे स्वभावदोष आणि अहं यांचे प्रकटीकरण कुठल्या प्रसंगात जाणवले ?’, हे स्पष्टपणे सांगत असत. त्यामुळेच मला स्वभावदोष दूर करणे सुलभ झाले. त्यामुळेच रुग्णालयातील वातावरणात मला स्थिर रहाता आले. मी मुलांनासुद्धा धीर देऊ शकलो. हे सर्व केवळ गुरुमाऊलींच्या कृपेमुळेच होऊ शकले.’ (९.१.२०२१)
(क्रमश:)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |