भाजप प्रदेशाध्यक्षांना स्वत:च्या जिल्ह्यात मतदारसंघही न मिळणे दुर्दैैवी ! – जयंत पाटील, पालकमंत्री, सांगली
सांगली, १६ फेब्रुवारी – कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी त्यांचा मतदारसंघ भक्कम केला होता. पुन्हा भाजपचीच सत्ता येणार असे सांगणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना स्वतःचा कोल्हापूर जिल्हा सोडून पुण्यातील मतदारसंघात निवडणूक लढवावी लागली. ज्यांनी कोथरूड मतदारसंघात पकड निर्माण केली त्या कुलकर्णी यांना बाजूला करून चंद्रकांतदादा यांनी निवडणूक लढवली. भाजप प्रदेशाध्यक्षांना स्वत:च्या जिल्ह्यात मतदारसंघही न मिळणे दुर्दैवी आहे, अशी टीका सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली.
येथील भावे नाट्य मंदिरात जिल्हा परिषदेच्या वतीने दिले जाणारे स्मार्ट ग्राम पुरस्कार आणि आदर्श शाळा उपक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. पुणे येथे घडलेल्या पूजा चव्हाण या विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणी सरकारमधील एका मंत्र्यांवर आरोप होत आहेत. या प्रकरणी त्यांचा प्रत्यक्ष संबंध आहे का ?, हे खरेखोटे तपासले पाहिजे; मात्र दोषी असतील, तर कारवाई होईल असेही पाटील यांनी या वेळी सांगितले.