महुआबाईंचे तर्कट !
महुआ मोइत्रा या ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या प्रथमच लोकसभेवर निवडून आलेल्या खासदार संसदेत म्हणाल्या होत्या, ‘सरकार नेहमी आम्हाला निधर्मी, देशद्रोही, आतंकवाद्यांचे पाठीराखे असे का संबोधते ?’ खरेतर तशीच वक्तव्ये त्या आणि त्यांच्यासारखे समस्त निधर्मी वारंवार करत असतात. त्यामुळे कुणी त्यांना ‘आहे तसे’ म्हटले तर बिघडले कुठे ? पहिल्याच भाषणात त्यांनी सांगितले, ‘‘भाजपच्या राष्ट्रवादात दुसर्याला भय देणारी भावना आहे. हे संकुचित आणि विभाजन करणारे आहे. देशातील नागरिकांना त्यांच्या घरातून ओढून त्यांना बाहेर काढणारे आहे.’’ अर्थात्च त्यांना घुसखोरांना बाहेर घालवणार्या सरकारच्या कायद्यांविषयी बोलायचे होते. ‘सरकारच्या मनात मानवाधिकाराविषयी तिरस्कार आहे. ‘लिंचिंग’ थांबलेले नाही आणि प्रसारमाध्यमांना सरकारने नियंत्रित केले आहे’, ही त्यांनी सांगितलेली काही सूत्रे शब्दशः चुकीची नव्हती; पण माध्यमे करत असलेल्या देशविरोधी, खोट्या आणि उलट्या प्रसारामुळे जर सरकारला त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी लागली, तर त्यात चूक ते काय ? अन्यथा साम्यवादी या देशात काय धुमाकूळ घालतील, याची कल्पनाही करू शकत नाही.
८ फेब्रुवारीला राष्ट्रपती अभिभाषणावर बोलत असतांना मोइत्रा यांनी ‘माजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगाई यांच्यावर महिलेने केलेल्या कथित आरोपातून सुटून ते राज्यसभेत आले आहेत’, अशा अर्थाची टिपणी केली. या भाषणात मोईत्रा यांना थोडक्यात म्हणायचे होते, ‘राममंदिराचा निकाल दबावात येऊन घेतला आहे.’ ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अनेक दंगली आणि राजकारण घडून अन् शेकडो हिंदूंचे बळी गेल्यावर हिंदूंचे स्वप्न पूर्ण होत असतांना अशा प्रकारचे विधान करणे, हे कशाचे द्योतक होते ? राममंदिराच्या निर्णयावर अगदी विरोधकांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यामुळे अजूनही अशा प्रकारची विधान करणे, हे मनातील द्वेषच उफाळून येत असल्याचे लक्षण नव्हे का ? राममंदिराचा निर्णय देण्यासाठी खरेतर कुठल्याच न्यायाधिशाची आवश्यकता नव्हती, ना पुरावे गोळा करण्याची. हिंदू आणि सरकार हे न्यायालयीन प्रक्रियेने जाणारे असल्याने त्यांनी ही सगळी प्रक्रिया पूर्ण केली, एवढेच. पुरावे पाहिले तर राममंदिराचा निर्णय योग्य असल्याचे महुआ स्वतःही सांगतील. असे असतांना श्रीरामाचा विषय आला की, तृणमूल काँग्रेसचे नेते हे ‘पाकचे नेते’ असल्याप्रमाणे वारंवार चवताळून उठतात, हा नेहमीचा अनुभव आहे. सरकार स्पष्टपणे काही भूमिका घेत असूनही साम्यवादी, समाजवादी सतत हिंदुद्वेषाचा पाऊस पाडत असतात. सरकारने हे केले नसते, तर या पावसात किती काय वाहून गेले असते ! त्यामुळे मोइत्रा कितीही प्रभावी बोलल्या, तरी ते राष्ट्र आणि धर्म विरोधी असल्याने त्याची दिशा चुकलेलीच आहे, याविषयी संदेह नाही !