महामार्गाचे प्रकल्प अहवाल बनवणारे निम्मे अभियंते बनावट आणि भ्रष्टाचारी आहेत ! – नितीन गडकरी, मंत्री, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक
महामार्गाचे प्रकल्प अहवाल बनवणारे अभियंते बनावट, भ्रष्टाचारी असतांना त्यांची नियुक्तीच कशी केली जाते ? अधिक प्रमाणात पैसे घेऊन वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित खात्याचे मंत्री अशा बनावट अभियंत्यांची नियुक्ती करतात का ?, अशी शंका येते. गडकरी यांनी अशी माहिती देण्यासह अशा बनावट अभियंत्यांवर बडतर्फीची कठोर कारवाई करावी, अशी राष्ट्रप्रेमी जनतेची अपेक्षा आहे !
नागपूर – देशातील निम्म्या अपघातांना चुकीच्या रस्त्यांचे अभियंते उत्तरदायी आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागातील रस्त्यांचे सविस्तर प्रकल्प अहवाल (डी.पी.आर्.) सिद्ध करणारे निम्मे अधिकारी बनावट (खोटे) आणि भ्रष्टाचारी आहेत. ते विविध कारणे पुढे करत ‘अंडर आणि ओव्हर पास’मध्येही अडथळे आणतात, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी १४ फेब्रुवारी या दिवशी येथे केले. ‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियाना’च्या अंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
नितीन गडकरी पुढे म्हणाले की,
१. देशात कोरोनामुळे वर्षभरात १ लाखांहून अधिक लोकांचे मृत्यू झाले; परंतु देशात प्रत्येक वर्षी ५ लाख अपघातात अनुमाने दीड लाख लोकांचे मृत्यू होतात. त्यामध्ये अनुमाने ७० टक्के व्यक्ती १८ ते ४५ वयोगटांतील असतात. नगरसेवक, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींसह सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन अपघात नियंत्रणाचे आव्हान स्वीकारल्यास नियंत्रण शक्य आहे.
२. सरकारमध्ये संवेदनशीलता नसल्याने रस्ते सुरक्षेविषयीचे काम कौन्सिलकडून होईल. राष्ट्रीय महामार्गावर अनुमाने १२ सहस्र कोटी रुपये व्यय करून सर्व अपघातजन्य स्थळे संपवली आहेत.
३. आतापर्यंत अनेकांना घरबसल्या वाहनचालक परवाने मिळत होते. त्यामुळे आम्ही परवाने ‘आधार’शी जोडले. यातून देशातील ३० टक्के परवाने बनावट असल्याचे समोर आले आहे. हे बनावट परवाने रहित करण्यासाठी प्रक्रिया चालू आहे. (बनावट परवाने रहित करण्यापूर्वी ते कुणी सिद्ध केले ? त्यांच्यावर केंद्र आणि राज्य शासनाने कोणती कारवाई केली, हे पहाणे महत्त्वाचे आहे. इतर बनावट परवाने सिद्ध करणार आणि शासन ते रहित करणार, असा खेळ किती दिवस चालू रहाणार आहे ? त्यामुळे बनावट परवाने सिद्ध करणार्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई केल्यास ते बनवण्याचे कुणाचे धाडस होणार नाही ? – संपादक)
४. कार्यक्रमाला उपस्थित असलेले अभिनेते मकरंद अनासपुरे म्हणाले की, सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे पथकर ‘कार्ड’च्या माध्यमातून स्वयंचलित पद्धतीने घेतले जात होते. तेथे हे तंत्रज्ञान भारतीय आस्थापने उपलब्ध करत होती. त्यामुळे देशातील कौशल्य बाहेर वापरले जात असून ते देशात का वापरले जात नाही ? हा प्रश्न मनात उपस्थित होत होता; परंतु देशातील रस्ते हे अभियंते नाही, तर राजकारणी बांधतात. (अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सांगितलेल्या गोष्टींचा आतापर्यंत शहरी आणि ग्रामीण भागांतील जनतेला अनुभव आला आहे; मात्र असे असतांनाही जनता अशा लोकप्रतिनिधींना पुन:पुन्हा निवडून देते हे या राज्याचे दुर्दैव ! – संपादक) गेल्या १० वर्षांपासून देशात चांगले रस्ते निर्माण होत असून त्यात गडकरी यांची भूमिका महत्त्वाची आहे.
५. समाजात काही लोक दायित्वशून्यपणाने वागून रस्त्यांवरील इतरांचे जीव धोक्यात घालतात. त्यांना आवर घालण्यासाठी दंडाची रक्कम दहापटीहून अधिक आकारूनच त्यावर नियंत्रण शक्य आहे.