पूजा चव्हाण हिची हत्या नव्हे, तर आत्महत्याच ! – धनंजय मुंडे
संभाजीनगर – परळी (जिल्हा बीड) येथील माझ्या मतदारसंघातील भगिनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यावर वक्तव्य करणे योग्य राहील. तिची हत्या कि आत्महत्या याविषयी पोलीस अन्वेषण चालू आहे. त्यातून सत्य बाहेर येणार आहे. हे पत्रकारांनाही माहीत आहे. ज्यांच्यावर आरोप झाले त्या सर्व परिस्थितीविषयी पोलीस अन्वेषण पूर्ण होऊ द्या. नंतर कोणाचे नाव येईल ते पाहू. तरीही ही हत्या नव्हे, तर आत्महत्या आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.
१५ फेब्रुवारी या दिवशी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत उपस्थित रहाण्यासाठी मुंडे आले होते.
मंत्री धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, आगामी शिवजयंती चांगली साजरी व्हावी, अशी सर्वांचीच भावना आहे; मात्र प्रचलित नियम पाळावे लागतील. पहिला शासनाआदेश निघाला त्या वेळी मी मुख्यमंत्र्यांना भेटून हा तो पालटला पाहिजे, अशी भूमिका मांडली. निर्बंध घालण्यापेक्षा मोकळेपणाने जयंती साजरी केली पाहिजे; मात्र कोरोनाच्या अनुषंगाने हे नियम घालून दिले आहेत, त्यांचे पालन झाले पाहिजे.