कोरोनामुळे यंदा पन्हाळगडावरून शिवज्योत नेण्याची अनुमती रहित !
पन्हाळा (जिल्हा कोल्हापूर) – १९ फेब्रुवारी या दिवशी होणार्या शिवजयंती उत्सवासाठी शिवभक्तांना पन्हाळगडावरून शिवज्योत नेण्यास अनुमती रहित करण्यात आल्याचे नगराध्यक्ष रूपाली धडेल यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून प्रशासनाला साहाय्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे यांसह कर्नाटक राज्यातून बेळगाव, हुबळी, धारवाड, अथणी आदी परिसरांतून शिवभक्त मोठ्या संख्येने प्रतिवर्षी पन्हाळगडावर येतात. याचे गांभीर्य ओळखून हा निर्णय घेतला असल्याचे धडेल यांनी सांगितले. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन ऐतिहासिक पन्हाळगडावर शिवजयंती यंदा साध्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे, तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये यांसाठी पोलीस प्रशासनाला पत्र देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.