सामाजिक संदेश देत नगरमध्ये आगळावेगळा व्हॅलेंटाईन डे साजरा !
नगर – येथील जागरूक नागरिक मंचच्या वतीने शहीद भगतसिंग उद्यानात देशावर प्रेम व्यक्त करून जातीयवाद नष्ट करण्याचा सामाजिक संदेश देणारा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. संस्थापक अध्यक्ष सुहास मुळे यांच्या संकल्पनेतून हा आगळावेगळा व्हॅलेंटाईन डे पार पडला. देशासाठी हसत हसत फासावर गेलेल्या भगतसिंग यांच्या पुतळ्याच्या साक्षीने हा कार्यक्रम झाला. सर्व जातीधर्माच्या प्रतिनिधींना यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.
मुळे म्हणाले की, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेम व्यक्त करायचेच असेल तर आपल्या देशावर प्रेम व्यक्त करा, सध्या देशाला जातीयवादाच्या किडीने पोखरले आहे. आपण सर्वजण एकत्र येत जातीयवादाला समूळ नष्ट करूया. या वेळी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. ‘भारत माता की जय’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.