प.पू. भक्तराज महाराजांच्या आशीर्वादामुळे सनातनचे ‘विहंगम मार्गाने’ होत असलेले कार्य !

 प.पू. भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादात सामर्थ्य किती आहे, हे कळण्यासाठी सनातनच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती सांगतो.

प.पू. भक्तराज महाराज

१. प.पू. भक्तराज महाराज यांनी सनातनच्या कार्यासाठी दिलेले आशीर्वाद आणि त्यांची फलश्रुती म्हणून सनातनचे वर्धिष्णू कार्य

अनेक संत आणि नाडीपट्ट्या (नाडीभविष्य) यांच्यानुसार वर्ष २००७ पासून माझा महामृत्यूयोग चालू आहे. मी गेली १४ वर्षे मृत्यूच्या जबड्यात आहे. थकव्यामुळे मी माझ्या खोलीच्या बाहेर कुठेही गेलेलो नाही. एवढेच नाही, तर मला चालणेच काय; पण आधाराविना उभे रहाणेही आता अशक्य होते. अशा स्थितीत प.पू. बाबांच्या आशीर्वादामुळे संस्थेकडून जे कार्य आतापर्यंत झाले, त्याची थोडक्यात माहिती सांगतो. ही माहिती अहंकारामुळे सांगत नाही, तर प.पू. बाबांच्या आशीर्वादात किती सामर्थ्य आहे, हे लक्षात यावे, यासाठी सांगतो. वर्ष १९९१ मध्ये प.पू. बाबांच्या आशीर्वादाने सनातन संस्थेची स्थापना झाली. त्यांनीच संस्थेचे नामकरण केले होते. सनातनच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याचे बीज बाबांच्या संकल्पात आहे; म्हणूनच आज सनातनचे कार्य शुक्ल पक्षातील चंद्रकलेप्रमाणे दिवसागणिक वर्धिष्णू होत आहे. प.पू. बाबांनी सनातनच्या कार्यासाठी दिलेले आशीर्वाद आणि त्यांची फलश्रुती पुढे दिली आहे.

१ अ. प.पू. बाबांची भजने : बाबांच्या भजनांतून चैतन्य मिळत असल्याने, तसेच भजनांतील चैतन्यामुळे वाईट शक्तींचा त्रास अल्प होत असल्यामुळे आणि साधनेला पूरक म्हणून सर्वत्रचे साधक भजने ऐकतात. त्यामुळे ते सेवा करू शकतात.

१ आ. गुरुकृपायोग : प.पू. बाबांकडून मी जे काही शिकलो, त्यानुसार मी ‘साधना कशी करायची ?’, यासंदर्भात एक ग्रंथ लिहिला. तो प.पू. बाबांना दाखवला आणि विचारले, ‘‘या साधनामार्गाचे नाव काय ठेवू ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘नामसंकीर्तनयोग’’ त्यावर मी त्यांना विचारले, ‘‘या साधनामार्गात स्वभावदोष निर्मूलन, अहं निर्मूलन, नामजप, सत्संग, सत्सेवा, भावजागृती, त्याग आणि प्रीती ही आठ अंगे आहेत. त्यांतील एक आहे ‘नामजप’. यातील सर्व प्रकारच्या साधनेमुळे गुरुकृपा लवकर होण्यासाठी साहाय्य होणार असल्यामुळे याला ‘गुरुकृपायोग’, असे नाव ठेवूया का ?’’ त्यावर प.पू. बाबा एकदम आनंदून म्हणाले, ‘‘हेच नाव ठेवा !’’ प.पू. बाबांनी दिलेल्या या आशीर्वादामुळे सहस्रो साधक आता गुरुकृपायोगानुसार साधना करत आहेत.

१ इ. प.पू. बाबांनी शिकवलेली व्यष्टी आणि समष्टी साधना : साधनेचे दोन प्रकार असतात – एक व्यष्टी आणि दुसरी समष्टी साधना. सनातन व्यष्टी आणि समष्टी साधना शिकवते. व्यक्तीगत साधनेसाठी, म्हणजे ईश्‍वरप्राप्ती होण्यासाठी ‘व्यष्टी साधना’ आणि समाजातील जिज्ञासूंची प्रगती व्हावी अन् त्यातून ईश्‍वरी राज्याची स्थापना व्हावी, यासाठी त्यांनी ‘समष्टी साधना’ शिकवली. समष्टी साधनेसाठीच त्यांनी मला भारतात अनेक ठिकाणी आणि अमेरिकेत जाण्यास सांगितले होते, हे आता माझ्या लक्षात आले. सनातन व्यष्टी आणि समष्टी साधना शिकवते. समष्टी साधनेमुळेच आता जगभरचे सहस्रो साधक साधना करत आहेत.

१ ई. ध्वनीफिती आणि ध्वनीचित्रफिती : आतापर्यंत ‘ईश्‍वर प्राप्ती के लिए अध्यात्मशास्त्र’ (१६२ भाग) आणि ‘धार्मिक कृत्योंका शास्त्र’ (३२० भाग) या दूरचित्रवाहिन्यांवरील धर्मसत्संगांच्या मालिका; संतांच्या मुलाखती; हिंदु आचारांचे महत्त्व; तीर्थक्षेत्र, संतांची स्थाने, ऐतिहासिक स्थळे आदींचे माहात्म्य, तसेच त्यांविषयीचे आध्यात्मिक संशोधन, आध्यात्मिक त्रासांवरील नामजपादी उपाय आदींविषयी शेकडो ध्वनीचित्रफिती सनातन संस्थेने सिद्ध केल्या आहेत. त्यांतील काही ध्वनीचित्रफिती निरनिराळ्या दूरचित्रवाहिन्यांवरून दाखवण्यात आल्या आहेत.

१ उ. भारतभरातील धर्मप्रसाराच्या कार्यासाठी आशीर्वाद : प.पू. बाबांनी मला वर्ष १९९२ ते १९९५ या काळात महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांत टप्प्याटप्प्याने साधनेचा प्रसार करण्याचे आशीर्वाद दिले. पुढे भारतात सर्वत्र प्रसार करण्यास सांगितले. त्यांच्या आशीर्वादामुळे आज धर्मप्रसाराचे कार्य विविध उपक्रमांच्या माध्यमातून दिवसेंदिवस वाढतच आहे. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. भारतभरात सध्या १६० हून अधिक ठिकाणी ‘ऑनलाईन’ सत्संग चालू आहेत, तसेच प्रतिवर्षी समाजातील जिज्ञासूंसाठी ‘साधना-शिबिरे’ आयोजित केली जातात.

२. प्रतिवर्षी देशविदेशांत अनुमाने १०० ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ साजरे केले जातात, तसेच ‘कुंभमेळे’ आणि राज्याराज्यांतील ‘जत्रोत्सव’ यांच्या माध्यमातून धर्मप्रसार केला जातो.

३. भारतातील विविध राज्यांत ३१.१.२०२१ पर्यंत १ सहस्र ८९७ हिंदु राष्ट्र-जागृती सभा झाल्या आहेत.

४. वर्ष २०१२ पासून ८ राष्ट्रीय, १ ‘ऑनलाईन’, १२ राज्यस्तरीय, ५८ प्रांतीय, ४३ जिल्हास्तरीय अशी एकूण १२२ ‘हिंदु राष्ट्र अधिवेशने’ झाली आहेत.

१ ऊ. सनातन संस्थेच्या साधकांची अभूतपूर्व आध्यात्मिक प्रगती : सनातनच्या सहस्रो साधकांपैकी एकही साधक सकाम भक्ती करणारा नाही. सर्वांना ईश्‍वरप्राप्तीची तळमळ आहे. ३.२.२०२१ या दिनांकापर्यंत ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी प्राप्त केलेले, म्हणजे जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झालेले सनातनचे १,१२५ साधक संतपदाकडे मार्गक्रमण करत आहेत. ८६ साधकांनी संतपद, १५ साधकांनी सद्गुरुपद गाठले आहे, तर २ जण परात्पर गुरुपदावर आरूढ आहेत.

१ ऊ १. दैवी बालक ओळखता येणे : ३.२.२०२१ पर्यंत सनातनने २ बालक-संत, ६० टक्क्यांहून अधिक आध्यत्मिक पातळी असलेले २३९ दैवी बालके आणि अन्य ८५९ दैवी बालके यांची ओळख समाजाला करून दिली असून दैवी बालकांच्या संदर्भात संशोधनकार्यही चालू आहे.

१ ए. ‘सनातन प्रभात’ नियतकालिके : मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या ४ भाषांत आहेत. दैनिकातील ८ पानांपैकी २ ते ३ पाने अध्यात्म आणि साधना याविषयी असतात.

१ ऐ. विविध संकेतस्थळे : यांच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर धर्मप्रसार होत आहे. जानेवारी २०२१ मध्ये संकेतस्थळांना भेट देणार्‍यांची एकूण संख्या ८ लाखांहून अधिक आहे.

१ ओ. अनेक संत सनातनच्या कार्याशी जोडले गेले आहेत.

२. विदेशातील कार्यासाठी आशीर्वाद !

१९९५ या वर्षी प.पू. बाबा मला म्हणाले, ‘‘आता तू अमेरिकेला प्रसारासाठी जा.’’ तेव्हा मी म्हणालो, ‘‘माझे अमेरिकेत कुणी ओळखीचे नाही आणि जाण्यासाठी माझ्याकडे पैसेही नाहीत.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘जाऊ दे. अमेरिकाच तुझ्याकडे येईल.’’ त्यामुळे आता अमेरिकाच काय, तर जगातील ४५ हून अधिक देशांतील साधक साधना शिकण्यासाठी काही दिवसांसाठी रामनाथी आश्रमात येत आहेत.

२ अ. विदेशांतील एस्.एस्.आर्.एफ्. (स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन) च्या साधकांची अभूतपूर्व आध्यात्मिक प्रगती : ३१.१.२०२१ या दिनांकापर्यंत विदेशांतील ५ साधक संत आणि १ साधक सद्गुरु झाले आहेत अन् ६० टक्के अन् त्यापेक्षा अधिक पातळी प्राप्त केलेले २३ साधक संतपदाकडे वाटचाल करत आहेत.

३. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

पूर्वी भारतात नालंदा आणि तक्षशीला अशी दोन मोठी विश्‍वविद्यालये होती. ‘इतिहास सांगण्यापेक्षा इतिहास घडवावा’, अशी एक शिकवण असल्याने वर्ष २४.३.२०१४ मध्ये ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ची स्थापना करण्यात आली.

अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संगीत विभागाने केलेल्या संशोधनात बाबांच्या भजनांत पुष्कळ चैतन्य असल्याचे सिद्ध झाले आहे.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे आतापर्यंत विविध विषयांवर संशोधन चालू आहे. ऑक्टोबर २०१६ ते जानेवारी २०२१ या कालावधीत १५ राष्ट्रीय आणि ५१ आंतरराष्ट्रीय अशा एकूण ६६ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. अनेक शोधनिबंधांचे उपस्थितांनी कौतुक केले आहे. त्यांपैकी ४ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट शोधनिबंध’ म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे.

अ. ९ सप्टेंबर २०१८ (दक्षिण कॅरोलिना, अमेरिका) : ‘समाजसेवेमुळे आध्यात्मिक उन्नती होते का ?’ – सादरकर्ते – श्री. कृष्ण मंडावा

आ. १६ सप्टेंबर २०१८ (पुरी, ओडिशा) : ‘खरे नेतृत्व उच्च आध्यात्मिक स्तर असलेली व्यक्तीच करू शकते !’ – सादरकर्ते – श्री. शंभु गवारे

इ. २० सप्टेंबर २०१९ (बेंगळुुरू) : ‘उद्योगांचा समाजावर आध्यात्मिक स्तरावर होणारा परिणाम !’ – सादरकर्त्या – सौ. शिल्पा मगदूम

ई. १५ नोव्हेंबर २०१९ (जयपूर) : ‘तणावग्रस्त जगात आनंद आणि मनःशांती यांचा शोध’ – सादरकर्त्या – डॉ. स्वाती मोदी

४. सनातनच्या सकल कार्यासाठी आशीर्वाद

फेब्रुवारी १९९५ मध्ये एका भक्तांच्या समक्ष बाबा म्हणाले होते, ‘‘सनातन मी चालवीन !’’ त्यांचे ते बोल अक्षरशः खरे ठरले आहेत. आज सनातनवर विविध संकटे येऊनही सनातनचे कार्य वाढतच आहे आणि या कार्यासाठी कधीही काहीही अल्प पडलेले नाही.’

– प.पू. भक्तराज महाराज यांचा शिष्य डॉ. जयंत आठवले (१२.१.२०२०)

रामनाथी आश्रमासाठी आशीर्वाद !

वर्ष १९९३ मध्ये गोव्यातील श्री रामनाथ देवस्थानात बाबांचा गुरुपौर्णिमा महोत्सव झाला. त्या वेळी श्री रामनाथ देवस्थानाच्या बाजूलाच असलेल्या जागेच्या दिशेने हात करत बाबा म्हणाले होते, ‘‘ही सनातनच्या भावी आश्रमाची नियोजित जागा आहे. भविष्यात तो आश्रम विश्‍वदीप होईल !’’ खरंच आज याच ठिकाणी सनातनचा आश्रम स्थित आहे.

आता भारतात मुंबईजवळील देवद, मिरज आणि गोवा या ३ ठिकाणी आश्रम अन् अनेक ठिकाणी सेवाकेंद्रे आहेत. त्यांत अनेक साधक रहातात. विदेशांतील साधक गोव्यातील आश्रमात अध्यात्म शिकण्यासाठी काही दिवसांसाठी येतात.

ग्रंथलिखाणासाठी आशीर्वाद !

वर्ष १९९२ मध्ये प.पू. बाबा मला म्हणाले, ‘माझ्या गुरूंनी मला दिलेला ‘तू किताबों पर किताबें लिखेगा ।’ हा आशीर्वाद मी तुम्हाला देतो.’ त्या आशीर्वादाचे फळ म्हणूनच जानेवारी २०२१ पर्यंत सनातनने संकलित केलेल्या ३३३ ग्रंथांच्या ११ भारतीय आणि ६ विदेशी भाषांत ८१ लाख ४० सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत. समाजात ग्रंथ आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे ग्रंथ आधुनिक वैज्ञानिक भाषेत आहेत आणि त्यांत विविध विषयांच्या संदर्भात मनात येणार्‍या प्रश्‍नांची, तसेच ‘का आणि कसे ?’, यांची उत्तरे दिली आहेत. अजून ६,००० हून अधिक ग्रंथ प्रकाशित होणे शेष आहे. प.पू. बाबांच्या कृपेने ते कार्य पुढील काही पिढ्या चालू रहाण्यासाठी आवश्यक असे साधक प.पू. बाबांच्या आशीर्वादाने सिद्ध होत आहेत.

(प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त हे लिखाण पुनर्प्रकाशित करत आहोत. – संपादक)