देव, देश अन् धर्मासाठी तरुण पिढीमध्ये जागृती करणे आवश्यक ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती
मुंबई – भारत देशाची संस्कृती ही सर्वांत प्राचीन आणि समृद्ध आहे. विश्वातील अनेक संस्कृती या काळाच्या ओघात समाप्त झाल्या. सनातन हिंदु संस्कृती मात्र सर्व आघात सोसूनही टिकून आहे. असे असले, तरी आज पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण आणि हिंदूंची धर्माप्रतीची अनास्था, यांमुळे भारतात देव, देश अन् धर्म यांची पायमल्ली चालू आहे. याचाच परिणाम म्हणजे पाश्चात्त्यांची ‘डे संस्कृती’ भारतात वाढीस लागली. आज निरनिराळे ‘डे’ भारतात साजरे केले जातात. त्यांना कुठलाही शास्त्राधार नाही. पाश्चात्त्यांच्या या ‘डे’ संस्कृतीसमवेत विकृतीही आली आणि त्याला आपली युवा पिढी आज बळी पडत चालली आहे. यातून जर आपल्याला बाहेर पडायचे असेल, तर याविषयीचे प्रबोधन आपल्याला युवा पिढीमध्ये करावे लागेल आणि समाजात घडणार्या दुष्प्रवृत्तींच्या विरोधात सर्वांना संघटितपणे उभे रहावे लागेल, असे प्रबोधनपर मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी येथे केले. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील धर्मप्रेमींसाठी १२ फेब्रुवारी या दिवशी ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते.
याला अनेक धर्मप्रेमी युवक ऑनलाईन उपस्थित होते. देव, देश अन् धर्म यांच्या सुरक्षेसाठी युवकांनी हिंदु राष्ट्रासाठी कृतीशील व्हावे. हे कार्य प्रभावीपणे करण्यासाठी युवकांनी स्वरक्षण प्रशिक्षण शिकून घेण्याचे आवाहन श्री. सागवेकर यांनी या वेळी केले.
मनोगत
१. या कार्यात सहभागी व्हायला आवडेल ! – कु. नेहा तोडणकर
२. या माहितीच्या पोस्ट आम्हाला मिळाल्यास आम्हीही सोशल मीडियाद्वारे प्रसार करू ! – सौ. गीतांजली गुरव
३. अपप्रकार रोखले जावे, यासाठी शाळा-महाविद्यालयामध्ये निवेदने देत आहोत ! – श्री. सुनील मांगले