भक्तांवर अखंड कृपाछत्र धरणारे प.पू. भक्तराज महाराज !
आज माघ शुक्ल पक्ष पंचमी (१६ फेब्रुवारी २०२१) म्हणजेच वसंतपंचमी आहे. या दिवशी असलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रकटदिनाच्या निमित्ताने…
१. त्रैलोक्याचे योगीराज हे अवतरले भूवरी ।
‘त्रैलोक्याचे योगीराज हे अवतरले भूवरी ।’, असे प.पू. भक्तराज महाराज यांनी (बाबांनी) एका भजनात त्यांच्या गुरूंना (श्री अनंतानंद साईश यांना) उद्देशून म्हटले आहे. ते भजन बाबांनाही लागू पडते. प.पू. भक्तराज महाराज (बाबा) हे गृहस्थाश्रमी असूनही अंतस्थ योगीराजच होते ! साधक आणि भक्त यांचा उद्धार करण्यासाठी बाबा अवतरले. तो दिवस म्हणजे ७ जुलै १९२०.
२. प.पू. भक्तराज महाराज यांनी शिष्यावस्थेत तळमळीने केलेली गुरुसेवा
शिष्यावस्थेत असतांना ‘गुरु’ आणि गुरुपदावर असतांना ‘भक्त’, या २ शब्दांतच जणू बाबांचे सारे जीवन सामावले होते. शिष्य असतांना गुरु वहाणा न घालता बाहेर जायला निघाले की, लगेच त्यांच्या वहाणा काखेत धरून त्यांच्या पाठी अनवाणी चालणे, भजनांच्या कार्यक्रमात ‘गुरूंनी उठण्यास सांगितले नाही’; म्हणून सलग ८ – १० घंटे भजने म्हणणे, गुरूंसमोर तासन्तास एका पायावर उभे राहून भजने म्हणणे, रात्री गुरूंच्या झोपण्याच्या वेळी त्यांनी ‘थांब’ म्हणेपर्यंत अखंडपणे त्यांचे पाय चेपत रहाणे, यांसारख्या बाबांच्या गुरुसेवेला तोड नाही. बाबांनी अशा गुरुसेवेतून शिष्यत्वाचा मोठा आदर्शच आपल्या सर्वांसमोर ठेवला आहे.
३. प.पू. भक्तराज महाराज यांच्या जीवनाची त्रिसूत्री : भजन, भ्रमण आणि भंडारा !
३ अ. भजन : प.पू. बाबा म्हणायचे, ‘भजन हेच माझे जीवन आहे.’ बाबांच्या भजनांचे वैशिष्ट्य हे की, आज इतक्या वर्षांनंतरही प्रत्येक साधकाला प्रत्येक प्रसंगात त्या भजनांतून त्याच्या साधनेसाठी आवश्यक असलेला अर्थ उलगडतो ! यासाठीच ‘बाबांची भजने’, हा अनमोल असा प्रासादिक ठेवाच आहे. बाबांनी भजनांच्या माध्यमातून केवळ भक्तीयोगाचीच नव्हे, तर नामसंकीर्तनयोग, कर्मयोग, ज्ञानयोग आदी साधनामार्गांचीही शिकवण दिली.
‘प.पू. बाबांची भजने केवळ ऐकल्यामुळेही त्यांतील चैतन्यामुळे वाईट शक्तींचा त्रास अल्प होऊन पुढे नाहीसा होतो’, असे बर्याच साधकांनी अनुभवले आहे.
३ आ. भ्रमण : भक्तांना सत्संग आणि आनंद मिळावा अन् त्यांना साधनेसाठी मार्गदर्शन व्हावे, यांसाठी ऊन-पाऊस, वादळ-वारा आदी कशाचीही पर्वा न करता आणि प्रसंगी आजारपण असतांनाही प.पू. बाबा अनेक किलोमीटर प्रवास करून भक्तांकडे जात असत. प.पू. बाबांच्या या चैतन्यदायी सहवासाच्या स्मृती आजही भक्तांना भावाने रोमांचित केल्याविना रहात नाहीत.
३ इ. भंडारा : एकदा बाबांच्या गुरूंनी सर्वांना सांगितले, ‘‘कल दिनू के यहा भंडारा है ।’ (बाबांचे पूर्वाश्रमीचे नाव ‘दिनकर’ होते. तेव्हा अनेक जण त्यांना ‘दिनू’ असे संबोधत.) बाबा मनात म्हणाले, ‘माझ्याकडे पैसे नाहीत आणि घरात भंडार्यासाठी लागणारे सामानही नाही. अशा वेळी भंडारा कसा करणार ?’ तरी बाबांनी ‘गुरु पाहून घेतील’, असा विचार करून भंडारा करायचे ठरवले. गुरूंनी पुष्कळ जणांना भंडार्याचे निमंत्रण दिले. नंतर गुरूंच्या कृपेने भंडार्यासाठीच्या सामानाची सर्व सोय आपोआप झाली आणि भंडार्यात काही अल्पही पडले नाही. गुरूंनी घेतलेल्या परीक्षेत बाबा उत्तीर्ण झाले. पुढे बाबांनी जवळ विशेष पैसे नसतांनाही असंख्य भंडारे केले आणि भक्तांना शिकवले, ‘गुरूंवर दृढ श्रद्धा ठेवा आणि गुरूंसाठी सर्वस्वाचा त्याग करा. मग पहा, गुरु कृपा करतातच !’
४. भक्तांशी समरस झालेले प.पू. भक्तराज महाराज !
सर्वसाधारणतः थोर संत-माहात्मे हे जपजाप्य, ध्यानधारणा, समाधी आदींमध्ये व्यस्त रहातात आणि काही वेळ भक्तांना मार्गदर्शन करतात. बाबांना मात्र भक्तांविना चैनच पडायचे नाही, इतके ते भक्तांशी समरस झाले होते.
५. भक्तांना नानाविध पद्धतींनी शिकवणारे प.पू. भक्तराज महाराज !
बहुतेक संत केवळ मार्गदर्शनाच्या माध्यमातून भक्तांना शिकवतात. बाबांच्या भक्तांना शिकवण्याच्या नानाविध पद्धती होत्या. ते मार्गदर्शनाच्या माध्यमातून तर शिकवतच; पण सहज वागण्या-बोलण्यातून, गमतीजमती करून, कधी रागावून, तर कधी शिव्या देऊनसुद्धा भक्तांना शिकवत. इतकेच नव्हे, तर कधी भक्तांनी चुका केल्या, तर बाबा त्यांना रागावतही असत. असे असले, तरी भक्तांना त्यांच्या रागावण्यात प्रेमाचा ओलावा आणि भक्तांच्या कल्याणाचीच तळमळ जाणवे. यासाठीच आजही बाबांचे नुसते स्मरण केले, तरी भक्तांचे नेत्र भावाश्रूंनी डबडबल्याविना रहात नाहीत.
६. श्री गुरुचरणी प्रार्थना !
श्री गुरूंची थोरवी कितीही गायली, तरी ती अल्पच असते. ‘प.पू. बाबांची कृपा आपल्या सर्वांवर अशीच अखंड रहावी आणि अध्यात्मप्रसाराचे कार्य करण्यासाठी त्यांनी आम्हाला सतत शक्ती द्यावी’, अशी त्यांच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना करतो अन् माझ्या वाणीला विराम देतो.’
– प.पू. भक्तराज महाराज यांचा शिष्य डॉ. जयंत आठवले
प.पू. भक्तराज महाराज यांच्या कृपेची प्रत्यक्ष साक्ष देणार्या वैशिष्ट्यपूर्ण घटनाआज बाबा देहरूपात नसले, तरी आम्ही सारे जण बाबांच्या कृपेची प्रचीती घेत आहोत. १. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रात आपोआप झालेले पालट : वर्ष २००६ मध्ये सनातनच्या रामनाथी आश्रमातील माझ्या खोलीतील देवघरात बाबांचे छायाचित्र ठेवले होते. त्या छायाचित्रात ऑगस्ट २०१० मध्ये आपोआप पालट झाले. त्या छायाचित्रातील ‘तोंडवळा पांढरट पिवळा आणि जरासा अस्पष्ट होणे’, हे निर्गुण तत्त्वाकडे होणारी वाटचाल दर्शवते, तर ‘प्रभावळ गडद आणि गुलाबी होणे’, हे धर्मप्रसारासाठी आवश्यक असणारी कार्यकारी शक्ती प्रकट झाल्याचे दर्शवते. २. प.पू. भक्तराज महाराज यांचे पादुकांच्या रूपात रामनाथी आश्रमातील आगमन : पणजी, गोवा येथील प.पू. बाबांच्या भक्त श्रीमती स्मिता राव यांनी एप्रिल २०१९ मध्ये त्यांच्याकडे असलेल्या प.पू. बाबांच्या पादुका अंतःप्रेरणेने रामनाथी आश्रमात ठेवण्यासाठी दिल्या. ‘पादुकांच्या रूपात बाबाच आले’, असा आम्हा सर्वांचा भाव आहे. वरील घटनांवरून असे जाणवते की, प.पू. बाबा जणूकाही आम्हाला सांगत आहेत, ‘माझे तुमच्याकडे लक्ष आहे. काळजी करू नका !’ ३. देश-विदेशांतील साधकांना प.पू. भक्तराज महाराज यांच्या संदर्भात येणार्या अनुभूती : भारतातीलच नव्हे, तर विदेशांतीलही कित्येक जिज्ञासू आणि साधक यांनी बाबांना कधीच पाहिलेले नाही, तरीही बाबांचे छायाचित्र पाहिल्यावर त्यांचा भाव जागृत होतो, तसेच त्यांना प.पू. बाबांविषयी अनेक अनुभूती येतात.
|