साधकांवर पितृवत् प्रेम करण्याचा प्रयत्न केल्यावर साधकाला अपेक्षा करणे आणि पूर्वग्रह या स्वभावदोषांवर मात करता येणे

श्री. सुमित सागवेकर

१. युवा संघटनाची सेवा करत असतांना स्वरक्षण प्रशिक्षकांविषयी मनात पूर्वग्रहाचे विचार येणे, त्यांच्याविषयीच्या अपेक्षा वाढणे आणि त्यांच्याशी अधिकारवाणीने बोलणे

युवा संघटनाची सेवा करत असतांना ‘स्वरक्षण प्रशिक्षकांना सेवा सांगणे, त्यांच्या सेवांचा पाठपुरावा घेणे, सहसाधकांना व्यष्टी साधनेमध्ये साहाय्य करणे’, अशा सेवा माझ्याकडे असतात. ‘ते सेवेचा आढावा वेळेवर देत नाहीत. व्यष्टी साधनाही पूर्ण करत नाहीत आणि सेवेसाठी अल्प प्रयत्न करतात’, असे पूर्वग्रहाचे विचार माझ्या मनात निर्माण झाले होते, तसेच माझा इतरांकडून अपेक्षा करण्याचा भाग वाढू लागला होता. त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये प्रतिक्रिया यायच्या. ‘त्यांनी सेवेच्या संदर्भातील कृती केलीच पाहिजे’, असा ठामपणा माझ्यामध्ये असायचा आणि कधी कधी माझ्याकडून सहसाधकांशी अधिकारवाणीने बोलणेही व्हायचे.

२. स्वत:मध्ये पालट करण्याचे प्रयत्न करूनही स्वभावदोष आणि अहं उफाळून येणे, सहसाधक प्रशिक्षकांना समजून घेत असणे अन् स्वतःला तसे करता येत नसल्याने व्याकुळ होणे

मी माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांची व्याप्ती काढली आणि त्यावर चिंतन केले. ‘मी प्रशिक्षकांना समजून घेण्यात न्यून पडत आहे आणि त्यांना आधार वाटेल, असे करत नाही’, हे माझ्या लक्षात आले. मी त्यांना पालटण्याचा प्रयत्न करत आहे; पण स्वतःमध्ये पालट करण्याचा विचारही मी करत नाही. यासाठी मी स्वयंसूचना सत्रे केली आणि सारणीमध्ये चुका लिहिल्या; पण काही कालावधीने पुन्हा स्वभावदोष आणि अहं उफाळून येऊ लागले. सहसाधक श्री. निरंजनदादा यांच्याकडून या संदर्भात मला शिकायला मिळायचे. प्रशिक्षकांनी काही सेवा केल्या नाहीत किंवा त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही, तर तो त्यांच्या अडचणी समजून घ्यायचा. त्या वेळी त्याला प्रतिक्रिया यायच्या नाहीत अन् त्याच्याकडून ते स्वीकारलेही जायचे. या विचारांनी मी व्याकुळ झालो होतो.

३. ‘प्रशिक्षकांवर पुत्रवत् प्रेम केल्यास कोणतीही प्रतिक्रिया मनात येणार नाही’, असे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी सांगणे

त्यानंतर मी सद्गुरु नंदकुमार जाधव यांना माझ्या मनाची स्थिती सांगितली. ते म्हणाले, ‘‘स्वयंसूचना घेण्याच्या समवेत भाव ठेवून सेवा केली पाहिजे. ‘प्रशिक्षक हे आपली मुलेच आहेत’, असा भाव ठेवायचा आणि त्यांच्यावर पितृवत् प्रेम करायचे. त्यामुळे कोणतीच प्रतिक्रिया मनामध्ये येणार नाही.’’

४. रामनाथी आश्रमात आल्यानंतर एका संतांनी पितृवत् प्रेम करता येण्यासाठी स्वयंसूचना देण्यास सांगणे, त्याप्रमाणे केल्यावर पितृवत् प्रेम निर्माण होण्यासाठी विचारप्रक्रिया चालू होऊन सहसाधकांविषयी मनात येणार्‍या प्रतिक्रिया अन् पूर्वग्रह न्यून होणे

त्यानंतर रामनाथी आश्रमात आल्यानंतर मी एका संतांना विचारले, ‘‘पितृवत् प्रेम कसे करायचे असते ? ते मला जमत नाही.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘किती लहान आहेस तू ! पण छान विचार आहे. यासाठी स्वयंसूचना दे. तुला आपोआप जमणार.’’ त्यांच्या संकल्पाने पहिल्या टप्प्याला माझ्यात पितृवत् प्रेम निर्माण होण्यासाठी विचारप्रक्रिया चालू झाली आहे. आता सध्या त्यावर स्वयंसूचना देऊन मी प्रयत्न करत आहे. सहसाधकांविषयी माझ्या मनात येणार्‍या प्रतिक्रिया न्यून झाल्या आहेत. ‘त्यांच्याविषयीचे पूर्वग्रह काय होते ?’, हेही आता मला आठवत नाही. ‘त्यांनी सांगितलेल्या अडचणी नेमक्या काय आहेत ?’, असे विचार माझ्या मनामध्ये चालू झाले आहेत. संत आणि गुरु यांच्या संकल्पाचे बळ मी प्रत्यक्ष अनुभवत आहे. मला ‘पितृवत् प्रेम करणे’ हा साधनेतील एक नवीन टप्पा गुरुमाऊलींच्या कृपेने शिकायला मिळाला. त्यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती. (१.११.२०२०)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक