संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे पालखी मार्ग होणार भक्तीमार्ग ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे काम पुढील दीड वर्षांत पूर्ण केले जाईल. यासाठी १२ सहस्र कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हे दोन्ही मार्ग केवळ रस्ता न रहाता ते संतांचे कार्य सांगणारा भक्ती मार्ग करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वातहूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी १३ फेब्रुवारी या दिवशी पत्रकारांच्या वार्तालापात केले.
(सौजन्य : TV9 Marathi)
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा केवळ रस्ता नसून महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृतीवारसा, संतांचे साहित्य, त्यांच्या कार्याशी जोडलेली श्रद्धा आहे. याच श्रद्धेने आषाढी वारीला वारकरी जात असतात, असेही गडकरी म्हणाले. हे दोन्ही भक्तीमार्ग करण्यासाठी नागरिक आणि वारकरी यांनी www.palkhimarg.com या संकेतस्थळावर त्यांच्या सूचना नोंदवाव्यात. याकरिता तज्ञांची समिती नेमली असून ते सर्व सूचनांचा विचार करून त्यावर निर्णय घेतील, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.