महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी नितीन शिंदे, तर सरचिटणीसपदी किशोर पाटील बिनविरोध
ठाणे – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची बैठक ११ फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वंसतराव मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. या वेळी महाराष्ट्र राज्य प्रसिद्धि प्रमुख नवनाथ जाधव, राज्य माध्यम सल्लागार भगवान राऊत उपस्थित होते. या विशेष बैठकीत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी उपस्थित सर्व पत्रकारांच्या सहमतीने कोकण विभागीय अध्यक्ष पदासाठी नितीन शिंदे यांची, तर कोकण विभागीय सरचिटणीस पदासाठी भिवंडी तालुक्यातील अग्रगण्य दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक किशोर पाटील यांची बिनविरोध निवड केली.
या वेळी नवनिर्वाचित अध्यक्ष आणि सरचिटणीस यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीमध्ये अधिवक्ता रचना भालके यांची निवड करण्यात आली. या वेळी पालघर जिल्हा अध्यक्ष विकास पाटील, ठाणे शहर जिल्हा मुख्य कार्यकारिणीचे प्रकाश दळवी, मिलींद दाभोळकर, सतीशकुमार भावे, ज्योती चिदंरकर, अतुल तिवारी, मंगेश प्रभुळकर, संजय भोईर, मनोज कदम, आखिलेश पाल, दिनकर गायकवाड, सुरजपाल यादव आदी मान्यवर पत्रकार उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वंसतराव मुंडे म्हणाले, ‘‘पत्रकार म्हणजे समाजातील प्रश्नांविषयी, लोकांच्या अन्याय आत्याचाराविषयी जो अस्वस्थ होतो तोच खरा पत्रकार, असे म्हटले तर वावगे ठरू नये. कोरोनाच्या काळामध्ये वर्तमानपत्र न्यून झाली, तर जाहीरातींचे प्रमाण अल्प झाले या सगळ्या अडचणीचा फटका पत्रकारांना बसला आहे. त्यामुळे पत्रकारांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. पत्रकार संघ हे आपले कुटुंब आहे. पत्रकार संघटनेच्या माध्यमातून काय केले पाहिजे, तसेच आपल्याला ही संघटना अधिक सक्षम कशी करता येईल, यासाठी प्रयत्न करायला हवे.’’
आपण सर्वांनी आम्हा दोघांची बिनविरोध निवड केल्याविषयी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो. असेच सहकार्य यापुढे ही आम्हाला कराल, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे कोकण विभागीय नवनिर्वाचित सरचिटणीस किशोर पाटील यांनी सांगितले. पत्रकारांच्या कोकण विभागात ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड आणि पुणे अशा ५ जिल्ह्यांचा समावेश आहे.