महाराष्ट्रात गेल्या ४ वर्षांत जंगली प्राण्यांच्या आक्रमणात २१४ लोकांचा मृत्यू !
अरण्यावरील ‘सिंमेट’च्या जंगलाचे अतिक्रमण झाल्यामुळे असे होत आहे !
मानवाने निसर्गावर आक्रमण केल्याचा हा परिणाम असून तो त्यालाच भोगावा लागत आहे, हे याचे उत्तम उदाहरण आहे !
नागपूर – गेल्या काही दशकांमध्ये राज्यात सिमेंटची जंगले उभी रहात आहेत. परिणामी खर्या अरण्याची व्याप्ती अल्प झाली आहे. त्यामुळेच अरण्यातील हिंसक जनावरे शहराच्या दिशेने येत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या ४ वर्षांत जंगली प्राण्यांच्या आक्रमणांत २१४ लोकांचा बळी घेतल्याची नोंद वनविभागाकडे झाली आहे.
१. या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारातून मागावलेल्या माहितीतून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
२. केवळ वाघच नाही, तर बिबट्या, हत्ती, अस्वल, जंगली डुक्कर आणि मगर यांच्या आक्रमणांतही अनेकांनी जीव गमावला आहे.
३. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या ४ जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात अरण्ये आहेत. या अरण्यांत अनेक हिंसक प्राणीही वास्तव्यास आहेत; मात्र गेल्या काही काळात या अरण्यात मानवाची घुसखोरी वाढल्याने गेल्या ४ वर्षांत वाघाने १०१ लोकांचा बळी घेतला आहे.
४. आतापर्यंत वनविभागाने मृत पावलेल्या २१४ जणांच्या नातेवाइकांना २६ कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य केले आहे.