आठ पदार्थ घालून खजुराचे केलेले पौष्टिक आणि स्वादिष्ट ‘लाडू’ म्हणजे मोक्षप्राप्तीसाठी परात्पर गुरु डॉक्टरांंनी सांगितलेली सर्वांगसुंदर अशी अष्टांग साधना !
१. खजुराच्या पौष्टिक लाडूतील घटक पदार्थ
१ अ. खजूर = नामजप : ‘नामजप’ हा अष्टांग मार्गातील प्रत्येक घटकात आवश्यक असतो. तो सर्व कृतींची गुणवत्ता वाढवतो. ‘खजूर’ हा लाडूचा पाया असून तो सर्वांना एकत्र बांधून ठेवतो.
१ आ. अंजीर = सत्संग : ‘अंजिरा’त अनेक बिया असतात. त्यामुळे पचन सुधारते. त्याचप्रमाणे साधकांच्या सत्संगामुळे योग्य दृष्टीकोन मिळून साधना सुरळीत चालू रहाते.
१ इ. काजू = सत्सेवा : कराल सेवा, तर मिळेल मेवा ! सेवा केल्याने पुष्कळ शिकायला मिळते आणि साधनेला वेगळीच चकाकी येते.
१ ई. पिस्ता = त्याग : ‘पिस्त्या’चे वरचे कवच काढले की, मगच ते खाऊ शकतो. त्याप्रमाणे आपले तन, मन, धन आणि सर्वस्व गुरुचरणी अर्पण केले की, मगच साधनेतील खरा आनंद मिळणार आहे.
१ उ. काळे मनुके = प्रीती : ‘काळे मनुके’ गोड असतात आणि आतील बीसुद्धा आरोग्याला चांगली असते. साधकांवर निरपेक्ष प्रेम आणि वेळप्रसंगी त्यांनी सुधारावे; म्हणून त्यांना चुका सांगते, ती खरी प्रीती !
१ ऊ. बदाम = स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया : ‘बदाम’ हा पौष्टिक आहेच; पण तो रात्रभर पाण्यात भिजवून खाल्ला, तर अधिक चांगला ! तसे आपण अंतर्मुख होऊन स्वतःचे स्वभावदोष आणि चुका पाहिल्या, तर आपण त्या भिजवलेल्या बदामाप्रमाणे अधिक पौष्टिक आणि मऊ होणार.
१ ए. अक्रोड = अहं निर्मूलन प्रक्रिया : ‘अक्रोडा’चे कवच जसे कठीण, तसे अहं-निर्मूलन कठीण. अक्रोडाने बुद्धी तल्लख होते. त्याप्रमाणे बुद्धीचा निश्चय करून बुद्धी श्री गुरुचरणी अर्पण केल्यावरच खरी साधना होते. अक्रोडाचे कवच कठीण असते आणि ते फोडल्यावरच तो खाता येतो. तसे अहं निर्मूलन केल्याविना गत्यंतर नाही. अहं निर्मूलन केल्यावरच खरा आत्मानंद अनुभवता येणार.
१ ऐ. तूप = भावजागृतीसाठी प्रयत्न : लाडूत इतर सर्व पदार्थ असतील आणि तूपच नसेल, तर त्याला ओलावा, मऊपणा किंवा ओशटपणा येणार नाही. त्याप्रमाणे साधनेचे सर्व प्रयत्न असतील; पण भावच नसेल, तर ती कोरडी वाटेल; म्हणून भाव महत्त्वाचा आहे.
असे हे आठ पदार्थ एकत्र केले की, पौष्टिक लाडू सिद्ध होतो. त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांंनी सांगितलेली अष्टांग साधना केली की, मोक्षप्राप्ती निश्चित होते !
२. प्रक्रिया झाल्यानेच लाडूमध्ये खमंगपणा, तर साधनेत प्रगल्भता येणार !
लाडू करतांना त्यातील सर्व जिन्नस कढईत गरम तुपावर चांगले मिसळून ते एकजीव केले जातात. त्याप्रमाणे साधनापथावर बर्या-वाईट, कठीण प्रसंगांतून तावून-सुलाखून आणि शिकूनच साधनेत एक प्रकारची प्रगल्भता येते.
३. साधनेला त्वरित आरंभ करा !
हे लाडू जेवढे लवकर संपवू, तेवढे ते ताजे आणि छान लागतील. ते नंतरसुद्धा खाऊ शकतो. तसे साधना जेवढी लवकर लहान वयात करू, तेवढे चांगले किंवा ज्या क्षणी ती कळेल, तेव्हापासून ती तंतोतंत आचरणात आणू शकतो.
४. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेविना साधना करणे अशक्य !
हे सगळे जरी असले, तरी श्री गुरूंच्या कृपेविना काहीच शक्य नाही. ‘परात्पर गुरु डॉक्टर, आपल्या कृपेविना, आशीर्वादावीना आम्ही काहीच करू शकत नाही. ‘आपणच या जिवाकडून अपेक्षित अशी साधना करवून घ्या’, अशी आपल्या चरणी प्रार्थना.’
आपलीच,
– सौ. गौरी अभिजित कुलकर्णी, पुणे (२४.२.२०२०)