गुरुपौर्णिमेच्या कालावधीत साधनेचे आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाचे साधिकेने केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती
१. गुरुमाऊलीच्या चरणांवरचे आनंदी फूल बनण्याचे ध्येय घेणे आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या पैलूंवर मात करण्याचे प्रयत्न करतांना ‘गुरुदेवांना शरण गेल्याविना काहीच होऊ शकत नाही’, हे लक्षात येणे
‘गुरुपौर्णिमेच्या कालावधीत मी गुरुमाऊलींच्या चरणांवरचे आनंदी फूल बनण्याचे ध्येय घेतले होते. माझ्यातील ‘प्रतिक्रिया व्यक्त करणे, वाईट वाटणे, अपेक्षा करणे’ या स्वभावदोष आणि अहं यांच्या पैलूंवर मात करणे, तसेच ‘इतरांचा विचार आणि कृतज्ञताभाव वाढवणे’ यांसाठी गुरुदेवांनी माझ्याकडून प्रयत्न करवून घेतले. मी स्वभावदोष आणि अहं यांच्या पैलूंवर मात करण्यासाठी प्रयत्न चालू केले. तेव्हा अनेक प्रसंग घडू लागले. त्या प्रसंगांत उफाळून आलेल्या स्वभावदोषांवर मला मात करणे अशक्य आणि कठीण असल्याने ‘गुरुदेवांना शरण गेल्याविना आणि त्यांच्याकडे याचना केल्याविना काहीच होऊ शकत नाही’, हे माझ्या लक्षात आले. ‘माझ्यात पालट करणे, भक्त बनणे’, हे केवळ भगवंतच करू शकतो’, याची मला जाणीव झाली.
२. प्रसंगात शांत रहाणे शक्य नसतांना गुरुदेवांना सांगितल्याने मनाची स्थिरता वाढणे
प्रसंग घडतांना त्यात स्थिर रहाण्यासाठी मला गुरुदेवांना शरण जाऊन आळवावे लागत होते. मी कितीही ठरवले की, प्रसंग शांत राहून हाताळायचा, तरी मला ते शक्य व्हायचे नाही. तेव्हा ‘मी काहीच करू शकत नाही. गुरुदेव कर्ते-करविते असून तेच सर्वकाही करू शकतात’, याची मला जाणीव झाली. त्या वेळी मी सतत गुरुदेवांना सूक्ष्मातून सांगू लागले. यामुळे मी स्थिर राहू लागले. मी सतत गुरुदेवांच्या स्मरणात रममाण होऊ लागलेे. त्यानंतर मला ‘अपेक्षा करणे, प्रतिक्रिया व्यक्त करणे’ या स्वभावदोषांवर मात करता येत असल्याचे कुटुंबीय सांगू लागले. माझ्या मनात सतत असणारी अस्थिरता पूर्ण थांबली. गुरुदेवांनी प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची माझी सिद्धता करवून घेतली.
३. जवळच्या एका नातेवाइकाला कोरोना झाल्याचे समजल्यावर गुरुदेवांनी स्थिर राहून त्या प्रसंगाला सामोरे जायला शिकवणे
गुरुपौर्णिमेच्या ४ दिवस आधी माझ्या जवळच्या एका नातेवाइकाला कोरोना झाल्याचे समजले. त्या वेळी गुरुदेवांनी मला स्थिर राहून शांतपणे या प्रसंगाला सामोरे जायला शिकवले. ‘त्या वेळी जे होईल, ते गुरुदेवांच्या इच्छेने होणार आहे’, असे वाटून माझे मन गुरुदेवांचे आनंदी फूल बनण्यासाठी सतत तळमळत होते. मी त्यासाठी देवाला आळवत असे. त्या काळात काही नातेवाइकांचे भ्रमणभाषवरील बोलणे मन विचलित करणारे किंवा निराशा येईल, असे असायचे; पण गुरुमाऊलींच्या कृपेने त्याचा माझ्या मनावर परिणाम झाला नाही. उलट देवाने या काळात मला त्याच्या हृदयमंदिरातच ठेवले होते. मी शांतपणे नाम घेत गुरुपौर्णिमेच्या सेवा भावपूर्णरित्या करत होते. यजमानही स्थिर राहून दिलेले जप आणि मंत्र भावपूर्णरित्या करायचे. ‘गुरुपौर्णिमेच्या काळात चांगली साधना होण्यासाठी देवाने एकांत उपलब्ध करून देऊन मला अंतर्मुख होण्यासाठी संधी दिली’, असा सकारात्मक विचार येऊन मला आलेल्या प्रसंगाविषयी कृतज्ञता वाटली.
४. सभोवती सतत गुरुदेवांचे अस्तित्व जाणवणे
गुरुपौर्णिमेच्या आधी २ दिवसांपासून मला सभोवती सतत गुरुदेवांचे अस्तित्व जाणवायचे. आरंभी त्यांचा आवाज ऐकू यायचा. नंतर मला विविध प्रकारचे सुगंध यायचे. मला बासरीचा नाद ऐकू यायचा. गुरुदेव मला सतत भावावस्थेत ठेवून सर्वकाही करवून घेत होते.
मला ज्या क्षणी गुरुदेवांचे अस्तित्व जाणवायचे, त्याच वेळी माझी २ वर्षांची मुलगी कृष्णाली म्हणायची, ‘‘आई, आबाजी (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले) येथे पानात बसलेले आहेत. ते फुलात बसून हसत आहेत.’’ ती त्यांना नमस्कार करायची. तीही सतत नामजपादी उपाय करत असे. ती गुरुदेवांची आरती आणि भजने लावायची. तेव्हा गुरुदेवांच्या आठवणीने माझी सतत भावजागृती होत असे.
५. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘प्रत्येक क्षणी नाम घेऊन गुरुदेवांच्या जवळ जायचे आहे’, या ओढीने जप करणे
मी घरातील सेवा ‘गुरुदेवांसाठीच करत आहे’, या भावाने करायचे. ‘मी असमर्थ आणि अपात्र आहे, तरी देव माझ्याकडून सेवा करवून घेत आहे’, अशा भावाने देवाने माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या समष्टी सेवा करवून घेतल्या अन् मला भरभरून आनंदही दिला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘प्रत्येक क्षणी मला नाम घेऊन ईश्वराच्या जवळ जायचे आहे’, या ओढीने जप केला जात असे. त्या दिवशी ‘मिळेल ती सेवा मला माझ्या देवापर्यंत पोचण्यासाठी मिळत आहे’, या भावाने आनंदाने स्वीकारून केली जात होती.
६. अनुभूती
गुरुपूजनाच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ मला देवीच्या रूपात दिसत होत्या आणि ‘त्यांच्या मुखावरील आनंद माझ्या आतमध्ये जात आहे’, असे मला जाणवत होते. गुरुदेवांचे दर्शन झाल्यावर माझी भावजागृती होऊन ‘देवा, मला जवळ घे’, अशी माझ्याकडून हाक मारली जात होती. ‘गुरुदेवांना प्रत्यक्ष पहात आहे. ते समोरच आहेत’, हा आनंद मी अनुभवत आहे. त्या वेळी गुरुदेवही हसून मला आशीर्वाद देत आहेत’, असे मला जाणवले.
७. कृतज्ञता आणि प्रार्थना
गुरुमाऊली, तुम्ही सर्वकाही करून आनंद मात्र मला अनुभवायला दिलात. तुम्ही यजमानांकडूनही या काळात मनापासून साधना करवून घेतली. तुम्ही माझ्या जवळच्या एका नातेवाइकाला कोरोनासारख्या आजारातून वाचवले आणि नव्याने जीवन दिले. त्यासाठी मी कृतज्ञ आहे. ‘गुरुमाऊली, माझ्या जीवनातील प्रत्येक क्षण, श्वास केवळ आपला महिमा आणि कीर्ती यांचे संकीर्तन करणे अन् सेवा करणे, यांत व्यतीत होवो’, ही आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. प्रार्थना दत्ता बुवा, सिंहगड रस्ता, पुणे. (जुलै २०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |