कार्निव्हल महोत्सवावर राज्यशासन ६० लाख ३५ सहस्र रुपये खर्च करणार
वैचारिक आणि सांस्कृतिक पर्यावरण धोक्यात आणणार्या कार्निव्हलवर लाखो रुपये खर्च करणे अपेक्षित नाही !
पणजी, १३ फेब्रुवारी (वार्ता.) – पणजी आणि मडगाव येथे अनुक्रमे १३ आणि १४ फेब्रुवारी या दिवशी होणार असलेल्या कार्निव्हलची सिद्धता पूर्ण झाली आहे. या महोत्सवावर शासन ६० लाख ३५ सहस्र रुपये खर्च करणार आहे. कार्निव्हल आणि शिगमोत्सव हे गोव्याचे राज्य महोत्सव आहेत. कोरोना महामारीचे कारण पुढे करून हे महोत्सव बंद करता येणार नाहीत. हे महोत्सव रहित केल्यास गोवा खड्ड्यात जाईल. कार्निव्हलची मजा लुटण्यासाठी लाखो पर्यटक गोव्यात येतात, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर पुढे म्हणाले, ‘‘पर्यटनावर आधारित विविध घटकांचा आपण विचार केला पाहिजे. कोरोना महामारीमुळे यंदा केवळ पणजी आणि मडगाव शहरांतच कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. मास्क वापरून आणि सामाजिक अंतर पाळून प्रत्येकाने कार्निव्हलची मजा लुटली पाहिजे. पर्यटनक्षेत्र टिकले तरच गोव्याची अर्थव्यवस्था टिकू शकेल.’’ (गोव्याची अर्थव्यवस्था पर्यटनावरच आहे, हा भ्रम आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेसाठी पर्यटकांवर अवलंबून रहाणे, हे परावलंबित्व आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गोव्याला आत्मनिर्भर बनवण्यासाठी युवकांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत, तसेच हिंटरलँड पर्यटनासाठी प्रयत्नरत आहेत. हे यशस्वी झाल्यावर पोर्तुगिजांच्या विकृत कार्निव्हलला डच्चू देणेच योग्य ठरेल. त्यामुळे वैचारिक आणि सांस्कृतिक पर्यावरणही जपले जाईल ! – संपादक)