प्रतिकात्मक पुतळा जाळण्यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद उफाळला
कणकवलीत दंगल नियंत्रक पथक तैनातभाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड |
सिंधुदुर्ग – भाजपचे नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत शिवसेनेने माजी खासदार राणे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे, तसेच १२ फेब्रुवारीला ओरोस येथे नीलेश राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून शिवसेनेने निषेध व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी सावंतवाडी येथे ‘खासदार विनायक राऊत यांनी राणे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली’, असा आरोप करत राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यामुळे सिंधुदुर्गात पुन्हा एकदा भाजप म्हणजेच राणे विरुद्ध शिवसेना हा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली येथे दंगल नियंत्रक पथकाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
भाजप पदाधिकार्यांवर गुन्हा नोंद व्हावा, यासाठी शिवसैनिकांचे पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन
सावंतवाडी – शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा पुतळा जाळणारे भाजपचे येथील नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावर तात्काळ गुन्हे नोंद करावेत, या मागणीसाठी शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी येथील पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. या वेळी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी ‘यापुढे असे कृत्य होऊ देणार नाही’, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
नगराध्यक्ष संजू परब यांनी शिवसेनेला आव्हान देत म्हटले आहे की, मी पुतळा जाळला आहे. काय करायचे ते करा. हिंमत असेल, तर मला अटक करून दाखवा.
झाराप तिठा येथे भाजपकडून खासदार विनायक राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
कुडाळ तालुक्यातील झाराप तिठा येथे शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा भाजपच्या कार्यकर्त्यांनी जाळला. या प्रकरणी पोलिसांनी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची धरपकड चालू केली आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील शिवसेना शाखेसमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
पोलीस भाजप कार्यकर्त्यांवर करत असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर भाजपचे कुडाळ तालुका संयोजक विनायक राणे यांनी म्हटले आहे की, पोलिसांनी नि:पक्षपाती भूमिका घ्यावी. आकसाने कारवाई केल्यास विरोधकांना जशास तसे उत्तर दिले जाईल.