अपार कृपा आणि प्रीती यांचा वर्षाव करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी सत्संगात साधिकेने अनुभवलेले भावक्षण !

परात्पर गुरु डॉ. आठवले

साधकांवर कृपेचा वर्षाव करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

१३ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध केलेल्या या लेखाच्या दुसर्‍या भागात आपण साधिकेच्या साधनेच्या आरंभी काळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने त्यांना आलेल्या अनुभूती आपण पाहिल्या. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.

(भाग ३)

भाग २ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/450805.html


  ७. वर्ष १९९५ ते १९९८

डॉ. रूपाली भाटकार

७ अ. बायबलमधील वचनांशी जुळणारी संस्थेच्या ग्रंथातील वचने शोधून काढण्याची कठीण सेवा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी देणे, बायबलमधील वचने वाचत असतांना आतून कुणीतरी ‘सनातनच्या कोणत्या ग्रंथात या वचनाला जुळणारे वचन मिळेल ?’, हे सुचवत असल्याचे जाणवणे आणि तेव्हा ‘गुरु आपल्या साधकाकडून कशी सेवा करवून घेतात ?’, याची प्रचीती येणे : ‘एका कॅथॉलिक साधकाने बायबलमधील काही वचने दिली होती. परात्पर गुरु डॉक्टरांनी ती मला देऊन संस्थेने प्रसिद्ध केलेल्या ग्रंथातून या वचनांशी मिळतीजुळती वचने शोधून काढायला सांगितली. ही अत्यंत कठीण सेवा होती; पण मी परात्पर गुरु डॉक्टरांवर संपूर्ण श्रद्धा ठेवून ती सूत्रे संकलित केली. मी परात्पर गुरु डॉक्टर आणि प.पू. भक्तराज महाराज यांना संपूर्णपणे शरण जाऊन ‘मी अज्ञानी आहे. तुम्हीच माझ्याकडून ही सेवा करवून घ्या’, अशी प्रार्थना करत असे. ही सेवा करतांना मी एका पटलावर बायबलमधील लिखाण आणि सनातनचे सर्व ग्रंथ घेऊन बसत असे. बायबलमधील वचने वाचत असतांना मला आतून कुणीतरी ‘सनातनच्या कोणत्या ग्रंथातून या वचनाला जुळणारे वचन मिळेल ?’, हे सुचवत असे. काही वेळा योग्य ते वचन शोधण्यासाठी मला दोन ग्रंथ पहावे लागत. ‘पवित्र बायबलमधील अध्यात्मशास्त्र’ हा सनातनचा ग्रंथ पूर्ण होईपर्यंत माझी ही सेवा चालू होती. ‘गुरु आपला शिष्य/साधक यांच्याकडून कशी सेवा करवून घेतात ?’, याचे हे एक उदाहरण आहे.

७ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली प्रीती ! : जेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले गोव्याला येत, तेव्हा आम्ही सर्व साधक त्यांना भेटायला त्यांच्या नातेवाइकांच्या घरी जात असू. आम्ही घरात प्रवेश करण्यापूर्वीच ते चारचाकीत ठेवलेली स्वतःची पेटी उघडत आणि मला आवडणार्‍या मुखवासाचे पाकीट माझ्या हातात देत. पुष्कळदा ते आम्हाला गोड खाऊ अथवा चॉकलेट्स पाठवत असत. त्या खाऊच्या पाकिटावर ‘प्रती, डॉ. रूपाली’ असे त्यांनी लिहिलेले असायचे. माझ्यासारख्या सामान्य जिवावर त्यांनी प्रीतीचा वर्षाव केला.

७ इ. सूक्ष्मातील कळण्याची क्षमता : या काळात परात्पर गुरु डॉक्टर माझी नवीन वास्तू पहायला येणार होते. तेथे येण्यापूर्वी एका साधकाच्या घरी त्यांनी ‘माझ्या घरातील बैठकीची खोली कशी आहे ?’, याचे तंतोतंत वर्णन केले होते.

८. सप्टेंबर १९९६

८ अ. बहिणीच्या आजारपणात तिच्या उपचारासाठी मुंबईला गेल्यावर घरचे भोजन न मिळणे, रुग्णालयातील अन्न खाऊन कंटाळून जाणे, मुंबई येथील सेवाकेंद्रात परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटायला गेल्यावर त्यांनी प्रेमाने जेवण वाढणे आणि रुग्णालयात असलेल्यांस जेवणाचा डबा देण्यास सांगणे अन् त्यानंतर रुग्णालयात कधीही घरच्या भोजनाची उणीव न भासणे : ‘मी मूळची गोव्याची आहे. वर्ष १९९६ मध्ये माझी बहीण गंभीर आजारी असतांना तिला उपचारासाठी मुंबईला नेले. रुग्णालयात असतांना कित्येक दिवस आम्हाला घरचे भोजन मिळत नव्हते आणि तेथील अन्न खाऊन आम्ही कंटाळलो होतो. एकदा मी रुग्णालयापासून दूर असलेल्या मुंबई येथील सेवाकेंद्रात परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटायला गेले. त्यांनी माझे आनंदाने स्वागत केले आणि मला प्रेमाने जेवायला वाढले. एवढेच नव्हे, तर त्यांनी तेथील साधकांना रुग्णालयात असलेल्या माझ्या कुटुंबियांसाठी जेवणाचा डबा द्यायला सांगितला. त्यांनी प्रत्यक्ष येऊन ‘डब्यात पुरेसे जेवण दिले आहे ना ?’, हे पाहिले आणि स्वतः अधिक अन्न त्यात घातले. या प्रसंगानंतर आम्हाला रुग्णालयात कधीही घरच्या भोजनाची उणीव जाणवली नाही. आमच्या दूर रहाणार्‍या सर्व नातेवाइकांनी आम्हाला जेवणाचे डबे पाठवायला आरंभ केला. एखाद्या दिवशी आम्हाला दोन दोन नातेवाइकांकडून डबे मिळत असत. ‘ही सर्व परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा आहे’, हे माझ्या लक्षात आले. या प्रसंगातून ‘परात्पर गुरु डॉक्टर हे ईश्‍वरी अवतार आहेत’, याची पुन्हा एकदा निश्‍चिती झाली.

८ आ. मोठ्या बहिणीच्या मेंदूच्या कर्करोगाचे शस्त्रकर्म झाल्यावर तिच्या प्रकृतीमध्ये गुंतागुंत निर्माण होणे, बर्‍याच आधुनिक वैद्यांना त्याचे निदान करता न येणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘औषधाच्या दुष्परिणामुळे असे झाले आहे, त्या बर्‍या होतील’, असे सांगणे, त्याप्रमाणे निदान होणे आणि औषध पालटल्यावर बहीण सामान्य होणे : मुंबईतील एका रुग्णालयात माझ्या मोठ्या बहिणीच्या मेंदूच्या कर्करोगाचे शस्त्रकर्म झाले. त्यानंतर तिच्या प्रकृतीमध्ये गुंतागुंत निर्माण झाली. तिचा तोंडवळा सुजला आणि तिला काही खाता येईना. ‘ती मृत्यूच्या दारात उभी आहे’, हे आम्हाला जाणवत होते. बरेच आधुनिक वैद्य तिला तपासून गेले; पण कुणालाच याचे निदान करता आले नाही. त्यामुळे माझ्या दुसर्‍या एका बहिणीने असाहाय्य होऊन परात्पर गुरु डॉक्टरांना दूरभाषवरून ही स्थिती सांगितली. त्यावर ते म्हणाले, ‘‘चिंता करू नका. औषधाच्या दुष्परिणामुळे असे झाले आहे. उद्या एक दुसरे आधुनिक वैद्य येतील. ते औषध पालटून देतील आणि त्या बर्‍या होतील.’’ त्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी एक नवीन आधुनिक वैद्य आले. त्यांनी तिला तपासून ‘एका औषधाचा हा जीवघेणा दुष्परिणाम आहे’, असे निदान केले. त्यांनी तिचे औषध पालटून दिले. त्यानंतर माझी बहीण हळूहळू सामान्य स्थितीला आली.

८ इ. बहिणीचे शस्त्रकर्म दुसर्‍या रुग्णालयात झाले असल्याने टाटा मेमोरियल रुग्णालयाने तिच्यावर उपचार करायला नकार देणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘उद्या परत जा’, असे सांगणे आणि तसे केल्यावर त्याच आधुनिक वैद्यांनी बहिणीवर उपचार करायला आरंभ करणे : माझ्या मोठ्या बहिणीला कर्करोग झाला असल्याने त्यावर उपचार घेण्यासाठी तिला टाटा मेमोरियल रुग्णालयात घेऊन जाण्याचे ठरले. तिचे शस्त्रकर्म दुसर्‍या रुग्णालयात झाले असल्याने त्यांनी तिच्यावर उपचार करायला नकार दिला. पुन्हा एकदा माझ्या बहिणीने याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांना कळवले. त्यावर ते ‘उद्या परत जा’, एवढे एकच वाक्य बोलले. दुसर्‍या दिवशी गेल्यावर त्याच आधुनिक वैद्यांनी माझ्या आजारी बहिणीचे स्वागत केले आणि तिच्यावर उपचार करायला आरंभ केला. हे केवळ ईश्‍वर करू शकतो. परात्पर गुरु डॉ. आठवले प्रत्यक्ष ईश्‍वरच आहेत !

९. वर्ष १९९८

९ अ. एका नातेवाइकाने साधिकेशी भांडून घर सोडून निघून जाणे, त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रातून सुगंध येणे, तो एक घंटा टिकून रहाणे आणि या सुगंधाच्या माध्यमातून त्यांनी ‘मी तुझ्या समवेत आहे’, असे आश्‍वस्त करणे : एकदा माझे एक नातेवाईक माझ्याशी भांडून घर सोडून निघून गेले. त्यानंतर काही वेळाने मला घरात पुष्कळ सुगंध येऊ लागला. ‘हा सुगंध कुठून येत आहे ?’, हे शोधतांना बैठकीच्या खोलीत असलेल्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रातून हा सुगंध येत असल्याचे माझ्या लक्षात आले. सुगंध एक घंटा टिकून होता. या माध्यमातून त्यांनी मला ‘मी तुझ्या समवेत आहे’, असे आश्‍वस्त केले होते. परात्पर गुरु डॉक्टरांचे हे छायाचित्र प्रत्येक दिवशी अधिकाअधिक सजीव होत आहे.

९ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी अध्यात्मशास्त्र सहजसोप्या पद्धतीने समजावून देणे

मी : ‘मोक्षप्राप्ती व्हावी’, अशी तळमळ मला वाटत नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले : असे असेल, तर साधना कशासाठी करत आहात ?

मी : आनंदासाठी !

परात्पर गुरु डॉ. आठवले : चिरंतन आनंद हाच मोक्ष आहे.

९ इ. जानेवारी १९९८

९ इ १ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विश्रांती घेतलेल्या पलंगावर अक्षता आढळणे : एकदा परात्पर गुरु डॉक्टर आमच्या घरी वास्तव्याला होते. त्या वेळी त्यांनी रात्री ज्या पलंगावर विश्रांती घेतली होती, त्यावर सकाळी अक्षता आढळल्या. ‘अक्षता सापडणे’, हे देवाच्या कृपेचे लक्षण आहे.

९ इ १ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले एका साधिकेला मार्गदर्शन करत असतांना शंखनाद ऐकू येणे : एकदा परात्पर गुरु डॉक्टर आमच्या घरात एका साधिकेला ‘त्यांनी रचलेले शक्तिस्तवन कसे गायचे ?’, याविषयी मार्गदर्शन करत होते. तेव्हा मला सूक्ष्मातून शंखनाद ऐकू आला. ‘हा शंखनाद त्यांच्या दैवी प्रचीती देणारा संकेत होता’, असे मला वाटते. ‘नाडीपट्टीचे वाचन करणारे परात्पर गुरु डॉक्टरांना विष्णूचा अवतार का म्हणतात ?’, हे आता माझ्या लक्षात आले.’ (ऑगस्ट २०२०)

(क्रमशः)

– डॉ. रूपाली भाटकार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

या लेखात/ कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या/सद् गुरुंच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

भाग ४ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/451302.html