राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : १४.२.२०२१
प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !
झोपलेले सरकार राज्य करण्याच्या क्षमतेचे आहे का ?
‘तमिळनाडूतील तिरूनेलवेलीमधील एका विद्यापिठाच्या अभ्यासक्रमातून डाव्या विचारसरणीच्या लेखिका अरुंधती रॉय यांचे नक्षलवाद्यांवर आधारित एक पुस्तक हटवण्यात आले. ‘वॉकिंग विथ द कॉम्रेड्स’ या नावाचे हे पुस्तक होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विरोध केल्यामुळे हे पुस्तक अभ्यासक्रमातून काढण्यात आले. गत ३ वर्षांपासून पुस्तक अभ्यासक्रमात होते आणि याची कल्पनाही इतरांना आली नाही.’
न्यायाधिशांचे अभिनंदन !
‘जे लोक कोरोना नियमांचा भंग करत आहेत, त्यांना न्यूनतम ५ ते अधिकाधिक १५ दिवसांसाठी कोणत्याही कोविड सेंटरमध्ये सेवा बजावण्याची शिक्षा करावी. दिवसांतून ४-५ घंटे त्यांच्याकडून काम करून घेण्यात यावे, असा आदेश गुजरात उच्च न्यायालयाने गुजरात सरकारला दिला आहे.’
देशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या संदर्भात स्वतः कृती न करणार्या सरकारला संयुक्त राष्ट्रांवर टीका करण्याचा काय अधिकार ?
‘ज्यूविरोध, इस्लामविरोध आणि ख्रिस्तीविरोध दर्शवणार्या घटनांचा निषेध केलाच पाहिजे; मात्र संयुक्त राष्ट्रांच्या ठरावामध्ये केवळ ३ धर्मांच्या सूत्रांचा उल्लेख आहे. हिंदु, बौद्ध आणि शीख यांवर होणार्या आक्रमणांची नोंद घेण्यात संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला अपयश आले आहे, अशी टीका भारताचे प्रतिनिधी आशिष शर्मा यांनी महासभेत केली.’
असा कुणी दुसरा झाला आहे का ?
‘सोलापूर येथील जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा ‘ग्लोबल टिचर पुरस्कार’ मिळाल्याविषयी त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विधान परिषदेत संमत झाला. ‘डिसले यांना मिळालेला पुरस्कार ही अभिमानाची गोष्ट आहे. आपल्याला मिळालेल्या रकमेतील अर्धी रक्कम इतर शिक्षकांना वाटून त्यांनी दातृत्व दाखवले’, असे मत संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी व्यक्त केले.’
मुलांना साधना शिकवली असती, तर असे झाले नसते !
‘कोरोना महामारीमुळे गेले कित्येक मास घरी बसून काढावे लागल्याने लहान मुलांचे मानसिक आरोग्य बिघडत आहे. या कालावधीत मुलांच्या मानसिक आरोग्याच्या समस्येत ७० टक्के वाढ झाली असल्याची माहिती गोवा बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष सुषमा मांद्रेकर यांनी दिली.’
महाराष्ट्रात प्रशासन असे काही आहे का ?
‘शिरूर (जिल्हा पुणे) तालुक्यातील न्हावरे गावात एक ३७ वर्षीय महिला नैसर्गिक विधीसाठी गेली असता तिच्यावर अज्ञाताकडून विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या महिलेने त्याला विरोध केला म्हणून तिला जबर मारहाण केली. या मारहाणीत महिलेचे डोळे निकामी झाले असल्याची घटना ३.११.२०२० च्या रात्री घडली. या प्रकरणी आतापर्यंत एका संशयिताला अटक करण्यात आली.’
हे सरकारला का कळत नाही ? यासाठी मागणी का करावी लागते ?
‘स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांत आरक्षणामुळे काय लाभ झाला ?, याचे सर्वेक्षण करण्यासाठी सरकारने समिती नेमावी. या सर्वेक्षणाअंती आरक्षणाचा फेरविचार करून आर्थिक आधारावर आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे.’