महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ?
सनातन गेली अनेक वर्षे सांगत असलेला आपत्काळ दाराच्या उंबरठ्यावर उभा आहे. कधीही तो आता प्रवेश करू शकतो. गेल्या वर्षभरापासून चालू असलेले कोरोना महामारीचे संकट ही आपत्काळाची एक छोटीशी झलक आहे. प्रत्यक्षातील आपत्काळ याहून कितीतरी पटींनी भयानक आणि अमानुष असणार आहे. त्याची विविध रूपे असणार आहेत. यात मानवनिर्मित, तसेच नैसर्गिक प्रकार असणार आहेत. यातील काहींची माहिती आपण या लेखमालिकेत पहात आहोत. या आपत्काळात स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करण्यासाठी काय करू शकतो, याची थोडीफार माहिती या लेखमालिकेतून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आजच्या लेखात जैविक आक्रमणांची आणि त्यावर करण्याच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली आहे.
भाग ३
भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/448848.html
२. जैविक अस्त्रांद्वारे होणारी आक्रमणे
२ अ. ‘जैविक अस्त्रे’ म्हणजे काय ? : ‘मनुष्य, पशू आणि पिके यांच्यावर रोगराई पसरावी’, यासाठी उपयोगात आणले जाणारे सूक्ष्म जिवाणू किंवा विषाणू यांना ‘जैविक अस्त्रे’ असे म्हणतात. गुरांचा सांसर्गिक रोग (अँथ्रेक्स), ग्रंथींचा रोग (ग्लँडर्स), एक आड एक दिवस येणारा ताप (ब्रुसेलोसिस), पटकी (कॉलरा), ‘प्लेग’, ‘मेलियोआयडोसिस’ इत्यादी रोगांच्या जिवाणू आणि विषाणू यांचा वापर ‘जैविक अस्त्रे’ म्हणून केला जातो.
२ आ. जैविक अस्त्रांद्वारे होणार्या आक्रमणांचे स्वरूप
१. जैविक अस्त्रांद्वारे आक्रमण करण्यासाठी प्राणी, पक्षी, मनुष्य, वायू इत्यादींचा वापर करणे : जैविक अस्त्रांद्वारे केल्या जाणार्या आक्रमणाच्या वेळी पटकीसारख्या उपरोल्लेखित रोगांचे विषाणू शत्रूराष्ट्रामध्येे प्राणी, पक्षी, मनुष्य, वायू इत्यादींच्या माध्यमांतून सोडले जातात. संबंधित रोगाची लागण झाल्यामुळे शत्रूराष्ट्राची जीवित, आर्थिक इत्यादी स्वरूपाची हानी होते.
२. जैविक अस्त्रांद्वारे आक्रमण झाल्याचे लक्षात येणे कठिण असणे : हे आक्रमण नेहमीच्या बाँब, क्षेपणास्त्रे किंवा हवाई यांच्या आक्रमणांसारखे नसते. त्यामुळे सर्वसामान्यांना ‘जैविक अस्त्रांद्वारे आक्रमण झाले आहे’, हे लक्षात येणे अवघड असते. देशात एखाद्या ठिकाणी किंवा सर्वत्र अचानक एखाद्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला, तर त्यामागे शत्रूराष्ट्राचे आक्रमण हे कारण असू शकते.
३. जैविक अस्त्रांद्वारे आक्रमण करणारे शत्रूराष्ट्र ओळखणेही कठिण असणे : ‘जैविक अस्त्रांद्वारे झालेले आक्रमण शत्रूराष्ट्राकडून करण्यात आले आहे’, हेही उघड होणे कठिण असते. सध्या ‘कोरोना’ हा विषाणू चीनने जैविक अस्त्र म्हणून निर्माण केला आणि शत्रूराष्ट्रांमध्ये पसरवला’, असा आरोप करण्यात येतो.
४. शासनाच्या घोषणेविना जैविक अस्त्रांद्वारे झालेल्या आक्रमणाविषयी कोणती उपाययोजना करावी, हे समजू न शकणे : जैविक अस्त्रांद्वारे झालेले आक्रमण हे बहुतांशी संसर्गजन्य असते. ‘जैविक आक्रमण झाले आहे आणि ते कशा प्रकारचे आहे’, हे शासनाकडून अधिकृतपणे सांगण्यात आल्याविना ‘त्याविषयी कोणती काळजी घ्यावी ?’, हे समजू शकत नाही.
५. जैविक अस्त्रांविना पसरलेल्या संसर्गजन्य रोगांच्या संसर्गामुळेही होणारी भीषण हानी : कोणत्याही शत्रूने जैविक अस्त्रांद्वारे आक्रमण केलेले नाही आणि केवळ संसर्गजन्य रोगांची लागण झाली, तरी जीवित अन् वित्त यांची मोठ्या प्रमाणात हानी होते. आजवर जगात सर्वाधिक, म्हणजे कोट्यवधी लोकांचे प्राण ‘प्लेग’ या संसर्गजन्य रोगाने घेतले आहेत. पटकी (कॉलरा), हिवताप (मलेरिया), शीतज्वर (इन्फ्लुएंझा), कांजिण्या, घटसर्प, डांग्या खोकला, क्षयरोग, कुष्ठरोग ही संसर्गजन्य रोगांची काही उदाहरणे आहेत. ‘कोविड १९’ अर्थात् ‘कोरोना’ हे याचे अलीकडचे उदाहरण होय. १२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत जगभरातील १० कोटी ८२ लाख ९८ सहस्रांहून अधिक लोकांना ‘कोरोना’ची लागण होऊन त्यांपैकी २३ लाख ७८ सहस्र ८७३ जणांचा मृत्यू झाला आहे.
६. जैविक अस्त्रांद्वारे किंवा अन्य प्रकारे पसरणारे संसर्गजन्य रोग यांच्यापासून रक्षण होण्यासाठीचे काही प्रतिबंधात्मक उपाय : जैविक अस्त्रांद्वारे केलेले आक्रमण कोणत्या विषाणूमुळे झाले आहे, हे समजल्यास त्यावर प्रतिजैविकांचा उपयोग करणे, लस सिद्ध करणे इत्यादी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात. बहुतांश वेळा जैविक अस्त्रांद्वारे आक्रमण झाले आहे, हे समजेपर्यंत मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झालेली असते. त्यामुळे एखाद्या रोगाचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात येताच, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी संसर्गजन्य रोगांपासून रक्षण होण्यासाठी करायची उपाययोजनाच अधिक वापरात आणली जाते. ‘कोरोना’ विषाणूमुळे उद्भवलेल्या महामारीच्या संदर्भातील अनेक उपाययोजना योजल्या होत्या. आक्रमण जैविक अस्त्रांद्वारे झालेले असो वा संसर्गजन्य रोग असो, त्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी या उपाययोजना मार्गदर्शक ठरतील.
२ इ. ‘कोरोना’सारख्या विषाणूची लागण स्वतःला होऊ नये, यासाठी घ्यायची काळजी
१. ‘कोरोना’ची लागण झाल्याची लक्षणे : ‘कोरोना’ विषाणूची लागण झाल्यावर तो फुफ्फुसात संक्रमित होतो. त्यामुळे पुढील लक्षणे दिसून येतात.
अ. ताप येणे
आ. कोरडा खोकला येणेे
इ. घसा खवखवणे
ई. श्वास घेण्याविषयी समस्या उद्भवणे, तसेच दम लागणे आणि थकवा येेणे
उ. डोकेदुखी, स्नायुदुखी इत्यादी लक्षणेही दिसून येणे
२ इ १. ‘कोरोना’ची लक्षणे दिसण्यापूर्वी घ्यायची सर्वसाधारण काळजी
अ. घरी असतांना घ्यायची काळजी
१. वाढलेली नखे नियमितपणे कापावीत.
२. जखम झालेली असल्यास ती झाकून ठेवावी.
३. आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवावा.
४. हात स्वच्छ धुणे
४ अ. हात साबणाने स्वच्छ धुतल्याविना डोळे, नाक आणि तोंड यांना स्पर्श करू नये.
४ आ. अन्न शिजवण्यापूर्वी, स्वयंपाक करतांना आणि स्वयंपाक सिद्ध केल्यानंतर, खाण्यापूर्वी, शौचालयात जाऊन आल्यानंतर, तसेच हातांवर धूळ बसलेली असेल, तेव्हा नळाच्या वाहत्या पाण्याखाली साबणाने हात धुवावेत किंवा ‘अल्कोहोल’ असलेला हात धुण्याचा द्रवरूप साबण (‘हँड सॅनिटायझर’) वापरावा.
४ इ. जनावरे, जनावरांचे खाद्य किंवा जनावरांची विष्ठा यांच्या संपर्कात आल्यास, हस्तांदोलन केल्यावर, तसेेच खोकला किंवा शिंक आल्यावर आणि रुग्णसेवा केल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत.
५. खोकतांना किंवा शिंकतांना तोंडवळ्यावर ‘टिश्यू पेपर’ , रुमाल किंवा सदर्याची बाही धरावी. वापरलेला ‘टिश्यू पेपर’ लगेच कचरापेटीत टाकून कचरापेटी त्वरित बंद करावी.
६. घरात कुणीही आजारी पडल्यास लगेच स्थानिक आरोग्यकेंद्रात उपचार करून घ्यावेत. सर्दी, पडसे झाले असल्यास त्वरित आधुनिक वैद्यांचा समादेश (सल्ला) घ्यावा.
७. दिवसभर सतत थोड्या-थोड्या वेळाने कोमट पाणी प्यावे. ‘तोंडाला कोरड पडणार नाही’, याची काळजी घ्यावी.
८. थंड पेय आणि पदार्थ उदा. सरबत, आईस्क्रीम, लस्सी इत्यादी पिणे टाळावे.
९. ‘स्वेटर’, ‘मफलर’ इत्यादी लोकरीचे कपडे प्रतिदिन थोडा वेळ उन्हामध्ये ठेवावेत. तसेच प्रतिदिन काही वेळ उन्हात उभे रहावे.
२ इ २. घराबाहेर असतांना घ्यायची काळजी
अ. तोंडवळ्यावर (चेहर्यावर) जंतुरोधक मुखपट्टीचा (‘मास्क’चा) वापर करणे : ‘कोरोना’चे विषाणू तोंड आणि नाक यांद्वारे शरिरात प्रवेश करतात. त्यामुळे विषाणूंचा शरिराच्या त्या भागांशी संपर्क येऊ देऊ नये. त्यासाठी जंतुरोधक मुखपट्टीचा (‘मास्क’चा) वापर करावा. ‘मास्क’चा वापर करतांना पुढील काळजी घ्यावी.
१. ‘मास्क’ ‘नाक, तोंड आणि हनुवटी पूर्णपणे झाकेल’, असा असावा.
२. ‘मास्क’ घालतांना किंवा काढतांना पाठीमागून त्याच्या दोर्यांना धरून घालावा किंवा काढावा. ‘मास्क’ तोंडवळ्यावर लावतांना किंवा काढतांना त्याच्या पुढील भागाला स्पर्श करू नये.
३. ‘मास्क’चा वापर केल्यानंतर तो इतरत्र कुठेही टाकू नये.
४. हे ‘मास्क’ ५ टक्के ‘ब्लिच’ किंवा १ टक्का ‘सोडियम हायपोक्लोराईट’ या द्रावणात बुडवून निर्जंतुक करावेत आणि त्यानंतर जाळावेत किंवा मातीत खोलवर पुरावेत.
५. गर्दीच्या ठिकाणी जाणे आवश्यक असल्यास आपण ‘सर्जिकल मास्क’चा वापर करावा.
२ इ ३. सामाजिक अंतर पाळणे : संसर्गजन्य रोगाचे संक्रमण वाढू नये, यासाठी दोन व्यक्तींनी परस्परांमध्ये किमान १ – २ मीटर इतके अंतर राखणे, याला ‘सामाजिक अंतर पाळणे’ असे म्हणतात. यालाच जागतिक आरोग्य संघटनेने ‘शारीरिक अंतरण पाळणे’ असेही संबोधले आहे. सामाजिक अंतर राखण्यासाठी पुढील गोष्टीही कराव्यात.
अ. हस्तांदोलन करणे टाळावे.
आ. गर्दीमध्ये जाणे टाळण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येत असलेली ठिकाणे, उदा. व्यापारी संकुल, चित्रपटगृहे, शाळा, शासकीय कार्यालये इत्यादी बंद ठेवण्यास सांगितले जाते.
२ इ ४. सार्वजनिक ठिकाणच्या वस्तू, इमारत इत्यादींना स्पर्श करणे टाळणे : कोरोनाच्या विषाणूचा स्टील, काच इत्यादींच्या वस्तूंवर जिवंत रहाण्याचा कालावधी २ घंट्यांपासून ते काही दिवसांपर्यंतचा आहे. त्यामुळे चिकित्सालय, दुकाने, व्यापारी संकुल, उद्वाहन यंत्र (लिफ्ट) इत्यादी ठिकाणी गेल्यानंतर शक्यतो तेथील वस्तू, भिंती, लोखंडी जाळ्या (ग्रील्स) इत्यादींना स्पर्श करणे टाळावे.
२ इ ५. हात साबणाने धुणे किंवा ‘हँड सॅनिटायझर’चा वापर करणे : अधिक कालावधीसाठी घराबाहेर थांबावे लागणार असल्यास अधूनमधून साबणाने हात स्वच्छ धुवावेत किंवा ‘हँड सॅनिटायझर’चा उपयोग करावा. एखादे व्यापारी संकुल (मॉल), दुकान, अधिकोष अशी ठिकाणी जेथे आपण काही वस्तूंना स्पर्श करणे अपरिहार्य आहे, अशा ठिकाणी आत जातांना आणि बाहेर पडतांना दोन्ही वेळा ‘हँड सॅनिटायझर’चा उपयोग करावा. ‘साबण अथवा ‘हँड सॅनिटायझर’ उपलब्ध नसल्यास लिंबाचा रस आणि पाणी यांच्या मिश्रणानेही हात धुतल्यास आजारांपासून रक्षण होऊ शकते’, असे संशोधकांचे मत आहे.
२ इ ५. महत्त्वाच्या कारणासाठी वाहनाने प्रवास करावा लागल्यास वाहनात घ्यावयाची दक्षता : प्रवास करतांना आलेल्या संपर्कामुळे संसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढते. त्यामुळे महामारी चालू असलेल्या काळात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रत्येकानेच प्रवास टाळायला हवा. काही आवश्यक कामानिमित्त प्रवास करावाच लागला, तर पुढील काळजी घ्यावी.
२ इ ५ अ. वाहनात घ्यावयाची दक्षता
१. स्वतःच्या वाहनाने किंवा न्यूनतम व्यक्ती असलेल्या गाडीने प्रवास करावा.
२. वातानुकूलित बस किंवा आगगाडी यांतून प्रवास करणे टाळावे. स्वतःच्या वाहनामध्येही वातानुकूलन यंत्राचा वापर करणे टाळावे.
३. रेल्वे किंवा बस यांमधून प्रवास करत असतांना ‘आपल्या भोवती सर्दी, खोकला किंवा ताप या रोगांची लक्षणे असलेली व्यक्ती आहे’, अशी शंका आली, तर तिच्यापासून १ मीटरपेक्षा दूर थांबावे किंवा शक्य असल्यास प्रवासाचा दुसरा पर्याय निवडावा, उदा. दुसर्या बसने जावे.
४. साबणाने हात स्वच्छ धुऊनच तोंडवळ्याला हातांचा स्पर्श करावा.
५. प्रवासात शक्य असल्यास मध्येमध्ये हात स्वच्छ धुण्यासाठी साबण किंवा ‘हँड सॅनिटायझर’ यांचा वापर करावा.
२ इ ६. प्रवासात वापरलेल्या कपड्यांच्या संदर्भात घ्यावयाची काळजी
अ. प्रवासात वापरलेल्या कपड्यांवर साधारण १२ घंट्यांपर्यंत रोग पसरवणारे जंतू जिवंत राहू शकतात. यामुळे प्रवासातून घरी आल्यावर त्या कपड्यांनी घरात न फिरता थेट प्रसाधनगृहात जावे.
आ. अंगावरचे कपडे काढून हात-पाय आणि साबण लावून तोंड स्वच्छ धुवावे किंवा शक्य असल्यास गरम पाण्याने अंघोळ करावी.
इ. प्रवासातील कपडे न धुता पुन्हा वापरायचे असल्यास त्यांचा अन्य वस्तूंना किंवा धुतलेल्या कपड्यांना स्पर्श होणार नाही, अशा पद्धतीने ते ‘हँगर’ला अडकवून वेगळे ठेवावेत. प्रवासात वापरलेल्या कपड्यांना कधीही स्पर्श केल्यास लगेच हात स्वच्छ धुवावेत. शक्य असल्यास हे कपडे उन्हात ठेवावेत.
ई. प्रवासातील कपड्यांना स्पर्श न करता घरात वापरण्याचे कपडे घालावेत.
उ. प्रवासात वापरलेले कपडे धुवायचे झाल्यास ते नेहमीप्रमाणे धुऊन उन्हात वाळत घालावेत.’
ए. बाहेरून घरी परत आल्यावर घ्यावयाची काळजी
१. पादत्राणे काढून घराबाहेर ठेवावीत.
२. बाहेरून आणलेले साहित्य एका बाजूला वेगळे करून (‘क्वारंटाइन’) करून ठेवावे. किमान २४ तासांनी त्यांचा उपयोग करावा.
३. ‘मास्क’ आणि अंगावरील कपडे यांच्याविषयी प्रवासावरून आल्यानंतर करायच्या कृतींप्रमाणेच कृती कराव्यात.
४. ‘कोरोना’चा विषाणू ३८ अंश सेल्सिअस तापमानाच्या वरील तापमानात टिकू शकत नसल्याने गरम पाण्याने स्वच्छ अंघोळ करावी.
५. श्वसनमार्गात काही विषाणूंचा शिरकाव झाला असल्यास तेही नष्ट व्हावेत, यासाठी वाफ घ्यावी.
२ इ ६. आयुर्वेदानुसार शरिराची प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी करायच्या उपाययोजना
२ इ ६ अ. आयुष मंत्रालयाने सांगितलेले उपाय
१. आरोग्य चांगले राखण्यासाठी करायचे सर्वसामान्य उपाय
अ. ‘दिनचर्येत किमान ३० मिनिटे योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांचा समावेश करावा.
आ. नेहमीच्या जेवणात हळद, जिरे, धने आणि लसूण यांचा वापर करावा.
२. शरिराची प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठीचे उपाय
अ. प्रतिदिन सकाळी एक चमचा च्यवनप्राश खावे. मधुमेही व्यक्तींनी साखरविरहित च्यवनप्राशचा वापर करावा.
आ. दिवसातून एकदा किंवा दोनदा वनौषधीयुक्त चहा प्यावा, तसेच तुळस, दालचिनी, काळी मिरी, सुंठ आणि मनुका घालून बनवलेला काढा प्यावा. यामध्ये आवश्यकता भासल्यास चवीसाठी गूळ आणि / किंवा लिंबाचा रस घालावा.
इ. १५० मिलीलिटर गरम दुधात अर्धा चमचा हळद पूड घालून दिवसातून एकदा किंवा दोनदा प्यावे.
२ इ ७. वैद्य सुविनय दामले, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग यांनी सांगितलेले आयुर्वेदातील उपचार
अ. ‘धूपन चिकित्सा
१. घरात सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्या वेळी धूप घालावा.
२. धूप उपलब्ध नसल्यास कडूनिंबाची पाने, हळद पूड, कापूर, गुग्गुळ, लवंग, वेलचीची साले, कांद्या-लसणीची साले, मिरचीचे देठ, तूप, अक्षता, तसेच गायीच्या शेणाच्या गोवर्या, करवंटी, कोळसा यांपैकी उपलब्ध साहित्य वापरून धूप घालावा.
२ इ ७ आ. दृष्ट काढणे : तिन्हीसांजेला लहान मुले आणि वृद्ध यांची दृष्ट काढावी. (अधिक माहितीसाठी वाचा : सनातनचा ग्रंथ ‘दृष्ट काढण्याचे प्रकार’)
२ इ ७ इ. जंतुनाशक फवारणी : घर आणि प्रांगण यांमध्ये गोमूत्राची फवारणी करावी. गोमूत्र उपलब्ध नसल्यास गायीचे शेण पाण्यात कालवून सर्वत्र सडा टाकावा. तसेच कडूनिंब, करंज, हळद, तुळस इत्यादी औषधी द्रव्ये पाण्यात उकळून त्यांचा अर्क पाण्यात उतरल्यावर ते पाणी घराच्या अवतीभवती फवारावे. (अर्क पाण्यात उतरल्यावर पाणी गडद रंगाचे होते.)
२ इ ७ ई. विलगीकरण : संसर्गाने रोग पसरतात, हे आयुर्वेदातही सांगितले आहे.
प्रसङ्गाद्गात्रसंस्पर्शान्निःश्वासात् सहभोजनात् ।
सहशय्यासनाच्चापि वस्त्रमाल्यानुलेपनात् ॥
कुष्ठं ज्वरश्च शोषश्च नेत्राभिष्यन्द एव च ।
औपसर्गिकरोगाश्च सङ्क्रामन्ति नरान्नरम् ॥ – सुश्रुतसंहिता, निदानस्थान, अध्याय ५, श्लोक ३३ आणि ३४
अर्थ : नित्य एकत्र काम करणे, अंगाला नित्य स्पर्श करणे, दुसर्याने सोडलेला श्वास घेतला जाणे, एकत्र बसून जेवण करणे, एका आसनावर बसणे, एका शय्येवर झोपणे, दुसर्याची वस्त्रे धारण करणे, इतरांनी वास घेतलेल्या फुलांचा वास घेणे, इतरांनी वापरलेले गंध (चंदन) स्वतःला लावणे इत्यादी कारणांनी त्वचेचे विकार, ताप, शोष (टी.बी.), डोळे येणे यांसारखे ‘औपसर्गिक (संसर्गजन्य)’ विकार एकापासून दुसर्याकडे संक्रमित होतात.
संसर्गजन्य रोगांना रोखण्यासाठी संसर्ग टाळणे हा उपाय आहे. विलगीकरणामुळे संसर्ग टाळला जातो.
२ इ ७ उ. शरिराची प्रतिकारक्षमता वाढवणारा काढा घेणे : तुळशीची ५ – ६ केसरे (मंजिर्या) (तुळशीचे चूर्ण नको.), ४ काळ्या मिरी आणि ४ लवंगा ६ कप पाण्यामध्ये घालून ते पाणी २ कप होईपर्यंत आटवावे. ते गाळून ‘थर्मास’मध्ये भरून ठेवावे. दिवसातून ३ – ४ वेळा घोट-घोट प्यावे.
२ इ ८. आयुर्वेदानुसार करायचे अन्य उपचार
अ. तेल तोंडात धरून थुंकणे : एक मोठा चमचा भरून तिळाचे किंवा खोबरेल तेल तोंडात घ्यावे; मात्र ते न पिता तोंडात २ ते ३ मिनिटे धरून घोळवावे. नंतर ते थुंकून टाकून कोमट पाण्याने चुळा भरून टाकाव्यात. दिवसातून एकदा किंवा दोनदा ही कृती करावी.
आ. नस्य : नाकात तूप अथवा तेल घालावे. दिवसातून २ – ३ वेळा नाकाला आतल्या बाजूने तूप अथवा तेल लावून करंगळी फिरवावी.
इ. सर्वांगाला तेल लावणे : प्रतिदिन सकाळी अंघोळीपूर्वी अंगाला तेलाचे मर्दन करावे.
ई. कोरडा खोकला येत असेल किंवा घसा दुखत असेल, तर करायचे उपाय
१. दिवसातून एकदा ताजी पुदिन्याची पाने किंवा ओवा घातलेल्या गरम पाण्याची वाफ घ्यावी.
२. खोकला येत असेल किंवा घसा खवखवत असेल, तर अर्धा चमचा लवंगपूड गूळ अथवा १ चमचा मधात मिसळून त्याचे मिश्रण करून ठेवावे. कोरडा खोकल्या आल्यास त्यातील १ थेंब चाटावा.
वरील उपायांनी साधा कोरडा खोकला किंवा घसा दुखणे यांतून आराम मिळतो; मात्र ही लक्षणे तशीच राहिली, तर वैद्यकीय समुपदेश (सल्ला) घ्यावा.
३. घरगुती औषधे किती दिवस घ्यावीत, याविषयी मार्गदर्शक सूत्र : साधारणपणे एकदा घेतलेले कोणतेही औषध त्याचा सुपरिणाम किंवा दुष्परिणाम २४ घंट्यांमध्ये दाखवतेच; परंतु एका दिवसात हा सूक्ष्म परिणाम लक्षात येणे अवघड वाटत असल्यास ते औषध पुढे ३ दिवस चालू ठेवावे. तरीही काही न समजल्यास अधिकाधिक ७ दिवस औषध चालू ठेवावे. ७ दिवस उपचार करूनही काही लाभ न झाल्यास किंवा ‘औषधाचा दुष्परिणाम होत आहे’, असे लक्षात आल्यास औषध बंद करावे आणि तज्ञ वैद्याचे मार्गदर्शन घ्यावे.’ – वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.६.२०१७)]
अ. विरेचन : ज्यांना कोणताही त्रास नाही, अशांनी ४ चमचे एरंडेल तेल पहाटे ४ वाजता सलग ४ दिवस घ्यावे. यामुळे ३ – ४ मोठे जुलाब होऊन पोट साफ होईल. पोटातील चिकटा, आम नाहीसा होईल आणि सपाटून भूक लागेल.
आ. अन्य : वमन, बस्ती आणि रक्तमोक्षण ही कर्मे जवळपास असणार्या पंचकर्म करणार्या तज्ञ वैद्यांकडून कोणत्याही विषाणूची साथ संपल्यानंतर अवश्य करवून घ्यावीत.’
(संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’, २६.४.२०२०)
२ इ ९. संसर्गजन्य रोगांवर प्रतिबंधात्मक आध्यात्मिक उपाय : ‘समाजात वाढत असलेल्या अधर्माचरणामुळे (उदा. अनाचार, बलात्कार, स्वैराचार, हत्या इत्यादींमुळे), म्हणजेच समष्टी पाप वाढल्यामुळे समाजाचे प्रारब्ध खडतर बनते. यामुळे अतीवृष्टी, अनावृष्टी, भूकंप, युद्ध, संसर्गजन्य रोग इत्यादी आपत्ती सृष्टीवर किंवा संबंधित समाजावर येतात’, असे शास्त्र सांगते. ‘या आपत्तींपैकी एखाद्या संसर्गजन्य रोगाचा प्रसार होत असल्यास त्याला आध्यात्मिक स्तरावर अटकाव कसा घालायचा ?’, हे आता आपण पाहू.
संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्यामागे असलेली सूक्ष्मातील, म्हणजे आध्यात्मिक कारणे दूर होण्यासाठी औषधोपचारांच्या जोडीला त्यांवर ‘आध्यात्मिक उपाय’ करणे आवश्यक असते. आध्यात्मिक उपाय म्हणजे सूक्ष्म बाधेमुळे होणारे त्रास दूर होण्यासाठी केलेले उपाय ! आध्यात्मिक उपायांमध्ये मंत्रजप करणे, स्तोत्रपठण करणे, नामजप करणे इत्यादी उपाय येतात. संसर्गजन्य रोग असलेली ‘कोरोना’ची जगभरातील महामारी आजही चालूच आहे आणि आतापर्यंत लाखो माणसे मृत्यूमुखी पडली आहेत. ‘कोरोना’ची लागण होणे चालू होऊन १ वर्ष व्हायला आले, तरीही त्यासंदर्भातील लस सिद्ध झालेली नाही. जोपर्यंत अशा संसर्गजन्य रोगासाठी परिणामकारक औषधे किंवा लस उपलब्ध होत नाही, तोपर्यंत अशा संकटांना सामोरे जाण्यासाठी आध्यात्मिक उपायांवरच भर देणे आवश्यक आहे. हे उपाय पुढे दिले आहेत.
अ. संसर्गजन्य रोगांवरील मंत्रजप : संसर्गजन्य रोगांचा प्रभाव अल्प होण्यासाठी संत आणि मंत्रजपाचे अभ्यासक यांनी पुढील मंत्रजप शोधून काढले आहेत. ते सर्व मंत्रजप म्हणण्यापूर्वी ‘हे सूर्यदेवते, कृमींमुळे मला झालेली व्याधी आणि माझ्यात पसरलेले विष तुझ्या कोवळ्या किरणांनी नष्ट होऊ दे. चांगली साधना करता येण्यासाठी माझे शरीर निरोगी राहू दे, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे’, अशी प्रार्थना करावी. त्यानंतर सकाळी, दुपारी आणि सायंकाळी असे दिवसातून तीनदा प्रत्येक वेळी २१ वेळा पुढील मंत्रजप भावपूर्णपणे ऐकावेत. हे तिन्ही मंत्रजप ‘सनातन चैतन्यवाणी’ या ‘अॅन्ड्रॉइड अॅप’वर उपलब्ध आहेत.
इ. सनातनचे परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांनी सांगितलेले विषाणूनाशक मंत्र
१. अत्त्रिवद् वः क्रिमयो हन्मि कण्ववज्जमद् अग्निवत् ।
अगस्त्यस्य ब्रह्मणा सं पिनष्म्यहं क्रिमीन् ॥
– अथर्ववेद, कांड २, सूक्त ३२, खंड ३
अर्थ : ऋषी म्हणतात, ‘हे कृमींनो (रोग उत्पन्न करणार्या सूक्ष्म जंतूंनो) ! अत्रि, कण्व आणि जमदग्नि या ऋषींनी ज्याप्रमाणे तुमचा नाश केला, त्याप्रमाणे मीही तुमचा नाश करीन. अगस्त्य ऋषींच्या मंत्राने मी ‘रोग उत्पन्न करणारे सूक्ष्म जंतू पुन्हा वाढू शकणार नाहीत’, अशी व्यवस्था करीन.’
२. हतासो अस्य वेशसो हतासः परिवेशसः ।
अथो ये क्षुल्लकाः इव सर्वे ते क्रिमयो हताः ॥
– अथर्ववेद, कांड २, सूक्त ३२, खंड ५
अर्थ : या कृमींचे (रोग उत्पन्न करणार्या सूक्ष्म जंतूंचे) घर नष्ट झाले, त्या घराच्या जवळचे घर नष्ट झाले आणि लहान-लहान बीजरूपात होते, तेही नष्ट झाले.
३. मंत्र-उपचारतज्ञ डॉ. मोहन फडके, पुणे यांनी सांगितलेला मंत्र
ॐ भू ः । ॐ भुवः । ॐ स्वः । ॐ तत्सवितुर्वरेण्यम् ।
ॐ भर्गो देवस्य धीमहि । ॐ धियो यो नः प्रचोदयात् ॥
– ऋग्वेद, मंडल ३, सूक्त ६२, ऋचा १०
अर्थ : दैदीप्यमान भगवान सविता (सूर्य) देवाच्या त्या तेजाचे आम्ही ध्यान करतो. ते तेज आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो.
सहा वेळा ‘ॐ कार’ असलेला हा गायत्रीमंत्र महामारीच्या वेळी प्रतिकारक्षमता वाढावी, यासाठी आणि श्वसनसंस्थेच्या सर्व विकारांवर उपयुक्त ठरू शकतो.
४. स्तोत्रपठण : आपत्काळात सर्व शरिराचे व्याधींपासून रक्षण व्हावे, यासाठी प्रतिदिन सकाळी ‘चंडीकवच (देवीकवच)’, तर सायंकाळी ‘बगलामुखी दिग्बन्धन स्तोत्र’ ऐकावे. ही स्तोत्रे ‘सनातन चैतन्यवाणी’ या ‘अॅन्ड्रॉइड अॅप’वर उपलब्ध आहेत.
५. सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ‘कोरोना’ महामारीच्या संदर्भात सांगितलेला नामजप : ‘कोरोना’ महामारीच्या वेळी सनातनचे संत सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ध्यानातून ‘कोरोना’ महामारीपासून रक्षण होण्यासाठी’ नामजप शोधून काढला होता. त्याचा सनातनच्या साधकांना लाभ झाला.
अ. नामजप : ‘श्री दुर्गादेव्यै नमः । – श्री दुर्गादेव्यै नमः । – श्री दुर्गादेव्यै नमः । – श्री गुरुदेव दत्त । – श्री दुर्गादेव्यै नमः । – श्री दुर्गादेव्यै नमः । – श्री दुर्गादेव्यै नमः । – ॐ नमः शिवाय ।’
हा नामजप ‘सनातन चैतन्यवाणी’ या ‘अॅन्ड्रॉइड अॅप’वर उपलब्ध आहे.
आ. प्रार्थना : ‘कोरोना’च्या विषाणूंच्या विरोधात माझ्या शरिरातील प्रतिकारक्षमता वाढावी आणि मला आध्यात्मिक बळ मिळावे’, अशी प्रार्थना नामजप करतांना देवाला करावी.
इ. कालावधी : ‘कोरोना’च्या विषाणूंची लागण होऊ नये म्हणून हा नामजप प्रतिदिन १०८ वेळा (किंवा १ घंटा) करावा.
जर एखाद्याला ‘कोरोना’च्या विषाणूंची लागण झाली असेल, तर त्याने त्याला होत असलेल्या अल्प ते तीव्र त्रासानुसार हा नामजप प्रतिदिन २ ते ४ घंटे करावा. ‘कोरोना’च्या विषाणूंच्या संपूर्ण निर्मूलनासाठी हा नामजप २१ दिवस करणे लाभदायक आहे.
२ इ १०. ‘कोरोना’च्या विषाणूंशी लढण्यासाठी योग आणि ध्यान यांचे महत्त्व : ‘अमेरिकेतील ‘हार्वर्ड मेडिकल स्कूल’ने ‘कोरोना’ महामारीच्या संदर्भात एक आरोग्य दिनदर्शिका काढली आहे. त्यात म्हटले आहे की, ‘कोरोना’ महामारीशी लढण्यासाठी श्वासावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. त्यासाठी योग आणि ध्यान साहाय्यभूत आहेत.’ ही दिनदर्शिका प्रसिद्ध झाल्यानंतर अमेरिकेतील अलबामा येथील शाळांमध्ये गेल्या २७ वर्षांपासून चालू असलेले योगासनांवरील प्रतिबंध उठवले गेले. (संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’, १७.३.२०२०)
२ इ ११. संसर्गजन्य रोगांची लागण झाल्यास काय करावे आणि काय करू नये ?
१. समाजात संसर्गजन्य रोगाची साथ चालू झाली आहे, असे लक्षात आल्यानंतर सर्वांनी शक्यतो घरीच रहावे.
२. पालेभाज्या आणि अन्न खातांना आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी. शिळे अन्न खाऊ नये.
३. स्वतःमध्ये ताप, खोकला किंवा श्वासोच्छ्वास करण्यास त्रास होणे अशी सर्वसामान्य संसर्गाची प्राथमिक लक्षणे दिसून असल्यास घरातील एका खोलीतच (‘होम क्वारंटाईन’) रहावे. आपल्या वापरातील भांडी, रूमाल, कपडे इत्यादी कुटुंबियांच्या संपर्कात येणार नाही, अशी काळजी घ्यावी.
४. ताप, खोकला किंवा श्वासोच्छ्वास करण्यास त्रास होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात आल्यास लगेच वैद्यकीय समुपदेश घेऊन आवश्यक ते उपचार घ्यावेत. लक्षणांची तीव्रता अधिक असल्यास त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात कळवावे, तसेच शासनाने व्यवस्था केलेल्या विलगीकरण कक्षामध्ये (‘क्वारंटाईन सेंटर’मध्ये) प्रवेश घेऊन तेथे उपचार घ्यावेत.
२ इ १२. ‘कोरोना’सारख्या रोगांचा संसर्ग रोखण्यासाठी हिंदु संस्कृतीचे नियमित आचरण करणे आवश्यक ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
अ. जगाने मान्य केलेले ‘हात जोडून नमस्कार करण्याचे महत्त्व ! : ‘कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक देश बाधित झाले. हा संसर्ग होण्यास एकमेकांना भेटतांना हस्तांदोलन करणे, मिठी मारणे, चुंबन घेणे आदी पाश्चात्त्य पद्धतीही कारणीभूत ठरत आहेत, हे लक्षात आल्यावर अनेक पाश्चात्त्य देशांत आता ‘नमस्ते’ म्हणण्याची पद्धत रूढ झाली आहे. इंग्लंडचे प्रिंस चार्ल्स आणि पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनिओ कोस्टा, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर इत्यादींसह अनेक नेत्यांनी नमस्कार करणे चालू केले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी ‘कोरोना’पासून रक्षण होण्यासाठी भारतीय पद्धतींचा अवलंब करा !’, असे आवाहन केले. भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनीही ‘जगाने नमस्काराचा अवलंब करावा’, असे आवाहन केले. यावरून हिंदु संस्कृतीनुसार आचरण करणे, ही काळाची आवश्यकता बनली आहे, असे स्पष्ट होते.
आ. हिंदूंच्या ‘चरक संहिते’त महामारीविषयीच्या उपाययोजना दिलेल्या असणे : हिंदूंच्या प्राचीन ‘चरक संहिते’त ‘जनपदोध्वंस’ म्हणजेच ‘महामारी’चा केवळ उल्लेखच नाही, तर महामारीशी संबंधित उपायही दिले आहेत. महामारी उद्भवू नये, यासाठी प्रतिदिन करायच्या कृतीही त्यामध्ये दिल्या आहेत. त्या आज संसर्गजन्य रोगांविषयी तंतोतंत लागू पडतात. कुणाचे उष्टे खाऊ नये, बाहेरून आल्यावर तोंड-हात-पाय स्वच्छ धुऊन घरात प्रवेश करणे यांसारख्या अनेक कृती हिंदु संस्कृतीने शिकवल्या आहेत.
इ. हिंदूंच्या धर्माचरणाच्या कृती एक प्रकारे वैज्ञानिक असल्याने त्यांचे आचरण करून निरोगी आणि आनंदी बना ! : हिंदु संस्कृतीनुसार नित्य केले जाणारे धर्माचरण उदा. धूप दाखवणे, उदबत्ती लावणे, तुपाचा दिवा लावणे, तुळशी वृंदावनाची पूजा करणे, गोमयाने भूमी सारवणे, कापूर आरती करणे, अग्निहोत्र करणे आदी इत्यादींमुळे वातावरणाची आणि वास्तूचीही शुद्धी होते. अशा वास्तूंमध्ये संसर्गजन्य रोगांचे विषाणू येण्याचे किंवा टिकण्याचे प्रमाण अत्यल्प असते. हिंदु संस्कृतीतील धर्माचरणाच्या कृती लाभदायी ठरतात आणि त्या वैज्ञानिकदृष्ट्याही योग्य आहेत, असे सिद्ध झाले आहे. आपल्या पूर्वजांनी जोपासलेल्या विविध धर्माचरणाच्या कृतींचे नित्य आचरण केल्यास आपल्याला अवश्य निरोगी आणि आनंदी जीवन जगता येईल.’
भाग ४. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/453135.html