पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कचरा वाहतूक ठेकेदारावर फसवणुकीचा गुन्हा
केवळ गुन्हा नोंद करून न थांबता संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !
पिंपरी – कचर्याचे वजन वाढावे, यासाठी खासगी जागेतील कचरा भरून कराराचा भंग केल्यामुळे महापालिकेच्या एजी इनव्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. या आस्थापनाचा ठेकेदार आणि अन्य ८ जणांवर महापालिकेचे आरोग्य निरीक्षक शशिकांत मोरे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. हा प्रकार ७ फेब्रुवारी या दिवशी वाकड येथील कस्पटे वस्तीमध्ये उघडकीस आला.
सकाळी सहाच्या सुमारास आरोपींनी संगनमत करून कस्पटे वस्ती, वाकड येथील शौर्य हॉटेलच्या तळघरातील खासगी कचरा वाहनांमध्ये भरून पालिकेशी केलेल्या कराराचा भंग केला आणि महापालिका, तसेच शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील पोलीस तपास चालू आहे.