उत्तराखंडमधील दुर्घटना : चीनचे पर्यावरण युद्ध ?
१. कोणतीही भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थिती नसतांना अचानक हिमकडा कोसळणे
काही दिवसांपूर्वी उत्तराखंडमध्ये एक हिमकडा कोसळला आणि त्याखाली दबून अनेकांचा मृत्यू झाला. याखेरीज तेथे असलेले एक धरण फुटून नदीला अचानक पूर आला. त्यात नदीकाठी रहाणारे काही जण वाहून गेले. हा सीमावर्ती भाग असल्याने त्या भागात मोठ्या प्रमाणात सैन्याची तैनाती आहे. त्यामुळे भारतीय सैनिक त्वरित घटनास्थळी पोचले आणि त्यांनी अनेकांना ढिगार्याखालून काढले. ‘सासे’ ही एक संस्था आहे. बर्फ पडणार्या भागात हिमकडा किंवा दरड कोसळण्याची शक्यता असल्यास ही संस्था परिसरातील नागरिकांना सतर्क करते. पूर्वी असे काही घडण्यापूर्वी चेतावणी दिली जायची. या वेळी जेव्हा ही घटना घडली, तेव्हा ‘सासे’कडून कुठलीही चेतावणी देण्यात आली नव्हती. या वेळी कोणताही पाऊस पडत नव्हता किंवा बर्फही पडत नव्हता. त्यामुळे ही चेतावणी कदाचित् दिली नसेल. अशा परिस्थितीत ही नैसर्गिक आपत्ती होती कि घडवला गेलेला घातपात होता ? याचे संशोधन करण्यासाठी या भागात ‘डि.आर्.डि.ओ.’च्या (संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या) संशोधकांना तातडीने हेलिकॉप्टरने पाठवले गेले. सध्या ते या घटनेमागील कारण शोधण्यात गुंतले आहेत.
२. हा नैसर्गिक अपघात कि चीनने घडवलेला घातपात होता ?
शास्त्रज्ञांच्या मते, ‘फेब्रुवारीमध्ये अशा प्रकारे हिमकडा किंवा दरड कोसळणे जवळजवळ अशक्य आहे. हिमकडा कोसळण्यासाठी लागणारी भौगोलिक आणि नैसर्गिक कारणे प्राथमिक पहाणीत दिसून येत नाहीत.’ हिमकडा कोसळण्यासाठी अचानक ऊन पडून तापमान वाढावे लागते. सध्या तेथे असलेले तापमान हे -२० (उणे) डिग्री सेंटीग्रेड एवढे आहे. तेथे नवीन बर्फही पडलेला नव्हता. अशा अवस्थेत हिमकडा कोसळणे जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे हा घातपात होता का ? अशी शंका उत्पन्न होते. अशा प्रकारचे घातपात लांब राहूनही केले जाऊ शकतात. चीनने त्यांचे सैनिक किंवा हस्तक यांच्या मार्फत त्या ठिकाणी स्फोट केला होता का ? हेही पहावे लागेल. त्या भागात गढवाल रेजिमेंटचे आणि इतर अनेक सैनिक रहातात. तेथील काही निवृत्त सैनिकांनी स्फोट झाल्याचा आवाज ऐकला. ‘हा स्फोट होण्याचा आवाज नैसर्गिक नव्हता’, अशा प्रकारचे मत माजी सैनिकांनी सामाजिक माध्यमांवर व्यक्त केले होते. त्यामुळे हा स्फोट केला गेला असावा, असे वाटते. अर्थात् या घटनेची संपूर्ण चौकशी चालू आहे. एवढे नक्की की, अशा प्रकारचे घातपात चीनने यापूर्वी केलेले आहेत.
३. तिबेटमधील सरोवराचा बांध फुटून हिमाचल प्रदेशमध्ये पूरस्थिती निर्माण होणे
हिमाचल प्रदेशच्या वरच्या बाजूने असलेल्या तिबेटमधून अनेक नद्या उगम पावतात. वर्ष २००५ मध्ये तिबेटमधील पारछू सरोवरामध्ये बाहेरून येणार्या प्रवाहाचा वेग अचानक वाढला. सरोवराचे आकारमान ३४ हेक्टरवरून थेट १०० हेक्टरपर्यंत वाढले. पाण्याचा विसर्ग न झाल्याने सरोवरातील पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे अचानक सरोवराचा बांध फुटला आणि हिमाचल प्रदेशमध्ये हाहाःकार माजला. या प्रकरणाच्या संदर्भात चर्चेसाठी गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाला सरोवराविषयीची सर्व माहिती यापुढे दिली जाईल, असे आश्वासन चीनने दिले होते; परंतु त्यांनी त्याचे पालन केले नाही. तिबेटमध्ये वहाणार्या पारछू नदीमध्ये वर्ष २००४ मध्ये झालेल्या भूस्खलनामुळे हे सरोवर निर्माण झाले होते.
४. वर्ष २००३ मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या ढगफुटीमागे चीनचा हात असण्याची शक्यता ?
वर्ष २००३ मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या नैसर्गिक प्रकोपानंतर सर्वत्र हाहाःकार उडाला होता. ढगफुटी झाल्याने साहाय्य करण्यात व्यत्यय आले. आभाळ सतत भरून आल्याने ढगांमुळे आसपासचा प्रदेश दिसेनासा झाला. पावसामुळे नद्या भरून वहायला लागल्या, रस्ते खचले, पूल वाहून गेले आणि सहस्रो लोक मृत्यूमुखी पडले होते. कोसळलेल्या दरडींखाली आणि मातीच्या ढिगार्यांखाली अडकलेल्यांची सुटका करावी लागली होती. हा प्रकोप चीनमुळे तर नव्हता ना झाला ? एका वृत्तपत्राने ‘चीनने ‘क्लाऊड सिडिंग’ (कृत्रिम पाऊस पाडणे) केल्याने हे झाले असावे’, अशी शंका व्यक्त केली होती. भारतात अशा दृष्टीकोनातून फारशी चौकशी केली गेली नाही. चीन नेहमी तिबेट किंवा सीमावर्ती भागामध्ये असे प्रयोग करत असतो. या प्रयोगांमुळे अचानक पूर आलाच, तर भारताची हानी होईल, हा त्यामागील हेतू असतो.
५. चीनमधील ब्रह्मपुत्रा नदीवरील धरणांचे पाणी अचानक सोडले, तर काय होईल, याची ही चाचपणी, तर नाही ?
ब्रह्मपुत्रेचा उगम हा चीनमधून होतो. तेथे तिला ‘यारलंग त्सांगपो’ म्हणतात. ती ८०० ते ९०० किलोमीटरचा प्रवास करून आणि एका पर्वताला वेढा देऊन भारतात प्रवेश करते. अरुणाचल प्रदेशमध्ये या नदीला ‘सियांग नदी’ म्हणतात. जेव्हा ती आसामच्या सपाट भागात वाहते, तेव्हा तिला ब्रह्मपुत्रा असे म्हणतात. अनेक वर्षांपासून बातम्या येत आहेत की, चीन या नदीवर धरण बांधत आहे. ब्रह्मपुत्रेच्या वळणाजवळ जर मोठे धरण बांधले, तर ती ईशान्य भारताच्या डोक्यावर टांगती तलवार ठरेल. बेभरवशाचा चीन भारतावर कुरघोडी करण्यासाठी धरणाचे पाणी अचानक सोडण्याची आगळीक करणारच नाही, याची शाश्वती देता येत नाही. तसे झाले, तर येणार्या पाण्याच्या लोढ्यामुळे अरुणाचल प्रदेश आणि आसाम यांच्या बहुतांश भागांना मोठा धोका होण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली आहे. यापूर्वी चीनने सियांग नदीचे पाणी २ दिवस अडवून ठेवण्याची घटना घडली आहे. त्यामुळे चीनवर टेहळणी वाढण्याची आवश्यकता आहे.
६. भारतीय सैन्य वापरत असलेला एकमेव पूल वाहून जाणे आणि सैन्याने त्याचे त्वरित पुनर्निर्माण करणे
हा हिमकडा कोसळण्यासाठी चीनने क्षेपणास्त्रांचा मारा केला असू शकतो. अशा प्रकारची माहिती सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध होत आहे. या घटनेत सीमावर्ती भागात जाणार्या रस्त्यावरचा एकमेव पूल वाहून गेला. भारतीय सैन्य सीमेवर जाण्यासाठी या पुलाचा वापर करत असे. सीमावर्ती भागात चीनच्या अतिक्रमणाला प्रत्युत्तर देणार्या भारतीय सैन्याच्या हालचालींना थोडा वेळ थांबवणे, हाही चीनचा एक उद्देश असू शकतो. अर्थात् भारतीय सैन्याच्या अभियंत्यांनी या पुलाचे त्वरित पुनर्निर्माण केले आहे. त्यामुळे चीनने जरी काही लष्करी कारवाई केली, तरी त्यासाठी भारतीय सैन्य सिद्ध आहे.
७. हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे पर्यावरणवाद्यांना सीमाभागातील विकासकामांमध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी आयते कोलीत मिळण्याची शक्यता असणे
हिमकडा कोसळून झालेला अपघात चीनने घडवला असावा, असे वाटते. चीन असे का करत आहे ? यामुळे पर्यावरणवाद्यांना जोर मिळेल आणि ते आरडाओरडा चालू करतील. या भागात जी धरणे आणि अन्य विकासांची कामे केली जात आहेत, ती थांबवली जातील. त्यामुळे या घटनेचे पद्धतशीरपणे अन्वेषण केले जावे. चीनने भारताच्या विरुद्ध पर्यावरण युद्ध चालू केले असेल, तर आपणही त्याला लगेचच प्रत्युत्तर देण्यासाठी सिद्ध रहाणे आवश्यक आहे.
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.