गोरक्षकांवरील तडीपार आदेश रहित करा !
|
हे प्रशासनाला का सांगावे लागते ? स्वतःहून अशा प्रकरणांमध्ये लक्ष घालून कृती का केली जात नाही ?
सोलापूर, १२ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील गोरक्षक सुधाकर बहिरवाडे हे महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या पशूसंवर्धन विभाग सोलापूर येथे प्राणी क्लेश प्रतिबंध सोसायटीचे अशासकीय सदस्य आहेत. त्यांनी मागील ६ वर्षे गोरक्षणाचे कार्य केले आहे. त्यांचे कार्य उल्लेखनीय असूनही त्यांच्यावर तडीपारीची कारवाई केल्याच्या निषेधार्थ, तसेच तडीपार करून त्यांची नाहक अपकिर्ती करण्यात आली त्याच्याविरोधात समस्त हिंदुुत्वनिष्ठ संघटनांकडून पूनम गेट, जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी शहरातील अवैधरित्या चालू असणारे पशूवधगृह आणि मांस विक्रीची दुकाने यांवर तात्काळ कारवाई करून ते बंद करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.
१. गोरक्षक सुधाकर बहिरवाडे यांनी कसायांच्या २०० हून अधिक गाड्या पकडून सहस्रो गायींचे प्राण वाचवले आहेत, तसेच अनधिकृतपणे गोवंशियांची वाहतूक करणार्या कसायांवर कायदेशीर कारवाई केली आहे. ‘गोवंश हत्या बंदी कायदा प्रत्यक्षात अमलात आणावा, तसेच गोरक्षक सुधाकर बहिरवाडे यांच्यावरील तडीपारीची कारवाई तात्काळ रहित करण्यात यावी’, अशी मागणीही समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि गोरक्षक यांनी या वेळी केली.
२. या वेळी सोलापूरचे प्रसिद्ध उद्योजक केतन शहा, मानद पशूकल्याण अधिकारी महेश भंडारी, परिवहन सभापती जय साळुंखे, अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे शहराध्यक्ष विजय यादव, गोसेवा संघाचे उपाध्यक्ष प्रतिक्षित परदेशी, हिंदु राष्ट्र सेनेचे शहराध्यक्ष समर्थ मोटे, नगरसेवक राजकुमार हंचाटे, बजरंग दल गोसेवा जिल्हाध्यक्ष सिद्राम चरकुपल्ली, तसेच अंबादास गोरंटला, आनंद मुसळे, सतीश सिरसिल्ला, सिद्धेश्वर पाटील, शितल परदेशी, रवि गोणे यांसह अनेक धर्मप्रेमी उपस्थित होते.