देवावरील श्रद्धेच्या बळावर परिस्थितीशी जुळवून घेणार्‍या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शोभा हेम्बाडे !

‘४.६.२०२० या दिवशी माझ्या आईची (सौ. शोभा हेम्बाडे यांची) ६२ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे मला समजले. तेव्हा माझी भावजागृती होऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. ‘आईने आतापर्यंत केलेल्या संघर्षातून तिची साधना झाली. तिने केलेल्या कष्टाचे फळ तिला मिळाले आणि तिच्या त्यागामुळेच देवाने तिला जवळ घेतले’, असे विचार माझ्या मनात आले.

सौ. शोभा हेम्बाडे

१. कठीण प्रसंगात मुलीला घरी न बोलावता देवाला ‘सर्व सहन करण्याची शक्ती दे’, असे सांगणे आणि परात्पर गुरुदेवांना आत्मनिवेदन करणे

वर्ष २०१७ मध्ये घरात कठीण प्रसंग घडल्यावर आईला पुष्कळ शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास होत होता. तेव्हा ती तिच्या मनातील विचार मला किंवा ताईला सांगत असे; पण तिने कधीही आम्हाला घरी बोलावले नाही. ‘गुरुपौर्णिमेच्या कालावधीत सेवा अधिक असल्याने आम्ही सेवा सोडून यावे’, असे तिला वाटत नव्हते. नातेवाईक आईला म्हणत होते, ‘‘पल्लवीला बोलावून घ्या.’’ तेव्हा तिला ‘यातून देवच बाहेर काढू शकतो. पल्लवी घरी आली, तर तीसुद्धा अडकेल. आश्रमात राहून तिची साधना तरी होईल. माझ्या प्रारब्धात जे असेल, ते होणारच आहे’, असे वाटायचे. त्या वेळी ती देवाला ‘सर्व सहन करण्याची शक्ती दे’, एवढेच सांगत असे. मी दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करते. ‘सायंकाळी दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित तातडीची सेवा चालू असते’, हे तिला ठाऊक आहे. त्यामुळे तिला माझ्याशी कितीही बोलावेसे वाटले, तरी त्या वेळी ती कधीही मला भ्रमणभाष करत नाही. तेव्हा ती परात्पर गुरुदेवांना आत्मनिवेदन करते.

२. रुग्णाईत असतांना ‘बरे वाटत नाही, तर मुलींना बोलावून घेऊया’, असा विचार करण्याऐवजी आश्रमात तातडीच्या सेवा चालू असल्याने मुलींना सेवेलाच प्राधान्य द्यायला सांगणे

जुलै २०१८ मध्ये आई रुग्णाईत असतांना मला तिची पुष्कळ काळजी वाटत होती. तेव्हा माझी द्विधा मनःस्थिती झाली होती. ‘आईच्या साहाय्यासाठी घरी जाऊया’, असे मला वाटत होते; पण देवद आश्रमात ‘सनातन प्रभात’चे विशेषांक, विशेष स्मरणिका यांसाठीच्या सेवा चालू होत्या. तेव्हा आईने मला सेवेलाच प्राधान्य द्यायला सांगितले. ‘बरे वाटत नाही, तर मुलींना बोलावून घ्या’, असे तिला नातेवाईक म्हणत होते; पण तिने कधीच तसा विचार केला नाही.

कु. पल्लवी हेम्बाडे

३. वस्तू खरेदी करतांना ‘ती आवश्यक आहे का ?’, याची प्रेमाने जाणीव करून देणे आणि स्वतःच्या कृतीतून परिस्थितीची जाणीव ठेवून वागायला शिकवणे

आई आवश्यक असल्यासच वस्तू खरेदी करते. आम्ही काही मागितले किंवा नवीन वस्तू आणण्याविषयी विचारले, तर ती कधी ‘नाही’ म्हणत नाही; पण ‘ती वस्तू आवश्यक आहे का ?’, याची प्रेमाने जाणीवही करून देते. पूर्वी आमचे एकत्र कुटुंब होते. प्रज्ञालाही (बहिणीला) प्रत्येक मासात (महिन्यात) रुग्णालयात भरती करावे लागत होते. त्यामुळे मासाच्या शेवटी आर्थिक अडचण येत असे. तेव्हा आईने नेहमी तिच्या कृतीतून आम्हाला घरातील परिस्थितीची जाणीव ठेवून वागायला शिकवले; पण ‘आम्ही कधी कोणती गोष्ट मागितली आणि ती दिली नाही’, असे कधी झाले नाही.

४. निःस्वार्थीपणाने वागून इतरांना साहाय्य करणे

तिच्या मनात स्वार्थाची भावना नाही. ती सर्वांवर सारखेच प्रेम करते. तिला कशाचीच आसक्ती नाही. ती स्वतःच्या वस्तू इतरांना सहजतेने देते. तिला त्यातून आनंद मिळतो. पूर्वी कुणी तिच्याशी वाईट जरी वागले असेल, तरी ती त्या व्यक्तीला साहाय्य हवे असल्यास कधी ‘नाही’ म्हणत नाही. त्या वेळी ती तिला होणार्‍या शारीरिक त्रासावरही मात करते.

५. प्रत्येक प्रसंगात काही चांगले झाले, तर ‘देवाच्या कृपेने झाले’ आणि काही वाईट घडले, तर ‘प्रारब्धात असेल त्याप्रमाणे होणारच आहे’, अशी तिची श्रद्धा असणे

आईमध्ये या ३ वर्षांत पुष्कळ पालट झाला आहे. ‘प्रत्येक प्रसंगात काही चांगले झाले, तर ‘देवाच्या कृपेने झाले आणि काही वाईट घडले, तर प्रारब्धात जे आहे’ ते होणारच आहे’, असे ती म्हणते. पूर्वी ती काही प्रसंग घडला किंवा त्रास झाला की, लगेच भ्रमणभाष करून मला कळवत असे. तिला त्याविषयी बोलल्याविना बरे वाटत नसे; पण या वर्षभरात तिला पुष्कळ त्रास झाला, तरच ती कळवत होती. ती स्वतःच स्वतःला दृष्टीकोन देऊन प्रसंगांवर मात करायची. ती आम्हालाही साधेनविषयीच सांगते. ती आम्हाला ‘आश्रमात रहाण्याची संधी मिळाली’, याची जाणीव करून देते. ‘बाहेरची परिस्थिती किती भयावह आहे ? देवाने आपल्याला त्याच्या जवळ ठेवले आहे’, याविषयी ती सांगते.

६. कधी त्रास होत असेल किंवा एखाद्या प्रसंगात संघर्ष होत असेल, तर आईशी भ्रमणभाषवर बोलल्यानंतर प्रोत्साहन मिळून अनावश्यक विचार अल्प होऊन तिचा आधार वाटणे

या वर्षभरात मला कधी त्रास होत असेल किंवा एखाद्या प्रसंगात संघर्ष होत असेल, तर त्याच दिवशी आईचा भ्रमणभाष येतो. तिला माझ्या आवाजातून ‘मी बरी नाही’, असे तिच्या लक्षात येते. त्यानुसार ती माझ्याशी बोलते. आईशी बोलल्यानंतर मला प्रोत्साहन मिळते. माझ्या मनातील विचार न्यून होतात. मला आईचा आधार वाटतो.

७. ‘आई स्थिर राहून देवाच्या अनुसंधानात आहे’, असे जाणवणे

डिसेंबर २०१९ मध्ये मी घरी गेले होते. तेव्हा मला आईमध्ये पूर्वीपेक्षा पुष्कळ पालट जाणवत होते. पूर्वीच्या तुलनेत आता ती परिस्थिती लवकर स्वीकारते. तिचा अपेक्षा करण्याचा भागही अल्प झाला आहे. ‘आईचे देवाशी अनुसंधान आहे’, असे मला जाणवले. प्रज्ञाने (बहिणीने) कितीही त्रास दिला, तरी ती शांतपणे तिला सांगते. पूर्वीच्या तुलनेत तिच्याकडे पाहिल्यावर आता पुष्कळ स्थिरता जाणवते. तिला नातेवाइकांकडून पूर्वी अपेक्षा असायच्या; पण ती कधी बोलत नसे. या वेळी तसे जाणवले नाही.

८. आईचे साधनेविषयीचे दृष्टीकोन ऐकल्यावर ‘तिची आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाली असेल’, असे वाटणे

३१.५.२०२० या दिवशी सकाळी ‘आईशी एका प्रसंगाविषयी बोलतांना तिचे साधनेविषयीचे दृष्टीकोन किती स्पष्ट आहेत’, असे मला जाणवले. तेव्हा ती म्हणाली, ‘‘आपण आपल्या साधनेकडे लक्ष द्यायचे. संतांनी सांगितलेले प्रयत्न प्रामाणिकपणे करायचे. आपण इतरांकडून अपेक्षा केली, तर आपल्यालाच त्रास होतो.’’ आई हे बोलत असतांना मला आतून पुष्कळ आनंद होत होता. तेव्हा ‘आईची आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाली असेल. लवकरच तिची पातळी घोषित करतील’, असा विचार माझ्या मनात आला.

९. भाव

पूर्वी तिला आमची (प्रज्ञाची, माझी आणि माझ्या भावाची) पुष्कळ काळजी वाटत होती; पण आता तिचे काळजी करणे उणावले आहे’, असे मला जाणवते. ‘सर्व काही देवाच्या इच्छेने होईल’, असे ती म्हणते.’

– कु. पल्लवी हेम्बाडे (मुलगी), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.६.२०२०)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक