जिथे आपत्ती तिथे व्हाईट आर्मी ! – अशोक रोकडे, व्हाईट आर्मी, संस्थापक
कोल्हापूर – आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत इमारत दुर्घटना, पूर, आग लागणे, रस्ते अपघात, तसेच अन्य सर्व प्रकारचे प्रशिक्षण व्हाईट आर्मीच्या सैनिकांनी घेतले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरात व्हाईट आर्मीच्या सैनिकांनी मोठे काम केले. कोरोनाच्या संकटात रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे, विनामूल्य भोजन यांसह प्रत्येक आपत्तीत व्हाईट आर्मीचे सैनिक साहाय्य करत आहेत. व्हाईट आर्मीने कोरोनाच्या काळात सलग १५० दिवस विनामूल्य अन्नछत्र सेवा दिली. याद्वारे ५ लाख ५० सहस्रांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना हे साहाय्य देण्यात आले. जिथे आपत्ती तिथे व्हाईट आर्मी म्हणजेच जीवन मुक्ती सेवा संस्था कोल्हापूर पाय रोवून ठामपणे उभी आहे, असे प्रतिपादन व्हाईट आर्मीचे संस्थापक श्री. अशोक रोकडे यांनी केले.
कोरोनाच्या काळात केलेल्या अतुलनीय कार्याविषयी हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी श्री. रोकडे यांची सदिच्छा भेट घेतली. त्या वेळी हे मत त्यांनी व्यक्त केले. या वेळी श्री. रोकडे यांना सनातन पंचांग २०२१ भेट देण्यात आले. हिंदु जनजागृती करत असलेल्या कार्याविषयी समाधान व्यक्त करून समितीही राष्ट्रजागृतीचे मोठे कार्य करत आहे, असे श्री. रोकडे म्हणाले.