वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणार्‍या आधुनिक वैद्यांसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग चालू करण्याची आवश्यकता !

डॉ. अंजेश कणगलेकर

१. ‘भगवंताने मनुष्याला जन्माला घातल्यावर त्याच्या प्रत्येक क्षणाची काळजी भगवंतच घेत असणे’, या संदर्भातील कथा !

‘भगवंताने मनुष्याला जन्माला घातल्यावर त्याच्या प्रत्येक क्षणाची काळजी त्याने आधीच घेतलेली असते. एक गोष्ट आपण ऐकली असेल, ‘गुरु त्यांच्या शिष्याला सांगतात, ‘तुला बाळ झाल्यावर तू माझ्याकडे ये. बाळ जन्माला येताच शिष्याला आनंद होतो आणि तो गुरुंकडे जायला निघतो. तेवढ्यात बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. शिष्य जाऊन पहातो, तर बाळाच्या आईचा मृत्यू झालेला असतो. त्याच्या मनात संघर्ष निर्माण होतो की, ‘गुरूंचे आज्ञापालन करावे कि बाळाला सांभाळावे.’ तेव्हाच समोरच्या झाडावर असलेल्या घरट्यातून पक्ष्याचे बाळ खाली पडते. शिष्य पळत जाऊन पहातो, तर काय ! पिलू गवताच्या गंजीवर पडल्याने सुरक्षित असते. तेव्हा शिष्याच्या लक्षात येते, ‘त्या पिलाला जर देव सांभाळू शकतो, तर या बाळाला पण देव सांभाळणार नाही का ? त्याचा संघर्ष नाहीसा होतो आणि तो गुरूंकडे जातो.’

२. भगवंताची सृष्टीचे रक्षण करण्याची अफाट क्षमता आणि भगवंताकडे असलेल्या अनेक क्षमतांपैकी एक क्षमता म्हणजे रोग निवारण करणे अन् म्हणूनच रोगांचे निवारण करणारे वैद्य यांना ‘नारायण’ असे संबोधणे

यातून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यातील एक म्हणजे भगवंताची सृष्टीचे रक्षण करण्याची अफाट क्षमता ! सृष्टीचा पालनहार, म्हणजेच महाविष्णु. प्रत्येक जिवाला या (भवरोग) भवसागरात सांभाळणारा तो महाविष्णु. भगवंताकडे असलेल्या अनेक क्षमतांपैकी एक आहे, ‘रोग निवारण करणे’ आणि म्हणूनच रोगांचे निवारण करणारे वैद्य यांना ‘नारायण’ असे संबोधतात.

३. ‘रोगाचे निदान करून त्यावर उपचार करणे’, ही वैद्याची क्षमता लोप पावत असल्याचे निदर्शनास येणे

रोग शारीरिक असो, मानसिक वा आध्यात्मिक असो. ‘रोगाचे निदान करून त्यावर उपचार करणे’, ही वैद्याची क्षमता असते. त्याचे कारण, म्हणजे त्यांच्यातील आध्यात्मिक आणि दैवी सामर्थ्य. आज वैद्यांची ही क्षमता कुठेतरी लोप पावत चालली आहे.

४. धर्माचरण आणि साधनेचे बळ नसल्याने वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणार्‍या आधुनिक वैद्यांसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग चालू करण्यात येणे

वैद्यांकडे ही आध्यात्मिक क्षमता नाही; कारण ते धर्माचरण करत नाहीत आणि त्यांना साधनेचे बळ नाही. त्यामुळे ‘या क्षेत्रात असणार्‍यांना त्यांच्यातील सुप्त क्षमतेची जाणीव करून द्यावी’, या उद्देशाने वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणार्‍या आधुनिक वैद्यांसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग चालू करण्यात आले. ‘या सेवेत पूज्य संतांकडून कसे शिकायला मिळते आणि ते कशी दिशा देतात ?’, याविषयी काही सूत्रे दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये प्रसिद्ध झाली होती. ते वाचून प.पू. दास महाराजांना सुचलेली सूत्रे वर दिली आहेत.

५. प.पू. दास महाराज यांच्यातील शिकण्याची वृत्ती, गुरुनिष्ठा, वात्सल्यभाव, कृतज्ञताभाव आणि समर्पणभाव

‘प.पू. बाबांच्या या सूत्रातून काय शिकायला मिळाले ?’, हा विचार करत असतांनाच मला वर लिहिलेली शिष्याची गोष्ट आठवली. ही सूत्रे टंकलेखन करून झाली आणि २ दिवसांनी भावसत्संग झाला. काय आश्‍चर्य ! त्यात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी हीच गोष्ट सांगितली. मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. या सूत्रांचे टंकलेखन करण्याची सेवा गुरुमाऊली आणि प.पू. बाबा यांच्या कृपेने शक्य झाली. मला प.पू. दास महाराज यांच्यातील ‘शिकण्याची वृत्ती, गुरुनिष्ठा, वात्सल्यभाव, कृतज्ञताभाव आणि समर्पणभाव’, या गुणांचे दर्शन घडले.

‘त्यांच्यातील हे गुण आम्हा सर्व साधकांना आचरणात आणता येण्यासाठी गुरुमाऊलीनेच आम्हाला शक्ती, बुद्धी आणि सामर्थ्य प्रदान करावे’, ही श्रीगुरुचरणी प्रार्थना !’

– वैद्य अंजेश कणगलेकर (९.२.२०२१)