नामजप, भावप्रयोग आणि सेवा करतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

देवाच्या विचारांचा वेग अनुभवणे अन् देवाला पूर्ण शरण जाऊन त्याच्याप्रती कृतज्ञता म्हणून पुढील नामजप किंवा सेवा केली जाणे

‘अनेक साधकांना नामजप करतांना अनेक प्रकारच्या अनुभूती येतात. येथे दिलेल्या कु. राजश्री सखदेव यांच्या अनुभूती कल्पनेच्या पलीकडच्या आहेत. त्यांच्यातून अनेक साधकांना बरंच काही शिकता येईल. या अनुभूतींबद्दल कु. राजश्री सखदेव यांचे कौतुक करावे तेवढे थोडे !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

कु. राजश्री सखदेव

१. मनातल्या मनात एकदा नामजप म्हणून पूर्ण होईपर्यंत अंतर्मनाने अनेक वेळा तो नामजप केल्याचे जाणवणे

‘ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ ।’ हा नामजप मनातल्या मनात करत असतांना एकदा नामजप म्हणून पूर्ण होईपर्यंत माझे अंतर्मन अनेक वेळा हा नामजप म्हणत आहे’, असे मला जाणवते. कधीकधी माझा आपोआप ‘श्रीराम’ हा नामजप चालू होतो. हा नामजप लहान असूनही तो करतांना एकदा ‘श्रीराम’ असे म्हणेपर्यंत अनेकदा तो जप आतून म्हणून पूर्ण झालेला असतो.

(राजश्री : ‘अंतर्मनाने नामजप केला’, असे वाटले, ते योग्य आहे ना ?

उत्तर : हो.)

२. भावप्रयोग करतांना प्रयोगाच्या आरंभी मनात आलेला विचार, हेच त्या प्रयोगाचे उत्तर असणे

अंतर्मनाने नामजप करणे ही प्रक्रिया केवळ नामजपापुरती मर्यादित नाही. कोणतीही कृती करण्यास आरंभ केला, उदा. भावप्रयोग करतांना प्रयोग अनुभवावा लागत नाही. प्रयोगाच्या आरंभी मनात जो विचार येतो, तो विचार त्या प्रयोगाचे उत्तर असते. त्यामुळे संपूर्ण भावप्रयोग ऐकतांना मी नामजप करत असते. कधी माझे ध्यानही लागते.

(राजश्री : प्राणशक्तीवहन पद्धतीने नामजप शोधतांनाही मनात पहिला विचार येतो, तोच नामजप प्रयोगातून येतो. वाईट शक्तींनी उत्तर चुकवू नये, म्हणून मी नामजप शोधते. हे ठीक आहे ना ?

उत्तर : हो.)

३. ‘आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ध्यानमंदिरापर्यंत नामजपाचे दीप लावत आहे’, हा भावप्रयोग एकदा नामजप म्हणून होण्यापूर्वीच पूर्ण होणे

ध्यानाच्या वेळी एकाग्रता साधण्यासाठी मी विविध भाव ठेवते. कधी ‘आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ध्यानमंदिरापर्यंत मी नामाचे दीप लावत आहे’, असा भाव ठेवते. आश्रमाचे मुख्य प्रवेशद्वार, प्रवेशद्वाराच्या आतील रिकामी जागा, यज्ञकुंड परिसर, स्वागतकक्ष, जिन्याच्या पायर्‍या, मार्गिका, ध्यानमंदिराचे दार, ध्यानमंदिर आणि शेवटी परात्पर गुरु डॉक्टरांच्या पादुका या संपूर्ण मार्गावर केवळ एक नामजप पूणर्र् होण्यापूर्वीच नामजपाचे दीप लावले जातात.

४. देवाच्या वेगाची जाणीव होऊन त्याच्याप्रती कृतज्ञता म्हणून पुढील सेवा किंवा नामजप केला जाणे

पूर्वी एकेक कृती करत असतांना तिच्यातील आनंद अनुभवता येत होता. आता देव एकाच वेळी अनेक कृती दाखवतो. माझ्या मनाच्या वेगापेक्षा देवाचा वेग अफाट आहे. त्यामुळे त्याला पूर्ण शरण जाऊन त्याच्याप्रती कृतज्ञता म्हणून पुढील सेवा किंवा नामजप केला जातो. नामजपाच्या वेळी अन्य व्यवधान (अडथळा) नसल्याने ‘माझ्या मनाची नेमकी प्रक्रिया काय होते’, हे अनुभवता येते. सेवा करतांना ‘मन काय म्हणत असते’, हे कधी कधी मला कळत नाही; परंतु बर्‍याचदा ते नामजप करत असते. म्हणजे हाताने किंवा बुद्धीने सेवा चालू असते आणि मन नामजप करत असते किंवा काही वेळा मनात कोणतेच विचार नसतात. त्यामुळे सलग काही वेळ सेवा केल्यानंतर कधीकधी ‘मी किती वेळ सेवा केली किंवा कोणती सेवा केली’, हे पटकन लक्षात येत नाही. त्या वेळेत मला कोणतीच बाह्य जाणीव नसते.

५. ध्यानाच्या वेळी आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

५ अ. ध्यानाच्या वेळी निवासाच्या खोलीत परात्पर गुरुदेव येणार असल्याचा भाव ठेवणे आणि खोलीची स्वच्छता करतांना सनातनचे सर्व आश्रम, सेवाकेंद्रे अन् साधकांची घरे यांतील खोल्यांची स्वच्छता केवळ एका नामजपात पूर्ण होणे : १६.११.२०१९ या दिवशी सकाळी ९.३० ते १० या वेळेत नामजप करतांना ‘आश्रमात मी रहात असलेल्या खोलीत परात्पर गुरु डॉक्टर येणार आहेत’, असा भाव ठेवला. ‘असा भाव ठेवावा’, हे ध्यानाला बसल्यावर अचानक सुचले. त्यानुसार नामजप करता करता मानसरित्या मी रहात असलेल्या खोलीची स्वच्छता चालू केली. खोलीच्या प्रत्येक कोपर्‍यातून, दोन कपाटांच्या मधल्या जागेतून आणि छतावरून केरसुणी फिरवून तेथील स्वच्छता केली. आज वेगळे हे जाणवले की, केवळ मी रहात असलेल्या खोलीची स्वच्छता झाली, असे नाही, तर रामनाथी आश्रमातील सर्व खोल्यांची स्वच्छता झालेली आहे. त्यानंतर पूर्वी मी ज्या आश्रमांत राहिले आहे, ते मिरज आश्रम आणि देवद आश्रम यांतील सर्व खोल्यांतील स्वच्छता झाली आहे. त्यानंतर सनातन संस्थेचे अन्य आश्रम, सेवाकेंद्रे आणि साधकांची घरे यांची स्वच्छता झाली आहे. हे सर्व केवळ एक नामजप म्हणून पूर्ण होतांना झाले.

५ आ. परात्पर गुरुदेवांनी मनात विराजमान होण्यासाठी मनाची स्वच्छता करण्यास अधिक वेळ लागणे आणि त्यानंतर सर्वत्र फिकट निळा प्रकाश दिसून मन एकाग्र होणे : त्यानंतर मी खोलीच्या बाहेरील बाजूस फुलांच्या पायघड्या घातल्या. जिन्याच्या कठड्याला फुलांच्या माळा बांधल्या. सर्व आश्रम, सेवाकेंद्रे आणि साधकांची घरे यांत असेच झाले. खोलीत ‘परात्पर गुरुदेवांना बसण्यासाठी आरामदायी खुर्ची ठेवावी’, असे वाटले. त्या वेळी लक्षात आले की, त्यांना माझ्या मनात विराजमान व्हायला अधिक आवडेल. त्यामुळे मी ‘मन स्वच्छ आहे का’, ते पाहू लागले. मनाची स्वच्छता होण्यास अधिक काळ लागला. १० ते १५ वेळा नामजप झाल्यानंतर मन निर्मळ होऊ लागले. सर्व आश्रम, सेवाकेंद्रे, साधकांची घरे येथे रहाणार्‍या साधकांची मने निर्मळ झाली. त्यानंतर सर्वत्र फिकट निळसर प्रकाश दिसू लागला. त्यानंतर पूर्ण वेळ माझे मन एकाग्र होऊन नामजप झाला. ध्यानाची वेळ संपल्याचे साधकांनी सांगितल्यावर मी एकाग्रतेने साधलेल्या नामातून बाहेर आले. त्या वेळी मला पुष्कळ आनंद वाटत होता.’

– कु. राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.११.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक