अपार कृपा आणि प्रीती यांचा वर्षाव करणार्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी सत्संगात साधिकेने अनुभवलेले भावक्षण !
साधकांवर कृपेचा वर्षाव करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
१. वर्ष १९९२
१ अ. एप्रिल १९९२ – मराठी भाषेचे विशेष ज्ञान नसूनही मराठीतील लिखाणाचे इंग्रजीत भाषांतर करता येणे आणि ‘हे भाषांतर प्रत्यक्ष गुरुदेवच करत असून आपण केवळ माध्यम आहोत’, याची जाणीव होणे : ‘एप्रिल १९९२ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मी प्रथम भेटले. त्या वेळी त्यांनी मला सनातनच्या वतीने प्रकाशित केल्या जाणार्या मराठी भाषेतील लिखाणाचे इंग्रजीत भाषांतर करण्याची सेवा दिली. मी सेवेला आरंभ केल्यावर त्यांनी मला ‘यापुढे संस्थेच्या सर्व मराठी लिखाणाचे इंग्रजी भाषांतर तुम्हीच कराल’, असे सांगून सेवेच्या माध्यमातून माझ्यावर कृपेचा वर्षाव केला. माझे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे. मी शाळेत असतांना केवळ ३ वर्षे मराठी भाषा द्वितीय भाषा म्हणून शिकले होते. असे असूनही परात्पर गुरु डॉक्टरांनी मराठीत संकलित केलेले ग्रंथ मला इंग्रजीत भाषांतरित करता आले. मला मी केलेले भाषांतर वाचून आश्चर्य वाटत असे आणि माझ्या मनात ‘हे मला कसे काय जमले ?’, असा विचार येई आणि ‘हे भाषांतर प्रत्यक्ष गुरुदेवच करत असून मी केवळ माध्यम आहे’, याची मला जाणीव होत असे. काही दिवसांनी मी गुरुदेवांना याविषयी सांगितले. त्यावर ते म्हणाले, ‘‘तुमचा दृष्टीकोन योग्य आहे. तुम्ही साधनेत योग्य दिशेने जात आहात.’’
१ आ. जुलै १९९२ – मुंबईला गुरुपौर्णिमा महोत्सवाला गेल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रेमाने बोलणे आणि मुंबईत प्रवास करतांना ‘विविध माध्यमांतून तेच काळजी घेत आहेत’, असे जाणवणे : जुलै १९९२ मध्ये मी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाला गेले होते. त्या वेळी मी साधनेत नवीन असूनही परात्पर गुरु डॉक्टर माझ्याशी पुष्कळ प्रेमाने बोलले. माझ्यासाठी ‘या महोत्सवाला उपस्थित रहाणे’ हा एक सुंदर अनुभव होता. तेथे सर्व साधक एका मोठ्या परिवारातील सदस्य असल्याप्रमाणे संघटितपणे सेवा करत होते. मुंबईत प्रवास करत असतांना ‘प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर विविध माध्यमांतून परात्पर गुरु डॉक्टरच माझी काळजी घेत आहेत’, असे मला जाणवत होते.
१ इ. नोव्हेंबर १९९२ – परात्पर गुरु डॉक्टरांनी पूर्वजांच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी साधिकेला नामजपादी उपाय करायला सांगणे
१ इ १. ‘चष्म्याच्या भिंगाला एक छोटेसे छिद्र पडले आहे’, असे लक्षात येणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांना तो चष्मा दाखवल्यावर त्यांनी ते वाईट शक्तींचे आक्रमण असल्याचे सांगून दत्ताचा नामजप करण्यास सांगणे आणि नामजप केल्यानंतर त्रास उणावणे : एकदा मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी फोंडा (गोवा) येथे घेतलेल्या एका व्याख्यानाला (अभ्यासवर्गाला) उपस्थित होते. व्याख्यानानंतर रात्री मी डोळ्यांतील ‘कॉन्टॅक्ट लेन्स’ काढून ठेवून चष्मा घालण्यासाठी माझी पिशवी उघडली. चष्मा घातल्यावर मला केवळ एकाच डोळ्याने दिसत होते. चष्म्याचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर ‘चष्माच्या भिंगाच्या मध्यावर, म्हणजे चष्मा लावल्यावर डोळ्याच्या बुबुळाच्या बरोबर समोर एक छोटेसे छिद्र पडले आहे’, असे माझ्या लक्षात आले. ‘हे छिद्र कुणीतरी जाणीवपूर्वक पाडले असावे’, असे वाटत होते, तसेच पिशवीत इतरत्र चष्म्याच्या काचेचे तुकडे आढळले नाहीत. मी हा चष्मा परात्पर गुरु डॉक्टरांना दाखवला. तो पाहून त्यांनी हे वाईट शक्तींचे आक्रमण असल्याचे सांगितले. त्या वेळी आमच्या घरात श्राद्धविधी करत नसत. त्यामुळे अतृप्त पूर्वजांनी माझे लक्ष वेधून घेण्यासाठी हे कृत्य केले होते. गुरुदेवांनी मला प्रतिदिन ६ माळा ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।’ हा नामजप ९ मास करायला सांगितला. मी हा नामजप करायला आरंभ केल्यावर माझा कुलदेवतेचा नामजपही भावपूर्ण होऊ लागला आणि मला होणारा त्रास उणावला.
१ इ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे नारायण नागबळी हा विधी करणे, सर्व विधी सहजपणे पार पडणे आणि कित्येक वर्षे गर्भधारणा न झालेल्या जावेला या विधीनंतर दिवस रहाणे : परात्पर गुरु डॉक्टरांच्या सांगण्यावरून आम्ही गोकर्ण येथे नारायण नागबळी हा विधी केला. या विधीच्या वेळी १ घंटा याग चालू होता. त्यात पुष्कळ समिधा अर्पण करण्यात येत होत्या, तरीही माझ्या डोळ्यांची आग झाली नाही. माझ्या जाऊबाईंना कित्येक वर्षे गर्भधारणा होत नव्हती; मात्र या विधीनंतर त्यांना दिवस गेले. (‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार डॉ. रूपाली भाटकार यांच्या ईश्वराप्रतीच्या भावामुळे त्यांना ही अनुभूती आली. प्रत्येकालाच ती येईल, असे नाही. – संकलक)
२. वर्ष १९९२ ते १९९४
२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अध्यात्मातील लहान लहान सूत्रे समजावून सांगणे : अध्यात्मप्रसारासाठी परात्पर गुरु डॉक्टर पुष्कळदा कोकणात येत असत. मी पुष्कळ भाग्यवान आहे की, मला या दौर्यात सहभागी होता आले. प्रवासात ते आम्हाला अध्यात्मातील लहान लहान सूत्रे समजावून सांगत.
२ आ. साधकांच्या मनातील विचार जाणून त्यांची इच्छा पूर्ण करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले ! : एकदा मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या कारवार (कर्नाटक) येथील दौर्यात इतर काही साधकांच्या समवेत सहभागी झाले होते. तेथे आम्ही ज्या साधकांच्या घरी उतरलो होतो, त्यांच्यावर पुष्कळ कर्ज (ऋण) होते. त्या वेळी सहजपणे गुरुदेव म्हणाले, ‘‘तुमचे सर्व कर्ज लवकरच फिटेल.’’ या प्रसंगात मी त्या साधकाच्या शेजारीच उभी होते आणि माझ्याही मनात माझ्यावर असलेल्या कर्जाविषयी चिंतेचे विचार होते. सहजपणे ते पुढे म्हणाले, ‘‘इतरांची कर्जेही लवकरच फिटतील.’’ त्यांनी म्हटल्याप्रमाणे लवकरच माझेही सर्व कर्ज फिटले.
३. वर्ष १९९३
३ अ. वर्ष १९९३ – साधिकेने अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सर्वज्ञता ! : एप्रिल १९९३ मध्ये मी कांदळी आश्रमात रामनवमी उत्सवाला गेले होते. उत्सवाच्या दुसर्या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांनी गोव्याच्या सर्व साधकांना नारायणगाव येथील महान संत प.पू. मौनीबाबा यांच्या दर्शनाला पाठवले. प.पू. मौनीबाबांनी संपूर्ण जीवनभर मौन पाळून साधना केली होती. ‘ते मौनात असूनही सर्वत्र आनंदाचे प्रक्षेपण करत आहेत’, असे आम्हाला जाणवत होते. त्यांचे दर्शन घेतांना माझ्या मनात ‘प.पू. मौनीबाबा लहान बालकाप्रमाणे गुबगुबीत आहेत. त्यांचा गालगुच्चा घ्यावासा वाटतो’, असे विचार आले. या प्रसंगानंतर पुष्कळ मासांनी मी एका अभ्यासवर्गानंतर परात्पर गुरु डॉक्टरांच्या समवेत गोव्याला चालले होते. या प्रवासात प.पू. मौनीबाबांच्या दर्शनाच्या वेळी माझ्या मनात आलेले विचार त्यांनी बोलून दाखवले.
३ आ. मे १९९३ – नोकरी करत असतांना एरव्ही सुटी न मिळणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कार्यशाळेसाठी सांगलीला जायला सांगितल्यावर सुटी मिळणे : वर्ष १९९३ मध्ये मी एका खाजगी रुग्णालयात नोकरी करत होते. तेथे आम्हाला बाहेर जायचे असल्यास सुटी मिळत नसे. एकदा परात्पर गुरु डॉक्टरांनी मला एका कार्यशाळेसाठी सांगली येथे जायला सांगितले होते. सांगलीला जाण्याची अनुमती घेण्यासाठी मी रुग्णालयाच्या संचालकांकडे गेले. त्या वेळी त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता ‘तुम्ही या आठवड्यात जाऊ शकता’, असे सांगून मला जाण्याची अनुमती दिली.
३ इ. जुलै १९९३ – शिष्य डॉ. आठवले यांनी त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्यासमोर नेहमी नम्रतेने उभे रहाणे आणि या उलट त्यांना भेटायला आलेल्या साधकांना त्यांना कधीही उभे राहू न देता बसण्यासाठी आसंदी देणे : ‘वर्ष १९९३ मधील रामनाथी (गोवा) येथील गुरुपौर्णिमा ही माझी सनातन संस्थेत आल्यानंतरची दुसरी गुरुपौर्णिमा होती. परात्पर गुरु डॉक्टरांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुष्कळ कष्ट घेतले होते. ‘ते यासाठी दिवसातील २४ घंटे अविरतपणे कार्यरत होते’, असे म्हणणेही अयोग्य ठरणार नाही. शिष्य डॉ. आठवले त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्यासमोर नम्रपणे उभे रहात. त्यांच्यासमोर ते कधीही बसले नाहीत. प.पू. बाबा जे काही सांगत, त्याचे ते स्वतःच्या बुद्धीचा वापर न करता आज्ञापालन करत असत. याउलट जेव्हा आम्ही त्यांना भेटायला जात असू, तेव्हा ते आम्हाला कधीही भूमीवर बसू देत नव्हते किंवा उभेही राहू देत नव्हते. ‘आम्हा सर्वांना बसायला आसंदी मिळाली आहे ना ?’, याची ते निश्चिती करत. साधकांकडून परात्पर गुरु डॉक्टर स्वतःची सेवा कधीच करवून घेत नाहीत. ते साधकांना स्वतःच्या मित्रांप्रमाणे वागवतात. ‘परात्पर गुरु डॉक्टर जगातील अत्यंत प्रेमळ, व्यापक अन् सर्वोत्तम गुरु आहेत’, असे मला वाटते.’
– डॉ. रूपाली भाटकार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ऑगस्ट २०२०)