कामाच्या वेळी केस विंचरायला जाणे, हा गंभीर गैरवर्तनाचा प्रकार !
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे मत
मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने कामाच्या वेळी केस विंचरायला जाणे, हा गंभीर गैरवर्तनाचा प्रकार आहे, असे म्हटले आहे. एक गिरणी कामगार विरुद्ध आस्थापन या खटल्यामध्ये न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. कामगाराने त्याच्या वरिष्ठ अधिकार्यावर हात उगारला आणि त्याला धक्काबुक्की केली, असा आरोप आस्थापनाने केला होता. अशा प्रकारे ‘आपल्या वरिष्ठ अधिकार्यांसमवेत वागणे हे गंभीर गैरवर्तन आहे’, असे न्यायालयाने म्हटले आहे.
१. रंगाराव चौधरी असे याचिका प्रविष्ट करणार्या गिरणी कामगाराचे नाव आहे. डिसेंबर २००५ मध्ये कामगार न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आवाहन देणारी याचिका रंगाराव यांच्या वतीने उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली होती. कामगार न्यायालयाने आस्थापनाने रंगाराव यांना सेवेतून कमी करण्याची कारवाई योग्य असल्याचा निकाल दिला होता.
२. आस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार मे १९९५ मध्ये कामाच्या दिवशी वरिष्ठ अधिकारी पहाणी करण्यासाठी गेले असता रंगाराव स्वत:च्या यंत्राच्या ठिकाणी नव्हते. ते दुसरीकडे जाऊन केस विंचरत होते. हा सर्व प्रकार रात्रीपाळीच्या वेळी घडला.
३. ‘रंगाराव यांनी तातडीने जागेवर जाऊन कामास प्रारंभ करावा’, असे वरिष्ठ अधिकार्याने सांगितल्यानंतर रंगाराव संतापले. ‘त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकार्यांना धक्काबुक्की केली, तसेच तेथे पडलेली लोखंडाची सळई वरिष्ठ अधिकार्यांना फेकून मारली’, असा आरोप आस्थापनाने केला.
४. आस्थापनाने रंगाराव यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला, तसेच आस्थापनाने अंतर्गत समिती बसवून घडलेल्या प्रकरणाचे अन्वेषण केल्यानंतर रंगाराव दोषी आढळल्याने त्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला.
५. रंगाराव यांनी या प्रकरणामध्ये करण्यात आलेल्या मारहाणीसंदर्भातील खटल्यामध्ये ‘आपण आधीच शिक्षा भोगली असून आता आस्थापनाने माझ्यावर केलेली कारवाई रहित करावी’, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयामध्ये प्रविष्ट केली. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांच्या खंडपिठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
६. ‘रंगाराव यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर आस्थापनाची अंतर्गत चौकशी आणि कायदेशीर कारवाई एकाच वेळी होऊ शकते. हे दोन्ही अन्वेषण स्वतंत्र पद्धतीने करण्यात आले. कायद्यासमोर व्यक्ती दोषी ठरवणे हे अंतर्गत चौकशीमध्ये दोषी ठरवण्यापेक्षा फार मोठी गोष्ट असते, असे न्या. देशपांडे यांनी म्हटले. त्यामुळेच कायदेशीर प्रकरणामध्ये रंगाराव यांची सुटका झाली असली, तरी तोच नियम आस्थापनाने घेतलेल्या निर्णयासंदर्भात लावता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
७. रंगाराव यांनी कामाच्या ठिकाणी यंत्राजवळ उभे राहून काम करण्यापेक्षा बाजूला जाऊन केस विंचरणे हे कामाच्या कालावधीत केलेले गंभीर गैरवर्तन प्रकारात मोडते. इतकेच नाही, तर जेव्हा वरिष्ठांनी त्यांना पुन्हा कामावर रुजू होण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी काम चालू करण्याऐवजी वरिष्ठांना शिवीगाळ करून त्यांना धक्काबुक्की केली, हेसुद्धा गैरवर्तनच आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने रंगाराव यांची याचिका फेटाळली. यासंदर्भातील वृत्त ‘फ्री प्रेस जर्नल’ने दिले आहे.