घोटी (नांदेड) येथील जिल्हा परिषदेची शाळा अज्ञातांकडून जे.सी.बी.ने भुईसपाट !
ग्रामस्थ संतप्त
रात्रीच्या वेळी केलेले हे कृत्य नक्कीच मोठा संशय निर्माण करणारे आहे. शासनाच्या शाळेची इमारत पाडण्याचे धैर्य करणार्या म्हणजे शासनाच्या विरोधात जाणार्या या सूत्रधारांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी !
नांदेड – जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मौजे घोटी गावात शासनाची कोणतीही अनुमती न घेता जिल्हा परिषदेची शाळा अज्ञातांनी रातोरात जे.सी.बी.ने भुईसपाट केल्याची धक्कादायक घटना ८ फेब्रुवारी या दिवशी घडली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषदेची सुसज्ज इमारत रात्रीत भुईसपाट करणार्या व्यक्तीची कोणतीही माहिती ग्रामस्थांना नाही. शाळा सकाळी पडलेली दिसल्यानंतर घोटी येथील नागरिक राजू सुरोशे यांनी येथील शिक्षण विभागाकडे या घटनेची लेखी तक्रार केली. याविषयी किनवट येथील गटशिक्षणाधिकार्यांनी ‘प्रशासनाला याविषयी काहीही माहिती नाही’, असे सांगितले.
त्याचप्रमाणे या घटनेविषयी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी वर्षा ठाकूर यांच्याकडून माहिती घेतली असता ‘जिल्हा परिषद शाळा पाडण्याविषयी जिल्हा परिषदेकडून कोणतीही कायदेशीर अनुमती देण्यात आलेली नाही’, असे त्यांनी सांगितले, तसेच या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी किनवट येथील गटशिक्षणाधिकार्यांना तात्काळ आदेश देऊन या घटनेचा अहवाल देण्यासाठी पथक रवाना केले आहे. ‘विना अनुमती शाळा पाडणार्या दोषींवर योग्य ती कायदेशीर करू’, असे आश्वासन त्यांनी दिले.