तुर्भे येथील गुंडगिरीला घाबरू नका ! – गणेश नाईक
नवी मुंबई – गुंडगिरीला घाबरू नका, असे आवाहन आमदार गणेश नाईक यांनी तुर्भे येथील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात केले. या वेळी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, परिवहन समितीचे माजी सभापती अन्वर शेख आदी उपस्थित होते.
गणेश नाईक पुढे म्हणाले की, येथील गुंडांना कुणीही घाबरू नका. जर त्यांचा त्रास झाला, तर मला कळवा. रात्री अपरात्रीही मी तुमच्यासाठी धावून येईन. माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांना या भागात विकासकामे करता आली नाहीत. तुर्भे येथील रहिवाशांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा, म्हणून रेल्वेस्थानकासमोर पूल बांधण्याची निविदा निघून काम चालू होणार होते. हे कामही स्वतःच्या स्वार्थासाठी कुलकर्णी यांनी थांबवले होते, असा गौप्यस्फोट गणेश नाईक यांनी या वेळी केला. तुर्भे विभागातील सर्व जागा भाजप जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.