साधकांनो, स्वतःमध्ये पांडवांसारखी पराकोटीची भक्ती निर्माण करून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आज्ञापालन करा !
१. महाभारत युद्धात अश्वत्थाम्याने महासंहारक नारायणास्त्र सोडल्यानंतर त्याची तीव्रता पुष्कळ वाढू लागणे आणि अर्जुनाने श्रीकृष्णाला शरणागतभावाने आता आम्ही काय करायचे ?, असे विचारल्यावर श्रीकृष्णाने सर्वांनी रथातून भूमीवर येऊन नारायणास्त्राला शरण गेल्यास ते आपोआप शांत होईल, असे सांगणे
महाभारत युद्धात द्रोणाचार्यांचा वध होतो आणि त्यामुळे क्रोधित झालेला त्यांचा मुलगा अश्वत्थामा पांडवांच्या सैन्यावर नारायणास्त्र सोडतो. त्या वेळी रणांगणावर लक्षावधी सैन्य होते. नारायणास्त्र हे महासंहारक अस्त्र असून त्याच्याशी लढू लागल्यावर वा प्रतिकार केल्यावर त्या अस्त्राची शक्ती कित्येक पटींनी वाढत जाते आणि त्यातून सुदर्शनचक्र बाहेर पडून ते शत्रूचा नाश करते. अश्वत्थाम्याने सोडलेल्या नारायणास्त्राची तीव्रता पुष्कळ वाढू लागली. तेव्हा सर्वांनी भगवान श्रीकृष्णाला काय करावे ?, असे विचारले; परंतु तो शांतपणे हे सर्व पहात होता. शेवटी अर्जुन शरणागतभावाने त्याला विचारतो, हे श्रीकृष्णा, आता आम्ही काय करायचे ? यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतो, सर्वांनी रथातून भूमीवर या आणि नारायणास्त्राला शरण जा. शस्त्र आपोआप शांत होईल.
२. बलाढ्य अस्त्रामुळे जगण्याची शाश्वती नसणे आणि दुर्योधनासारखा कपटी शत्रू समोर असतांना प्रतिकार न करता भूमीवर येणे महाकठीण असतांनाही श्रीकृष्णावरील पराकोटीच्या भक्तीमुळे पांडव अन् त्यांचे सैन्य यांनी श्रीकृष्णाचे आज्ञापालन केल्याने त्यांचे रक्षण होणे
त्या वेळी आपण रणांगणावर जिवंत राहू कि नाही ?, अशी सर्वांची स्थिती होती. रणांगणावर विश्वासघातकी, पाताळयंत्री, शीघ्रकोपी, भल्याबुर्या मार्गाने आपले काम साध्य करणारा आणि पांडवांच्या मत्सराने पछाडलेला असा शत्रू दुर्योधन होता. असा शत्रू समोर असतांना, म्हणजेच १०० टक्के आपत्काल असतांना श्रीकृष्ण म्हणतो, शस्त्रत्याग करून रथातून भूमीवर उतरा. देवाच्या या आज्ञेचे पालन करणे किती कठीण होते; परंतु श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितल्यावर केवळ पांडवांनीच नाही, तर संपूर्ण सैन्याने तात्काळ तशी कृती केली; कारण त्यांची भगवंतावर पराकोटीची भक्ती होती. त्या भक्तीनेच त्यांचे रक्षण झाले. ही शक्तीही देवच देतो. देवाने अशी आज्ञा दिली, याचा अर्थ देवाला पांडव आणि सर्व सैन्य यांच्या सुरक्षेविषयी पूर्ण विश्वास होता आणि सर्व सैन्यानेही भगवंतावर पूर्ण भार टाकला होता.
३. साधकांनी संपत्काळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे १०० टक्के आज्ञापालन केले, तरच त्यांना आपत्काळातही आज्ञापालन करणे शक्य !
या प्रसंगात संपूर्ण सैन्य हे राष्ट्र्र आहे, असे मानले, तर त्या सैन्यामध्ये हिंदु राष्ट्र्राचे दर्शन होते; कारण हे राष्ट्र्र एकसंघतेने बांधलेले आहे. १०० टक्के आपत्काळ असतांना भगवंताच्या आज्ञेचे पालन होणे, हे केवळ हिंदु राष्ट्र्रातच होऊ शकते. यासाठी आपल्यामध्ये पराकोटीची भक्ती निर्माण व्हायला हवी. साधकांनी संपत्काळात देवाचे १०० टक्के आज्ञापालन केले, तरच ते आपत्कालातही आज्ञापालन करू शकतात. त्यासाठी आपल्यामध्ये पांडवांसारखी भक्ती वाढली पाहिजे. परात्पर गुरु डॉ. आठवले जे काही मार्गदर्शन करतात, त्याप्रमाणे त्यांचे तंतोतंत आज्ञापालन केले, तर ते आपल्याला आपत्काळात तारून नेतील.
श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सुचलेली सूत्रे त्यांच्या चरणी अर्पण करतो.
– श्री. धनंजय हर्षे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.४.२०२०)
|