श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक आणि कृषीपूरक सेवा संस्थेची बेकरी उत्पादने, तसेच अन्य उत्पादने यांच्या वेष्टनांवरील हनुमानाचे चित्र काढून टाकावे !

श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक आणि कृषीपूरक सेवा संस्था मर्यादितचे जनरल मॅनेजर यांना समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवेदन

१. श्री. सरनाईक यांना निवेदन देतांना समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते

यळगुड (जिल्हा कोल्हापूर), ९ फेब्रुवारी (वार्ता.) – श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक आणि कृषीपूरक सेवा संस्थेच्या केक, ब्रेड अशा बेकरी उत्पादनांवर, तसेच लस्सी आणि अन्य उत्पादने यांच्या वेष्टनांवर कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या हनुमानाचे चित्र मुद्रित केलेले आहे. या उत्पादनांचा वापर करून झाल्यावर ही उत्पादने कचर्‍यात, रस्त्यावर, तसेच अन्यत्र टाकली जातात. यामुळे श्री हनुमानाची विटंबना होते. अशी विटंबना झाल्यामुळे कोट्यवधी हनुमानभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. तरी आपल्या आस्थापनाच्या सर्व उत्पादनांवरील श्री हनुमानाचे चित्र त्वरित काढून टाकावे, या मागणीचे निवेदन ८ फेब्रुवारी या दिवशी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक आणि कृषीपूरक सेवा संस्था मर्यादितचे जनरल मॅनेजर श्री. श्रीकांत सरनाईक यांना देण्यात आले. या संदर्भात संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, असे श्री. सरनाईक यांनी सांगितले.

श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक आणि कृषीपूरक सेवा संस्थेच्या वेष्टनांवर मुद्रित केलेले हनुमानाचे चित्र

संस्थेला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, अशा प्रकारे उत्पादनांच्या वेष्टनावर हनुमानाचे चित्र मुद्रित करून ते कचर्‍यात, रस्त्यावर जाणे म्हणजे धर्माची हानी होय. केंद्र शासनाच्या व्यापार चिन्ह कायदा कायदा १९९९ मधील कलम ९ (२) बी नुसार व्यापारी उत्पादनावर धार्मिक चिन्ह आणि चित्र मुद्रित करणे हा गुन्हा आहे.

या वेळी पट्टणकोडोली येथील श्री शंभूराजे प्रतिष्ठानचे श्री. शिवानंद पणदे, दुर्गवीर प्रतिष्ठानचे श्री. प्रवीण पाटील, रणदेववाडी येथील शिवसेनेचे श्री. नीलेश खाडे, सद्गुरु बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे श्री. रवींद्र गायकवाड, हुपरी येथील लोककल्याण ग्राहण संरक्षण संस्थेचे श्री. नितीन काकडे, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे आणि श्री. संतोष सणगर, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री प्रवीण घोरपडे, सुमित पोवार, सोमनाथ कुंभार, अनिल कोरवी, प्रसाद मेहतर उपस्थित होते.