जामखेड (जिल्हा नगर) येथील पोलीस ठाण्यात भास्कर पेरे यांच्यावर गुन्हा नोंद
पत्रकारांना अवमानित केल्याचे प्रकरण
जामखेड – ग्रामपंचायत निवडणुकीत मुलीचा पराभव झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून आदर्श गाव पाटोद्याचे (जिल्हा संभाजीनगर) माजी सरपंच भास्करराव पेरे यांनी अर्वाच्च भाषा वापरून पत्रकारांना अवमानित केले. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात पेरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला. जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक निमोणकर यांनी तक्रार दिली आहे. ३१ जानेवारी या दिवशी तालुक्यातील मोहा येथील ग्रामीण विकास केंद्र संचालित निवारा बालगृहातील एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात पेरे यांनी स्वतःच्या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत मुलीच्या झालेल्या पराभवाच्या रागातून पत्रकारांना हलकट आणि हरामखोर असे म्हटले होते. यानंतर येथील सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन या वक्तव्याचा तीव्र निषेध केला, तसेच तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती.