सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याच्या प्रकरणी थेट पंतप्रधानांकडे तक्रार
ग्राहकांनी अधिकोषांची स्थिती पाहून त्यात पैसे गुंतवायचे का ते ठरवावे !
सांगली – सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतल्या घोटाळ्याच्या प्रकरणी स्वतंत्र भारत पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्र पाठवून बँकेच्या घोटाळ्याची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकरभरती, कर्जवसुली, कर्जवाटप थकित कर्ज, संगणकवाटप आदी गोष्टींमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी नाबार्डकडे चौकशीची मागणी केली होती. याची नोंद घेऊन नाबार्डकडून पुणे सहकार आयुक्तांना याविषयीचे निर्देश दिले होते. त्यानंतर पुणे सहकार विभागाने कोल्हापूर सहकार विभागाच्या निबंधकांकडे बँकेच्या चौकशीचे दायित्व सोपवले होते; मात्र जिल्हा मध्यवर्ती बँकेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजप असे सर्वपक्षीय संचालक मंडळ सत्तेत आहे. त्यामुळे या चौकशीवर फराटे यांनी प्रश्न उपस्थित करत, त्यामधून काहीच निष्पन्न होणार नसल्याने त्यांनी या संदर्भात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून बँकेतील घोटाळ्याची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.