श्री क्षेत्र वीर, सासवड येथील श्री म्हस्कोबा यात्रा रहित करण्याचा निर्णय
सासवड (पुणे) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यातील वीर येथील श्री नाथ म्हस्कोबा देवस्थानची यात्रा रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला. २६ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत ही यात्रा होणार होती; परंतु २५ फेब्रुवारीपासूनच गावात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात येणार आहेत. बाहेरून येणार्या भाविकांना गावात प्रवेश दिला जाणार नाही, असे तहसीलदार रूपाली सरनोबत आणि आमदार संजय जगताप यांनी घेतलेल्या बैठकीत ठरवण्यात आले. त्यामुळे भाविकांनी यात्रेसाठी गावात येऊ नये, असे आवाहन सासवडचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप आणि देवस्थान समिती यांनी केले आहे.
मानकरी, खांदेकरी यांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने उत्सव पार पडणार आहे. या वेळी पुणे जिल्हाधिकार्यांकडून १४४ कलम लागू करण्याविषयी प्रस्ताव पाठवणार असल्याचे तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी सांगितले. या वेळी देवस्थानचे सध्याचे आणि माजी विश्वस्त, तसेच सासवडचे आरोग्य अधिकारी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.