साधकांनो, साधनेतील मोठा अडसर असलेल्या नकारात्मकतेला दूर करा आणि सकारात्मक राहून जीवनातील आनंद मिळवा !
नकारात्मक विचार करणार्या व्यक्तीला व्यवहारातील सुख मिळत नाही आणि ती साधनेत आनंद मिळवू शकत नाही. या लेखात नकारात्मकतेची कारणे, नकारात्मकतेमुळे होणारे दुष्परिणाम, नकारात्मकता दूर करण्यासाठी करावयाचे उपाय इत्यादी दिले आहेत. हा लेख वाचून नकारात्मक विचार करणार्या व्यक्तींना सकारात्मक रहाण्याचे महत्त्व कळेल आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळेल.
(भाग २)
भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/449251.html
४. नकारात्मकतेचे दुष्परिणाम
ख. ‘काळ्या रंगाचा चष्मा घालून सुंदर जगाकडे पाहिल्यास त्या व्यक्तीला सर्व जग काळे दिसते. सृष्टीसौंदर्यातही काळेपणाच दिसतो. त्या व्यक्तीला ‘देवाने जगातील प्रत्येक वस्तू परोपकारासाठी निर्माण केली आहे’, हे तिच्या लक्षात येत नाही. त्यामुळे सृष्टीतील वस्तू आणि व्यक्ती यांच्याकडून मिळणारे साहाय्य आणि प्रेम तिला मिळत नाही. त्याचा आस्वाद घेण्याची तिच्या मनाची सिद्धता नसते. त्यामुळे मिळणारे प्रेम आणि आनंद यांना तो पारखा होतो.
ग. नकारात्मक विचार करणार्या व्यक्तीला वाईट शक्ती त्रास देतात. तिला चांगले काही करू देत नाही. अशा व्यक्तीची अधोगती होते.
घ. अनेक गोष्टींत अपयश येत गेल्यास मनुष्य निराश होतो आणि म्हणतो, ‘‘माझे प्रारब्ध खडतर आहे. ‘मला यश मिळणे’, ही दूरची गोष्ट आहे.’’ अशा प्रकारच्या नकारात्मक विचाराने तो प्रयत्न करणे सोडून देतो. ‘प्रारब्ध खडतर असणे’, हे आपल्याच पूर्वकर्मांचा परिणाम आहे. प्रारब्धात असलेले भोग भोगून संपवण्यासाठीच आपल्याला पुनःपुन्हा जन्म घ्यावा लागतो’, हे तो विसरतो आणि प्रयत्न करणे सोडून देतो. असे करून तो एकप्रकारे आत्मघात करून घेतो.
५. नकारात्मकता घालवण्यासाठी करावयाचे उपाय
५ अ. मानसिक स्तरावर
१. मनात येणारे नकारात्मक विचार लिहून त्या विचारांसमोर ‘कोणते सकारात्मक विचार किंवा कृती करू शकतो ?’, हे लिहिणेे
२. मनात नकारात्मक विचार आल्यावर लगेच आध्यात्मिक मित्र किंवा उत्तरदायी साधक यांच्याशी बोलून त्यांनी दिलेले दृष्टीकोन कृतीत आणणे
३. मनोराज्यात न रमता वास्तव लक्षात घेऊन सकारात्मक विचाराने कृती करणे
४. ‘सकारात्मक रहाण्यामुळे माझ्या प्रयत्नांना गती मिळून माझी फलनिष्पत्ती वाढणार आहे’, असा विचार करणे
५. अनावश्यक विचार करायचे टाळणे
६. अपेक्षा न्यून करून निरपेक्षभावात रहाण्यासाठी प्रयत्न करणे
७. ‘नकारात्मक विचार करणार नाही. नकारात्मक विचारांना मनात थारा देणार नाही’, असा बुद्धीचा निश्चय करणे अणि त्याप्रमाणे कृतीही करणे
८. देव, गुरु आणि सहसाधक यांचे साहाय्य घेऊन स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी खडतर प्रयत्न करणे
५ आ. आध्यात्मिक स्तरावर
१. ‘देवाने मला आनंदी जीवन जगण्यासाठी जन्म दिला आहे’, असा विचार करणे
२. प्रत्येक कृतीचे कर्तेपण स्वतःकडे न घेता ‘देवच त्याला अपेक्षित असे सर्वकाही करवून घेणार आहे’, असा विचार करून कृती करणे
३. ‘प्रत्येक गोष्ट देव माझ्या भल्यासाठीच करत आहे’, असा भाव ठेवणे
४. कृती करण्यापूर्वी आणि कृती करत असतांना संत किंवा उन्नत साधक यांचे मार्गदर्शन घेणे
५. कृती झाल्यावर ईश्वरचरणी शरणागतभावाने कृतज्ञता व्यक्त करणे
६. ‘सकारात्मक राहिल्यामुळे मला देव आणि साधक यांचे साहाय्य मिळून माझ्या जीवनातील सर्व अडचणी सुटणार आहेत’, असा विचार सतत करणे
७. ‘सकारात्मक राहिल्याने माझ्याकडून देवाला अपेक्षित अशी कृती होऊन मला कृती करण्यातील आनंद मिळणार आहे’, असा विचार करणे
८. ‘सकारात्मक राहिल्याने माझ्या कर्तृत्वाला वाव मिळेल आणि ‘देवच माझ्याकडून सर्व करवून घेत आहे’, या जाणिवेने ‘माझ्यातील कर्तेपणा अन् अहं न्यून होईल’, असा विचार करणे
९. प्रयत्न वाढवण्यासाठी देवाला प्रार्थना करणे आणि प्रयत्न करून झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करणे
१०. मनोलय आणि बुद्धीलय होण्यासाठी देवाला सातत्याने प्रार्थना करणे
११. मनात नामाचे बीज रुजवण्यासाठी साधनेची कास धरून ती तीव्र होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली अष्टांग साधना करणे
१२. सातत्याने देवाच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करणे
१३. गुरुदेवांनी सांगितलेले आध्यात्मिक उपाय नियमितपणे आणि भक्तीभावाने करणे
१४. ‘प.पू. गुरुदेवांनी आपली साधना होण्यासाठी आतापर्यंत काय केले ?’, हे आठवणे आणि ‘अजूनही ते करतच आहेत’, याची जाणीव ठेवणे
१५. बुद्धीचा वापर न्यून करून मन गुरुचरणी अर्पण करणे’
– श्री. अशोक लिमकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.७.२०१७)
(क्रमशः)
भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/449820.html
|